श्रीगोंदा मतदार संघात नागवडे दांपत्याचा शिवसेना प्रवेश; कार्यकर्त्यांकडून जल्लोष..

दिनांक २३ ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा:

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे आणि जिल्हा सहकारी बँक संचालिका सौ. अनुराधा नागवडे यांनी आज बुधवारी दुपारी महा विकास आघाडीतील शिवसेना पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी हजारो समर्थक उपस्थित होते. विशेष म्हणजे, पक्ष प्रवेशानंतर सौ. अनुराधा नागवडे यांना पक्षाचा अधिकृत उमेदवारी फॉर्म (एबी फॉर्म) प्रदान करण्यात आला.

पक्ष प्रवेशावेळी शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्यावर घरी बसून कामकाज पाहातो, असा आरोप केला जातो. मात्र, विरोधकांना आता समजले असेल की, दररोज मातोश्रीवर राज्यातील प्रमुख नेते प्रवेश का करत आहेत.” त्यांनी नागवडे दांपत्याला शुभेच्छा देत त्यांना ‘मशाल’ सतत पेटती ठेवावी, असे सांगितले. विरोधक यशस्वी होणार नाहीत, असेही ते म्हणाले.

शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनीही नागवडे दांपत्याच्या प्रवेशाबाबत आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “नागवडे यांची उमेदवारी महत्त्वाची असून, आम्ही त्यांच्या विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त करतो.” तसेच, त्यांनी सांगितले की, आघाडीकडे जागा मागताना नागवडे यांची शिफारस केली होती, ज्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.

सौ. अनुराधा नागवडे यांनी आपल्या प्रवेशानंतर बोलताना सांगितले, “श्रीगोंदा मतदार संघात काम करण्यासाठी लोकांचा आग्रह होता. नागवडे कुटुंबाची जनतेशी असलेली नाळ सर्वांना ठाऊक आहे. मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.” शिवसेना उपनेते साजन पाचपुते आणि अन्य स्थानिक नेत्यांनी त्यांना सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

पक्ष प्रवेशानंतर आणि एबी फॉर्म मिळताच श्रीगोंदा मतदार संघात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विजयाची खात्री व्यक्त करत स्थानिक पातळीवर उत्साहाचे वातावरण दिसून आले. यावेळी हजारो कार्यकर्त्यांसह खासदार संजय राऊत, उपनेते साजन पाचपुते, सुनंदा पाचपुते, दीपक नागवडे, आदेश नागवडे उपस्थित होते.

रविवारी वांगदरी येथे झालेल्या मेळाव्यात सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन बाबासाहेब भोस यांनी “२ दिवसात निर्णय होईल,” असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याची पूर्तता झाल्याची चर्चा नागवडे समर्थकांमध्ये रंगली असून मतदार संघात या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.

स्रोत:(अधीकृत माहिती)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading