देवदासी आणि नग्नपूजा.उत्तम कांबळे.(भाग५).

देवदासी आणि नग्नपूजा..

तुमच्यामागे आहे . तुम्ही नग्नपूजा करा. न केल्यास आम्माचा कोप होईल , ” असे ते सांगू लागले. देवस्थान समितीच्या काही सदस्यांनीही नग्नपूजेला छुपा पाठिंबा देण्यास सुरुवात केली . तर जोगम्मा व जोगप्पांना अटक करावी अशी मागणी कार्यकर्ते करू लागले . नग्नपूजेची छायाचित्रे वृत्तपत्रांत छापून छायाचित्रकार आमच्या महिलांची अब्रू घालवतात . बातमीदार वाटेल तशा बातम्या छापून पैसे मिळवतात, असाही प्रचार काही मंडळी भक्तांमध्ये करू लागली. इकडे कार्यकर्ते उद्या कोणी कोठे थांबायचे, नग्नपूजा कशी रोखायची, याबद्दल अंदाज करत होते . या सर्व धावपळीत जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकारी मात्र जिल्ह्याच्या ठिकाणीच बसून होते. ते यात्रेकडे फिरकले नाहीत. ‘ नग्नपूजा करू नका ‘, एवढे एक मोघम आवाहन सरकारने केले होते. पण प्रत्यक्षात ती बंद करण्यासाठी त्यांच्याकडे ठोस असा कार्यक्रम नव्हता. यंत्रणा नव्हती . कार्यकर्त्यांना त्यांचे सहकार्य मिळत नव्हते. त्यामुळे’ नग्नसेवा बंद करा ‘ या शासनाच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही याबद्दल कार्यकर्ते व भक्तांची खात्री झाल्याचे दिसून येत होते.

या सर्व घटना बुधवारी रात्री घडल्या . त्यामुळे गुरुवारी यात्रेच्या मुख्य दिवशी काय होणार, याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली. गुरुवारी पहाटे चार वाजता ‘ दलित संघर्ष समिती’च्या कार्यकर्त्यांनी नदीवर कडे निर्माण केले. सर्वत्र प्रचंड प्रमाणात धुके होते. अशा वेळी कोणी आंघोळीसाठी येणार नाही, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. पण याही वेळी एक कुटुंब आले. या कुटुंबातील एक महिला नग्न होऊन निघाली. कार्यकर्त्यांनी तिला अडवून तिच्या अंगाभोवती साडी गुंडाळली. महिला जोरदार प्रतिकार करत होती. अंगावर वस्त्र घेऊन निघालेल्या या महिलेने पाच – दहा पावले अंतर चालून वस्त्रे फेकून दिली. कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिचा पाठलाग सुरू केला. ‘ उदं उदं ‘ म्हणत ती वाऱ्यासारखी धावत होती. तिच्या मागे तिच्या कुटुंबातील मंडळी होती आणि या सर्वांचा पाठलाग कार्यकर्ते करीत होते. अखेर त्यांनी तिला गाठलेच. तिला पुन्हा कपडे नेसायला लावले. नग्नावस्थेत धावणारी महिला, तिचा पाठलाग करणारे कार्यकर्ते हे दृश्यच मोठे विचित्र होते .

पहाटे पाच वाजता तर भक्तांची जास्तच गर्दी झाली. सात वाजेपर्यंत जिकडतिकडे लोकच लोक दिसू लागले. या सर्व गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी चाळीस ते पन्नास पोलीस होते. त्यात दोन महिला पोलीस होत्या. आणीबाणीचा प्रसंग असूनही पोलीस मात्र कार्यकर्त्यांनंतर दोन तास उशिरा नदीजवळ आले. यावरून शासन या प्रथेकडे कसे निष्क्रियतेने पाहते हे स्पष्ट होते.

सकाळचे आठ वाजले. नदीच्या काठावर सुमारे दहा हजार भक्त उपस्थित होते . ‘ बेत्तले सवे निल्लले बेक ‘ ( नग्नसेवा थांबली पाहिजे ) बेत्तले सेवे अपराधा ‘ ( नग्नसेवा गुन्हा आहे ) अशा गगनभेदी घोषणा कार्यकर्ते देत होते. याला प्रत्युत्तर म्हणून भक्त मंडळीही ‘ उदंऽऽ उदंऽऽ’चा घोष मोठ्या प्रमाणात करीत होती. अशा प्रकारे भक्त आणि कार्यकर्ते यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला होता.

नग्नसेवा करणाऱ्यांत महिलांची संख्या अधिक होती. त्यांना त्या अवस्थेत कार्यकर्ते पकडू शकत नव्हते. या महिला मात्र कार्यकर्त्यांचे कडे तोडून जाण्याचा प्रयत्न करीत होत्या . दोन महिला पोलिसांना आणि महिला मंडळाच्या सहा कार्यकर्त्यांनाही नग्नावस्थेतील महिलांना रोखून धरणे कठीण जात होते. विशेष म्हणजे अशा महिलांना कपडे देण्यास त्यांचे कुटुंबीय विरोध करीत होते. त्यामुळे बऱ्याच वेळेला कार्यकर्त्यांनी आपल्याजवळील लुंगी, टॉवेल किंवा वाळूवर टाकलेले कपडे घेऊन नग्नसेवा करणाऱ्या महिलांचे अंग झाकले. नग्नसेवेस जाणाऱ्या पुरुषांची आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर झटापट होत होती. एक पुरुष दहा – दहा कार्यकर्त्यांना भारी पडत होता. अशा वेळीही पोलीस दूर राहून सर्व प्रकार पाहत होते. अगदी क्वचितच ते जवळ येत व नग्नसेवा करणाऱ्याला धमकी देत .

घोषणेबरोबरच कार्यकर्त्यांनी आणखी एक गोष्ट केली. ती म्हणजे नग्नसेवेची विविध नियतकालिकांत छापून आलेली महिलांची नग्न छायाचित्रे त्यांना दाखवली. तुमची छायाचित्रे घेऊन ती शहरात विकली जातात, तुमची अब्रू जगाच्या बाजारात मांडली जाते, तेव्हा तुम्ही नग्नसेवा करू नका, असे कार्यकर्ते सांगत होते. या गोष्टीचा परिणाम असा झाला की, नऊ वाजता भक्तांच्या एका गटाने एका छायाचित्रकाराला बेदम मारहाण केली .

सर्वच वातावरण बदलले. “ ज्यांनी नवस केला आहे त्यांनी नग्नसेवा केलीच पाहिजे. पोलिसांना, कार्यकर्त्यांना भिऊन अंगावर कपडे घालू नयेत , तुमच्यामागे आम्मा आहे. तुम्हाला कोणी काहीच करू शकत नाही “, अशी चिथावणी जोगम्मा व जोगप्पा भक्तांना उघडपणे देत होते. त्यामुळे दहा पंधरा मिनिटांतच भक्त आक्रमक बनले. त्यांच्या अनेक गटांनी कार्यकर्ते आणि पत्रकारांवर हल्ले सुरू केले. त्यांचे कपडे फाडणे, त्यांना नदीत फेकणे, दगडफेक करणे असे जीवघेणे प्रकार सर्रास घडले.

कार्यकर्ते जीव मुठीत घेऊन वाट दिसेल तिकडे पळू लागले. भक्त त्यांचा पाठलाग करू लागले. हे सर्व चालू असतानाच सुमारे दोनशे जोगम्मा व जोगप्पांच्या अंगात देवी आली. ते घुमू लागले. भक्तांना आदेश देऊ लागले. भक्त हिंसक बनले. त्यांनी आपला मोर्चा पत्रकार आणि छायाचित्रकारांकडे वळविला. ज्यांच्या गळ्यात शबनम बॅग दिसेल तो पत्रकार असे समजून त्याला झोडपले जाऊ लागले. यावेळी कर्नाटकातील पाच व महाराष्ट्रातील मी, असे सहा पत्रकार तिथे हजर होतो.

मी पहाटेपासून नदीच्या किनाऱ्यावर तापणारे वातावरण बघत होतो. तेथून डोंगरावर जाण्यासाठी म्हणून सकाळी साडेनऊ वाजता मी निघालो. नदीच्या टेकडीवर लागूनच रस्ता होता. एस . टी . येण्यास पावणेदहा वाजणार होते . पंधरा मिनिटांचा वेळ कोठेतरी काढावा म्हणून हॉटलेमध्ये गेलो. हॉटेल कसले ते, कशीतरी उभी केलेली झोपडीच होती. हॉटेलमधील चहा संपला होता. तो तयार होण्यास दहा मिनिटांचा कालावधी लागणार होता. तेवढ्यात समोर अननस विकणारा तरुण दिसला . या भागात अननस स्वस्त मिळतात . दोन रुपये देऊन एक अननस घेतला . त्याची फोड तोंडात टाकणार तेवढ्यात नदीतून मोठ्या प्रमाणात गलका ऐकू येऊ लागला. हाणामाऱ्यांचा आवाज कानावर पडू लागला . एक पुजारी मी बसलेल्या हॉटेलमध्ये आला. तो माझ्या गळ्यातील शबनम बॅगकडे बोट करून म्हणाला, ” तुमच्याकडे कॅमेरा आहे का ? ” मी होय म्हणालो. यावर तो पुन्हा म्हणाला , “ गडबड करा, कॅमेरा लपवा , नाहीतर भक्त तुम्हाला मारतील . तिकडे नदीत लोक कार्यकर्त्यांना, पत्रकारांना व छायाचित्रकारांना मारहाण करीत आहेत . जा, जा लवकर . कॅमेरा लपवा.

” पुजाऱ्याचे बोलणे ऐकून मी अवाक झालो . कशाचाही विचार न करता गळ्यातील बॅग हॉटेलमधील चुलीजवळ ठेवली. पुन्हा बाहेर येऊन थांबलो. सर्वत्र रणकंदन माजले होते. कार्यकर्ते जीव मुठीत घेऊन धावत होते. माझी छाती धडधडू लागली. मारहाणीचे सत्र बसस्टॉपपर्यंत येऊन पोहोचले, विशेष म्हणजे बसही येऊन थांबली होती . बसमध्ये चढलेल्या कार्यकर्त्यांनाही लोक बाहेर…

क्रमशः
स्रोत:(देवदासी आणि नग्नपूजा या उत्तम कांबळे यांच्या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading