दिनांक १८ ऑगस्ट,श्रीगोंदा:
राज्यातील मेंढपाळ बांधव अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात भटकंती करत आहे. स्वतःची शेती नसल्यामुळे व पुरेश्या चाऱ्या अभावी आपले गाव सोडून भटकंती करून पशुपालन करणाऱ्या मेंढपाळ बांधवांवरती अन्याय अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत.गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गावगुंड तसेच टवाळखोरांकडून होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण खूप वाढले असून. मूलतः बुजरा असणाऱ्या या बांधवांची बऱ्याच ठिकाणी तक्रार तर लांबच साधी दखल ही स्थानिक गावगुंड, राजकीय हस्तक्षेप व आर्थिक दबावामुळे स्थानिक प्रशासन घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
सध्याच्या स्थितीत राज्यात रोज अशी दोन ते तीन प्रकरणे कुठे ना कोठे घडत आहेत. शेती व्यवसाया प्रमाणेच फार मोठ्या प्रमाणात मेंढपाळी हा व्यवसाय राज्यात केला जातो. म्हणून, धनगर बांधवांकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी उत्तम भाऊ मदने यांनी श्रीगोंद्याच्या तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन आज सादर केले आहे.यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, धनगर बांधवांच्यावर होणारा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे. मेंढपाळबांधवांच्या हितासाठी व विकासासाठी विविध मागण्या मान्य झाल्या पाहिजेत. अशी आग्रही भूमिका ‘महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य’ यांच्यातर्फे या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मेंढपाळांवर अत्याचार हल्ला, अन्याय करणाऱ्यांवर अॅट्रोसिटी सारख्या स्वतंत्र कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि त्यांना त्वरित ५ लाखांचे अर्थसहाय्य मिळावे, मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात यावी, महाराष्ट्रासाठी चाराऊ कुरणे आरक्षित करून ती मेंढपाळांसाठी खुली करण्यात यावी व दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात, नैसर्गिक आपत्ती किंवा हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात आणि रस्ते अपघातात होणाऱ्या नुकसानीची भरपाई कोणतीही आडकाठी न येता त्वरित मेंढपाळांच्या खात्यात मिळावी, वेळोवेळी मेंढपाळ बांधवांची आरोग्य तपासणी होऊन मोफत इलाज व्हावा, मेंढपाळ बांधवाना मेंढ्या खरेदीसाठी विशेष अनुदान व बिनव्याजी कर्ज मिळावे, मेंढपाळ बांधवांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र होस्टेल्स तयार करण्यात यावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास उद्योजकता महामंडळावरती प्रत्यक्ष मेंढपाळबांधवाना संधी मिळावी आणि ज्या ज्या काही मेंढपाळबांधवांच्या हितासाठी व त्यांच्या विकासासाठी करता येईल त्या सर्व बाबी शासनाने लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतची मागणी ‘महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य’ यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
तहसीलदारांना या मागण्यांचे निवेदन सादर करताना ‘महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे’ तालुकाध्यक्ष उत्तम ‘भाऊ’ मदने, सुनील महानोर, आदेश शेंडगे, अमोल सरक, योगेश कारंडे, भाऊसाहेब कारंडे, धनराज कोरडकर, अनिल कोरडकर सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्रोत:(उत्तम भाऊ मदने यांचे प्रसिद्धी पत्र)
