श्रीगोंदा पोलीस आणि काही पत्रकारांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली..!

दिनांक ३० सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:–

मोबाईल चोरीच्या संशयावरून ओडिसा येथील अल्पवयीन मुलास मारहाण करणाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हे दाखल..

तालुक्याच्या आठवडे बाजारात ओडिसा येथून प्रवासादरम्यान चुकून श्रीगोंद्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलाला मोबाईल चोरीच्या संशयावरून काही जणांनी जबर मारहाण केली. या प्रकरणात त्या मुलाला गंभीर दुखापत झाली. या प्रसंगी फळे व भाजी विक्रेत्या महिलांनी आणि काही स्थानिकांनी मारहाण करणाऱ्या इसमांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्या महिलांनाही शिवीगाळ करत दमदाटी केली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने तत्काळ श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल फलके आणि मेजर तरटे यांनी घटनास्थळी धाव घेतली व पीडित मुलाला पोलिसांच्या ताब्यात घेत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नेले. मारहाणीत जखमी झालेल्या मुलाला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टर कोकरे यांनी तपासणी करून मुलाच्या दुखापतीची नोंद केली.

पोलिसांनी प्राथमिक चौकशीत निष्कर्ष काढला की, पीडित मुलगा ओडिसाचा रहिवासी असून, कौटुंबिक वादानंतर तो हैदराबादला मामाकडे जात असताना प्रवासात चुकून श्रीगोंद्यात आला. या मुलावर मोबाईल चोरीचा खोटा संशय घेऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आले. श्रीगोंदा पोलीस ठाण्याने बालकल्याण समिती अहमदनगरच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मुलाला त्यांच्या ताब्यात देण्यासाठी पुढील कार्यवाही केली.

दरम्यान, पीडित मुलाने मारहाण करणाऱ्या तिघांवर तक्रार दाखल केली असून, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मते, पोलीस घटनास्थळी वेळेवर पोहोचले नसते तर या मुलाला आपला जीवही गमवावा लागला असता. याशिवाय, मारहाण रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांनाही शिवीगाळ करण्यात आल्याने त्या महिलांनीदेखील गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

या घटनेत श्रीगोंदा पोलीस आणि काही पत्रकारांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे एक मोठी दुर्घटना टळली. या घटनेतील कारवाईनंतर पत्रकार आणि पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

स्त्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading