फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग १४).

फकिरा..

” तर मग तू जाऊच नंग . येऊ दे …

” नगं नग- ” मध्येच सावळा म्हणाला , ” मला गावानं जायला सांगितलं म्हणून मी गेलो . गावाच्या मताइरुद वागून कसं चालल ? “

” बरं , मग जा तर ! ” फकिराला त्याचं म्हणणं पटलं . सावळा निघून गेला आणि ‘ म्या तिकडं कुत्र्याच्या मोतीनं मरू नये , असं मला वाटतं- ‘ या सावळाच्या बोलानं फकिराच्या हृदयात डोंब पेटला . त्याचं मन उद्विग्न झालं. सावळासाठी काय करावं , याचा तो विचार करू लागला. तो चिंचेला टेकून किती तरी उशीर उभा राहिला.

सूर्य हळूहळू वर आला . त्याची कोवळी किरणं चिंचेच्या पानांवर बसून झोके घेऊ लागली . हिरव्या निवडुंगावर पिवळा सोनेरी प्रकाश उधळला गेला . गावची गुरं गावदरीला आली . माणसं कार्यक्षम झाली . विष्णुपंत मळ्याकडे निघाले . त्यांच्या घोड्याच्या टापा ऐकून फकिरा भानावर आला . पंतांचा घोडा चिंचेखाली येऊन थांबला , एवढ्याशा पोरासाठी पंतानं घोडा थांबवला , याचं मांगवाड्याला आश्चर्य वाटलं . आपल्या त्या प्रचंड घोड्याच्या पाठीवर झोके घेत रोखून पाहत पंत म्हणाले , ” फकिरा , काय झालं ? “

” काई न्हाय , आबा . ” फकिरा हसला .

” नाही कसं ? तुझा चेहराच सांगतोय .

सावळानाना गेला- “

” कुठं ? बेळगावला ? “

” हो , बेळगावला ! “

” मग ? तुझं काय म्हणणं आहे ? “

” का गेला ? “

हे ऐकून पंतांना पेच पडला . थोडा विचार करून ते म्हणाले ,

” त्याला गुन्हेगार म्हणून सरकारनं हद्दपार केला आहे . “

” त्यानं काय गुन्हा केला ? “

” काहीच नाही . तसा सरकारकडे मुळीच पुरावा नाही .”

‘ मग हे कोन इचारनार सरकारला ?

” आलं लक्षात . विचारलं पाहिजे आणि मीच ते विचारीन. तू जा घरात- ‘ पंतांचं घोडं थडाड् करून उडालं आणि धावत निघालं . फकिरा घराकडे वळला . दौलती दारात उभा होता . राधा बाहेर आली . मांगं जमली . दौलती , म्हणाला ,

” काय झारलंस पंतास्नी ? “

” सावळूनानाबद्दल . “

‘ मग काय म्हनलं त्ये? “

‘ सरकारला इचारनार हायती .

“हे ऐकून मांगांची काळजं डोंगराएवढी झाली . आता आपले दिवस सुखाचे येणार ! जर पंत सातारला गेले , भांडले , तर हा कायदा बोथट होईल आणि आपल्या मागची लांडगेतोड संपेल . दुःखी मिळवू आणि सुखी खाऊ . आपल्या घरात , आपल्या पंढरीत – पसाभर का होईना , आपल्या या जमिनीत ; जिथं जन्मलो , तिथंच आपली हाडं पडतील आणि तसंच व्हावं , असं म्हणत मांग घरोघर गेले.

-आणि पंधरा दिवसांनंतर पंत साताऱ्याला रवाना झाले .

विष्णुपंत कुलकर्णो साताऱ्यात पोचले , तेव्हा त्यांच्याबरोबर भैरू रामोशी होता . साताऱ्याचा घाट चढताच चोरांची फार भीती असते , म्हणून तो सनदी शिपाई या नात्यानं पंतांबरोबर गेला होता . कचेरीपुढं त्यांना दुलारी मांग भेटला . त्यानं पंतांना नीट ओळखलं नाही , मात्र भैरूला चटकन हेरलं आणि तो तावात पुढं आला .

” कंच्या गावचं ? ” त्यानं जवळजवळ आडवं उभं राहत विचारलं आणि पंत म्हणाले , ” आम्ही लांब तिकडे- ‘

” पर गावाला नावबीव हाय का न्हाय ? “

हे ऐकून भेरू चिडला . त्यानंही दुलारीला ओळखलं . तो काही तरी बोलणार , इतक्यात पंत म्हणाले , “ आम्ही वाटेगावचे . का ? तू कोण ? “

” मला वळाखलं का ? “

त्याचा हा प्रश्न ऐकून भैरू म्हणाला ,

‘ न्हाय वळाखलं . का ? तू कोन राजाबिजा हाईस , का काय ? “

” त्ये तुला आता दिसंल ! पन माजंच नाव हाय दुलारी वाघमारे . “

” तू कोणीही ऐस . वाट सोड ! ‘ ‘ पंतांचा आवाज चढला . “ तू कोण हे जाणून घ्यायला मी आलो नाही , मी प्रांतसाहेबांना भेटणार आहे ! “

” ह्येनं त्या दिशी मला मारलं . माळाच्या दगडाच्या पाया पडाय लावलं- ” दुलारी चिडून म्हणाला आणि मग पंतांच्या लक्षात आलं , की हा त्या दिवशी खोताबरोबर आला होता . यालाच पकडून चावडीत ठेवला होता व भैरूला बरोबर देऊन पाठविला होता . वाटेत भैरूनं याला मारलं , म्हणून हा चिडला आहे .

” मग तू का आला होतास ? ” पंत रागानं म्हणाले, ” आता वाट सोड , नाहीतर घोडं अंगावर घालीन ! ” त्यांनी टाच मारली आणि गडबड वाढली. अधिकारी बाहेर आले आणि दुलारी नमला. पंतांना प्रांतानं ओळखून कचेरीत नेलं. भैरू एका झाडाखाली बसला.

विष्णुपंत कुलकर्णी हा काटेकोर वृत्तीचा माणूस आहे, याची सरकारीअंमलदारांना कल्पना होती. त्याच्याशी बोलताना जपून बोलावं लागतं, हे लक्षात येऊनच प्रांतसाहेबांनी बोलावयास सुरुवात केली ,

” हं , बोला – कां येणं केलं होतं ? “

” मी दरवर्षी इकडं सज्जनगडावर येत असतो दर्शनाला . तसाच आलो होतो आणि तुम्हाकडेही एक गाहाणं घालायची पाळी आली- “

” मग बोला ना- काय गा – हाणं आहे ? ‘ ‘ प्रांत मध्येच म्हणाला , ” तुम्हाला पाहून मला आनंद झाला . सांगा , काय ? “

” माझ्या गावचा एक मांग आठ – दहा वर्षे बेळगावला नेऊन ठेवला आहे- “

” बरं , मग पुढं ? ‘ प्रांतानं टक लावून पाहत प्रश्न केला आणि पंत म्हणाले , ” तो माणूस सदनशीर शिपाई आहे . त्याला इनाम आहे , परंतु तो बेळगावात आहे- “

” ” याचं असं आहे … ” प्रांतानं मध्येच आपलं म्हणणं मांडलं , ” अशी माणसं वाईट असतात . त्यांच्या बाबतीत सरकार विचार करणार नाही . ‘

” अशी , म्हणजे कशी ? ‘ ‘ पंतांनी प्रश्न केला .

” अशी , म्हणजे चोरटी ? ” प्रांत शांतपणे बोलू लागला , “ ही माणसं भुरट्या चोऱ्या करून जनतेला हैराण करतात . त्यामुळे लोकांचा सरकारवरचा विश्वास उडतो आणि इतर बंडखोर प्रवृत्तींना चेव येतो . म्हणून अशी माणसं – नव्हे , ही जमातच डांबरट आहे . तिला क्षमा नाही ! “

” असं म्हणू नका . ‘ पंत समजावणीच्या स्वरात म्हणाले , “ सरसकट गव्हाबरोबर किडे रगडणं हा राज्यावरचा विश्वास दृढ करण्याचा मार्ग नव्हे , असं माझं मत आहे . सरकारनं दुःख बघूनच डाग देणं न्यायाला धरून होणार आहे . ‘

‘ “ मान्य आहे . ‘ प्रांत म्हणाला , ” अन्याय होऊ नये , याची आम्ही काळजी घेत आहोत- “

” मुळीच नाही ! ‘ ‘ पंत एकदम म्हणाले , ” तसंच असतं , तर सावळा मांग दहा वर्ष बेळगावला राहिलाच नसता . मुक्याचं जाणं कोण होत नाही .

” त्यानं त्या भागात अशांतता निर्माण केल्यामुळंच त्याला भुरटा चोर समजून -नव्हे , ठरवून –गुन्हेगार जमातीच्या कायद्यान्वये हद्दपार केलं आहे ! “

” त्यानं त्या भागात अशांतता निर्माण केली होती , याला पुरावा काय आहे ? ” पंतांनी मोजक्या शब्दांत प्रांताला पेच घातला आणि ” सावळा हद्दपार झाल्यापासून त्या भागात शांतता झाली आहे , असं सरकारचं मत आहे का? ‘ हा पंतांचा दुसरा सवाल ऐकून प्रांत बिचकला . तो म्हणाला ,

” त्याला गुन्हेगार जमातीचा कायदा- “

” पण तो इसम गुन्हेगार आहे का ? ” पंतांनी लगेच प्रश्न केला आणि प्रांत म्हणाला ,”

” मी स्पष्ट बोलू ? “

” जरूर – जरूर . “

तुम्ही गैर अर्थ काढू नका , ” प्रांत म्हणाला , “ मांग – रामोशी जातींना हाताशी धरून काही उच्चवर्णीय लोक बेबंदशाही निर्मित अाहेत . ते लोक खून – दरोडे करतात आणि हे प्रतिष्ठित लोक आपली घरं सोन्यानं भरतात नि तेच त्या गुन्हेगार लोकांचं समर्थन करीत सुटतात- “

” झालं तुमचं ‘ पंत अगदी शांतपणे म्हणाले , ” माझ्या भागात एकही दरोडा पडलेला नाही , तेव्हा माझ्या घरात सोनं येण्याचा संभाव उरत नाही आणि मी एका गुन्हेगाराचं समर्थन करण्यासाठी आलेलो नसून एका सनदशीर शिपायाची न्याय्य बाजू सरकारच्या कानावर घालण्यासाठी आलो आहे . हे समर्थन नसून मी म्हटलं , त्याचप्रमाणे हे गा – हाणं- “

” माझे शब्द तुम्हाला लागले . ” प्रांत दिलगिरीच्या स्वरात म्हणाला , ” परंतु माझ्या म्हणण्याचा असा अर्थ घेऊ नका- ‘

” नाही घेत . ‘ पंत चढत्या सुरात म्हणाले , “ ज्या जमातीला स्वतःच्या जातीचं नाव सांगणं ज्या कायद्यानं अशक्य करून ठेवलं आहे , त्या जातीचं समर्थन करणाराही दोषी मानला जाणार , याची मला कल्पना आहे ; परंतु समर्थन करीत नाही , हे लक्षात घेतलं , तर मी दोषी ठरत नाही . म्हणून माझी विनंती आहे की , सावळाची बाब गंभीर आहे . ती आपण विचारात घ्यावी . नाही तर त्याच्या जमिनीचा लिलाव करण्याची तरतूद

हे ऐकून प्रांत स्तब्ध झाला . थोडासा विचार करून तो म्हणाला , “ पंत , मी सावळाची चौकशी करतो- ‘ असं म्हणून तो थांबला आणि एकदम आठवून परत म्हणाला , ” आणि , हो परवाच तुमच्या गावच्या एका मांगानं म्हणे , त्या शिगावच्या खोताचा हात तोडला . याचा अर्थ काय ? हा काय प्रकार आहे ? सरकार या गोष्टीचा गंभीरपणे विचार करीत आहे .

” हे ऐकून पंत म्हणाले , “ मग मी म्हणतो , त्याही गोष्टीची तुम्ही खास नोंद घ्यावी , की त्याच खोतानं जोगणीची वाटी घेऊन निघालेल्या एका मांगाचं रिवाज मोडून आमच्या हद्दीत शिरून डोकं मारलं नि ते वेशीला टांगलं . ही फार लांबची गोष्ट नसून अवघ्या दहा वर्षांपूर्वीची आहे आणि तीच वाटी परत नेण्याचा प्रयत्न करीत असता त्याचा हातच मारला गेला ; डोकं नाही . त्याचं डोकं सहज मारता आलं असतं आणि धार्मिक बाब म्हणून कायदाही काही करू शकला नसता-

” प्रांत डोळे विस्फारीत म्हणाला ,

” तुमच्या गावचे मांग इतके लढाऊ आहेत ? “

-आणि छाती काढून पंत म्हणाले ,

” लढाऊ आहेत ; भुरटे नाहीत ! खोतानं ज्याचं शिर मारलं , त्याच्याच मुलानं खोताचा हात तोडला . मी म्हणतो , असा संयम पाळणारी जात दुसरी नाही ! ” “

क्रमशः
स्रोत:(फकिरा या अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading