फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग १)..

फकिरा…

सूर्य मावळला होता . त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनाऱ्यावर राहून गेल्यामुळं एक गुलाबी धांदोटी पसरली गेली होती . त्याखाली लख्ख पोलादी रंग दिसत होता . तिथं ती सूर्य बुडाल्याची खूण उमटली होती . बाकी अंधाराची चढाई सर्व जग , तो खोरा व्यापीत होती. वारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता . सूर्यानं सर्व कलांनी जग जितकं लखलखीत केलं, तितकंच अंधार काळं करू लागला. प्रकाशामागं अंधार नि अंधारामागं प्रकाश हे चक्र गतिमान होत होतं.

वाटेगावचं अस्तित्व नाहीसं झालं. ती एका जागी बसलेली बाराशे घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली. त्या गावाच्या आजूबाजूचे माळ, तो सात दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला. गावाच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली. तांबखडीवरून आलेली ती गाडीवाट गावात शिरली होती. ती विष्णुपंत कुलकर्णीच्या भव्य वाड्यापुढून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलाच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती. तसंच पुढं जाऊन मांगवाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेलं, की मांगांच्या घराकडे वळावं लागत होतं. तेथून ती गाडीवाट उगवतीला जाऊन माळाने, पांदीनं नागमोडी वळणं घेत शिगावात शिरली होती . वाटेगाव ते शिगाव हे चार मैलाचं अंतर त्या गाडीवाटेनं सहा मैलांची कैक वळणं घेऊन संपवलं होतं . ती वाट आज अंधारानं पुसून काढली होती .

हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट धावत सुटलं. आकशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोहावा, तशी ढगात वीज सळसळू लागली. विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळण्याच्या बेतात आल्यासारखं दिसू लागलं. अक्राळविक्राळ आकृत्या करून ढग गिरक्या घेऊ लागले. वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे टेपलू लागला .

गावात सामसूम झाली. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. मिणमिण जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले. कुत्री मुकी झाली . सर्वत्र निःशब्दता नांदू लागली. भित्रं वातावरण उदास होऊन उभं राहिलं . गावहूं का चूं करीनासं झालं .

शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता. कोणी तरी यावं आणि आपल्याशी बोलत बसावं, असं त्याला वाटत होतं; पण किती तरी वेळ कोणीच येत नव्हतं, म्हणून तो चिडला होता. त्यानं आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले होते आणि स्वतःला मंद झोके देत तो समोरच्या वाटेकडे टक लावून पाहत होता . येणारा – जाणाराचा सासुंद घेण्यासाठी त्यानं आपले कान टवकारले होते , पण पाटलाशी बोलत बसायला कोणीही नव्हतं . दारं बंद करून लोक केव्हाच अंथरुणावर आडवे झाले होते. त्याचीच पाटलाला चीड आली होती. जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचं, हे त्याला पसंत नव्हतं. माणसानं कसं आनंदात असावं , खेळावं , बोलावं आणि राबावं, असं त्याचं मत होतं . उद्याच आषाढ निघत होता. उद्या शिगावात जोगणीची जत्रा भरणार होती. शिगावच्या बाजीबा खोताचा त्याला हेवा वाटत होता .

शिगावची ती जोगणीची जत्रा त्या खोतानं भरवली होती. आपल्या तरुणपणी त्यानं काळगावच्या जोगणीदिवशी उभ्या गावाशी कलागत करून ती जोगणी जबरीनं आणली. त्या दिवसापासून काळगावची जोगणी जत्रा बंद पडून ती शिगावात सुरू झाली होती. जर बाजीबा काळगावच्या लोकांना सापडला असता, तर त्याचं त्यांनी शिर कापून वेशीला बांधलं असतं ; पण बाजीबा जबर माणूस. म्हणून तर शिगावची सारखी भरभराट होत आहे. लोक एका वर्षात तीन जत्रा करीत आपला संसार चालवीत आहेत आणि -आणि हे आपलं गाव ! इथं काहीच नाही .

दिवस बुडाला , की शब्द ऐकू येत नाही . माणूस दिसत नाही.खेळ नाही, तमाशा नाही, काही नाही ! बारा महिन्यात एक जत्रा- आणि तीही मढ्याला माणसं जमावी , तशी . एवढा मोठा गाव असून काय कामाचा ?

पाटील विचारांच्या तंद्रीत सापडला होता आणि मग पुन्हा भानावर येऊन ते विचार झटकीतही होता. एवढ्यात समोरच्या वाटेवर घोड्याच्या टापा वाजल्या. पाटील कानोसा घेऊ लागला , तोच ते घोडं मोठ्यानं खेकाळलं. त्याचा आवाज त्या शांत रात्री दूरदूर गेला आणि लगेचच पाटलाचं घोडंही खेकाळलं. पाटील रोखून पाहत म्हणाला , ” कोण चाललंय ते ?

” ” मी हाय , राणूजी मांग . ” राणोजी घोड्यावरून खाली उतरून म्हणाला .

पाटलानं आग्रहाच्या सुरात उद्देशून त्याला म्हटलं , ” ये की , पान खाऊन जा.रात केलीस ?

” ” वाईच रात झाली . ” आकाशात पाहत राणोजी तक्रारीच्या सुरात म्हणाला , ” आबा , पाऊस उठलाय .

” ये , कारा सुटलाय . पाऊस येत नाही . ” पाटलानं निर्वाळा दिला आणि लगाम ओढीत राणोजी जोत्याजवळ येऊन एका दगडावर बसला .

” अजून निजला न्हाय ? का जागताय ? ” राणोजीनं विचारलं .

” काय करू ? नीजच लागंना !

” ” का ? काय झालं ?

” ” काही नाही . उदास वाटतंय . गावात रग नाही . ” पाटील मनातले विचार बोलू लागला . ” गावात जीवच उरला नाही . दिवस बुडाला , की गाव जाग्यावर नसतो .

” ” मग काय करावं त्यानं ? दमूनभागून निजतोय .

” ” इतर कोण काय दमत नाही? का त्यांचा संसार नाही? ” पाटील म्हणाला , ” त्या शिगावाची माणसं का दमत नाहीत ? पण एका वर्षात तीन जत्रा करून संसार करतायत ती .

” ” त्यांच्या गावात जत्रा हायत्या , म्हणून ते करत्यात . आपून काय करावं ?

” ” जत्रा काय आपोआप भरत नसत्यात . त्या भरवाव्या लागत्यात . उद्या आपुन जत्रा भरवली , तर का कोण नको म्हणणार आहे ? का कोण हात धरणार आहे ?

” ” मग का भरत न्हाई ?

” ” कशी भरणार ? ” पाटील मधेच म्हणाला , “ दिवस बुडाला , की कुत्रं फिरत नाही गावात , मग जत्रंचा विचार कोण करणार ? आजूबाजूच्या इंग्रजी हद्दीत लोक रंगलाल आहेत . त्या शिगावात उद्याच जोगण्या निघणार . बाजीबा खोतासारखा एखादा बहाईर आमच्या गावात निपजत नाही , तोपर्यंत इथं जोगण्या भरणार कशा ? जोगणी त्यानं भरवली .

” ” बाजीबानं ? ती कशी ?

” ” बाजीबानं काळगावच्या जोगण्यात जाऊन दंगल केली आणि जोगणीच्या हातातली वाटी पळवून आणून आपल्या गावची जत्रा वाढवली . तसा वीर आमच्या गावात कोण आहे ?

” का न्हायती ? पंतावानी नि तुमच्यावानी मानसं वाघाला दावं लावतील की !

” ” वाघाला दावं लावणं सोपं आहे , पण उभ्या गावाशी लढत देऊन जोगणी आणणं सोपं नाही . त्यासाठी डोंगराएवढं काळीज हवं आणि ते माझ्याजवळ नाही . ते विष्णुपंत – ते कायद्याच्या कोपरखळ्या देण्यात पटाईत आहेत . जीव गेला , तरी ते चाकोरी सोडणार नाहीत .

” ” मी उद्या जोगण्या बघाय शिगावला जाणार हाय . ” राणोजी मध्येच म्हणाला , ” तुमचा काय बेत ?

” ” मी कधीच कुणाच्या जत्रेला जात नाही . ” पाटील खिन्न स्वरात म्हणाला , ” लोकांच्या आरतीनं ओवाळून घेणं मला बरं वाटत नाही . आपल्या घरात अंधार नि आपण उजेडात मिरवायचं , हे मला रुचत नाही . ” असं म्हणून पाटलानं राणोजीला पान दिलं .

दोघांनी पान खाल्लं आणि राणोजी उठण्याचा विचार करू लागला , तो पाटील म्हणाला , ” या पांढरीला बाजीबा खोतासारखा माणूस पाहिजे , तरच या गावची भरभराट होईल . लौकिक वाढेल . बाजीबानं शिगावावर उपकार केले , तसे या गावावर उपकार करणारा माणूस इथंच जन्मला पाहिजे .

” हे ऐकून राणोजी एकाएकी गंभीर झाला . त्याचं मन उगीचच बावरं झालं . हातातील लगाम पिरगाळीत तो अंधारात पाहू लागला . वाटेगाव ते शिगाव यांच्यामधील असलेला माळ , ती नागमोडी वळणं , ती पांद , मध्ये असलेले निवडुंगाचे डवंगे सारं सारं त्याच्या डोळ्यांपुढं तरळू लागलं आणि पाटील म्हणाला ,

” जा आता . दौलती वाट बघत असंल .

” राणोजी उठून उभा राहिला . तो तसाच विचार करीत निज्ञाला . घोडं त्याच्यामागून चालू लागलं . तो थळात आला . कोंडीबा महार अंधारात बसून भजन म्हणत होता . तो दिसत नव्हता . फक्त त्याचा घोगरा आवाज आणि त्याचा तो ताऱ्या एवढंच ऐकू येत होतं . त्या भजनानं राणोजी भानावर आला . त्यानं समोर मांगवाड्याकडं पाहिलं आणि घोड्यावर उडी घेतली .

गावापासून एका हाकेच्या अंतरावर असलेला मांगवाडा निपचित पडला होता . पाच पुरुष उंच निवडुंगानं त्या पन्नास घरांना वेढा घातला होता . त्या निवडुंगाची दोन टोकं त्या गाडीवाटेजवळ त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती . तिथंच मांगवाड्यात जाण्याची वाट होती .

त्या निवडुंगात ती घरं कशीबशी उभी होती . ती उसाच्या पाल्याची घरं भेदरल्यासारखी भासत होती. त्यांच्या डोकीवरचं आकाश आता काळवंडलं होतं, त्यामुळं त्यांचं धाबं दणाणलं होतं . मधूनच एखादं घुबड फुत्कारत होतं. मध्येच..

क्रमशः
(स्रोत:फकिरा या अण्णा भाऊ साठे यांची कादंबरी)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading