फकिरा..
दळणच संपलं . तिनं आपल्या दळणाचा नि गीताचा शेवट केला :
सरलं माझं दळण , घास घालीते शेवटला आळविते देवा , दे आवुक्ष सत्याबाला ।।
जातं जोरात फिरलं , गदकन थांबलं आणि सत्तूनं निःश्वास टाकला . लोण्याप्रमाणे त्याचं काळीज वितळलं . त्याला भडभडून आलं . त्याचे ओठ थरारले …
— ” कुमजंत माझं काय आहे ? इथंच माझी कुमज आहे . इथंच माझी आई आहे ,
इथंच माझी बहीण आहे . ” हे ऐकून बरोबरची माणसं भांबावली .
गोंदा गोंधळी गंभीर चेहरा करून म्हणाला ,
” पन दिस उगवंल न्हवं ? ”
उगवू द्या . ” सत्तू म्हणाला , ” मला दिवस आणि रात्र सारखीच आहे ; परंतु ही माझ्यासाठी रोज सकाळी देवापुढं पदर पसरते ; मला आवुक मागते आणि मी तिला जन्मात पाहिली नाही . तिला पहिल्यावाचून मी कुमजला येनार न्हाय !
” हे ऐकून गोंधळी गोंधळला . त्यानं विचारलं ,
” मग काय करायचं म्हणता ? “
” जा आणि काकनासह कासार अन् लुगड्याच्या दुकानासह दुकानदार घेऊन या ! ‘ ‘ किंचित धावपळ झाली . “ सत्तू ‘ हे नाव ऐकून दुकानदाराची बोबडी वळली . लुगड्याचं दिंड बांधून तो चालू लागला . कासार पेटारा घेऊन आला आणि सत्तूनं दारावर थाप मारली .
” दार उघड- ”
” कोन हाय ? ” आतून ती बाई म्हणाली .
” कुमजंचा सत्याबा- ”
‘ सत्त्यबा ‘ हे नाव ऐकून ती पुढं झाली . तिनं दाराची कडी काढली आणि पिठानं भरलेले हात पुशीत ती त्याला पाहू लागली . सत्तूनं मटकन तिच्या पायांवर डोकं ठेवलं ”
ज्याला तू रोज आवुक मागतेस , तो हा कुमजंसा सत्या तुझ्या पायांवर डोकं ठेवीत आहे . ‘ ‘ सत्तू म्हणाला आणि त्या बाईच्या डोळ्यांतून दोन आनंदाश्रू त्याच्या पाठीवर पडले . पेठेत गडबड झाली . आळी उठली . हां हां म्हणता गाव गोळा झाला . लोकांनी सत्तूला सोप्यात बसवलं . त्याच्या नवख्या बहिणीनं आरती आणली आणि त्याला ओवाळलं .
‘ आज दिवाळीची भाऊबीज हाय . एक शेतकरी उद्गारला आणि सत्तू म्हणाला , ” अगदी भाऊबीजं दिवशीच मला बहीण मिळाली . ” त्यानं त्या आपल्या बहिणीपुढं पाच लुगडी ठेवली . तिला काकणं घातली , सुरती रुपयांनी तिची ओटी भरली आणि तो उठला . म्हणाला , ” मला आवुक मागत राहा मी जातो !
” ती काहीच बोलली नाही . तिचा कंठ उगीचच दाटला . आपला सख्खा भाऊ कुठं तरी दूर निघाला , असं तिला वाटलं आणि सत्तूनं नांदगाव सोडलं .
सूर्योदयाला सत्तू कुमजेत आला . त्याला पाहून आईला आनंद झाला . दिवाळीचा सण तिनं त्याला जेवू वाढला . बरोबरीच्या सर्व लोकांसह तो जेवू लागला . त्याला निघण्याची घाई होती . तेव्हा बणाबाई तक्रारीच्या सुरात म्हणाली ,
“ उगीच मारलास त्याला .
“ कुनाला ? ” सत्तूनं विचारलं .
” त्या चौघुल्याला ”
उगीच ? आनि त्यानं ती महारीन मारली असती , ती ? “
सरकारनं त्याला शिक्षा दिली असती- “
” अग , पन कधी ? ती बाई मेल्यानंतरच ना ? ” सत्तू मध्येच आईला अडवून म्हणाला , ” आनि एक नव्हे , दोन माणसं नाहक मेली असती . त्याऐवजी तो एकटा मेलेला वाईट न्हाई- “
” परंतु हा वनवास तुझ्या नशिबी आला ना ! ” आई दुःखी अंतःकरणानं म्हणाली ,
” तो एकटा मेला खरं , प …
..पन मी एकटा नाही . ” सत्तू म्हणाला , “ माझ्यासाठी दोन हजार मरतील . येऊ दे कुनीही . मी हयातभर लढत राहीन . मी फौज बनवून लढत राहीन . कारण मी चूक केलीच न्हाई ! “
बणाबाई गप्प झाली , पुन्हा बोलली नाही . जेवण झालं आणि सत्तूनं कुमजं सोडलं . संगंची माणसं पांगवली आणि गोंदा गोंधळी बरोबर घेऊन तो विश्रांतीसाठी बहादूरवाडीत बाबा न्हाव्याकडे गेला .
सत्तूचे अनेक इमानी मित्र होते . त्यांपैकी एक बाबा न्हावी हा होता . त्यानं सत्तूची सोय करून दिली . दुपारी सत्तू तिथेच झोपला . रात्रीच्या जागरणामुळे त्याला सडकून झोप आली आणि गोंदा पहारा करीत बसला . बाबा आपल्या उद्योगाला गेला .
किती तरी दिवस पातळीवर असलेल्या दादा पाटलाच्या गावातच वाघाच्या घळीत आयता सत्तू आल्याची बातमी पाळतीवरच्या लोकांनी दादाला दिली आणि त्याला आनंद झाला . त्यानं लगेच माणसांची जमवाजमव सुरू केली . एवढ्यात सत्तूचा पिच्छा करीत करीत उमा चौघुला येऊन दाखल झाला . त्यामुळं त्या दोघांनाही धीर आला आणि त्यांनी पन्नास माणसं घेऊन भर दुपारी त्या घराला गराडा दिला . उमानं आपल्या लोकांना सांगून ठेवलं : ‘ जिवंत नाही . तर मुडदा पकडा !
‘ घराभोवतीचा गलका ऐकून गोंधळी चरकला . त्यानं सत्तूला जागं केलं . दादा पाटलानं आणि उमा चौघुल्यानं घर वेढलं आहे , हे ऐकून सत्तू क्षणभर खिन्न झाला आणि लगेच त्यानं पुढची तरतूद केली . गोंदा गोंधळी भ्रमिष्टासारखा बाहेर पाहत होता . त्याला सत्तू म्हणाला , ‘
आता काय करायचं ?
” भाईर पडू या नि म्होरं यील , त्याला कांडलीत निघू या ! “
गोंधळी लढाईला तयार झाला . त्यानं कु – हाडीचा दांडा ठोकला आणि सत्तू म्हणाला ,
” तसं निघता येनार न्हाय . आपण दोन मानसं किती लढनार !
” हे ऐकून गोंधळ्याचा जोर एकदम ओसरला . तो गडबडीनं म्हणाला ,
” मग काय करू ? बोला ! “
” सत्तू विचार करून म्हणाला , “
” त्याचं सारं लक्ष माझ्यावर हाये . मी सरळ जाऊन त्यांच्या हवाली होतो . तुम्ही मागच्या दारानं बाहेर पडायचं आणि लगेच आपली माणसं जमवून या बहाद्दरवाडीला वेढा घालायचा . आकाराम नि आनंद पाटील यांनी बहादूरवाडीची पिसू बाहेर जाऊ द्यायची नाही – मी काय म्हणतो ते लक्षात येतंय ना ? “
” हो , हो . ‘ ‘ गोंदा म्हणाला . “
आनि तुम्ही लगेच वाटेगाव गाठा , फकिराला भेटा आणि त्याला हे सर्व सांगा- ‘ बोलता बोलता सत्तू गंभीर झाला आणि चटकन उठून आपली कु – हाड घेऊन म्हणाला , “ फकिराला सांगा , म्हनावं , कुमजंच्या सत्यावर हत्यारानं उपकार करन्यासाठी लवकर ये ! ”
” मग मी जाऊ ? ” गोंधळी चाचरला आणि सत्तू म्हणाला जा खरं ; परंतु मध्यानरात्रीपर्यंत फकिरा इथं आला पाहिजे . मी निघालो पुढं . ‘ असं म्हणून तो सरळ अंगणात येऊन उभा राहिला . कु – हाडीशिवाय सत्तू दारात आलेला पाहून उठलेल्या कु – हाडी दबल्या . पन्नास माणसांनी एकदम मुरकंड देऊन त्याला पकडला . तो जिवंत सापडला , म्हणून उमाला आनंद झाला ; परंतु हा वाघ एकाएकी इतका नरम कसा झाला , याचं आश्चर्य वाटून दादा पाटलाला धक्काच बसला . त्याचा चेहरा खर्रकन उतरला .
त्यांनी सतूच्या मुसक्या बांधल्या आणि लगेच तालुक्याला रवाना करण्याचा विचार केला ; परंतु भर दुपारी सत्तुला घेऊन जाणं सोपं नव्हतं . त्यात वाटेत सत्तूची माणसं हल्ला करतील , या भीतीनं सरकारात खबर देण्यासाठी एक माणूस पाठवून सरकारी मदत येईपर्यंत सत्तूला मळीला – नदीकाठाला – बांधून ठेवावा , असा बेत करून त्यांनी त्याप्रमाणे केलं . माणूस तालुक्याला गेला आणि उमा व दादा हे सत्तूला घेऊन दाट शेवऱ्यांतच नदीकाठी मदतीसाठी वाट पाहत बसले . पाच हजारातील आपल्या वाटणीला किती येणार , याचा कैक मनातल्या मनात आकडा जुळवीत होते .
रात्र उलटत होती . नदीकाठचा गारठा पिसाट झाला होता . शेवरीच्या बारीक पानांच्या दाट गर्दीतून चंद्रप्रकाश खाली उतरत नव्हता . त्यात आता चंद्र मावळण्याच्या बेतात होता . वारणाकाठ मलिन झाल्यासारखा वाटत होता . किंजाळ , उंबर , जांभूळ या झाडांच्या सावल्या अंधारात भर घालू लागल्या होत्या . नदीच्या धारेत मासे धडपडत होते . पाणी खळखळाट करीत होतं . कुठं तरी दरड ढासळून पडत होती . त्यामुळं खेकड्याच्या बिळात शेपटी घालून बसलेलं कोल्हं भिऊन भन्नाट पळत होतं . बाजूला दादा पाटील धोंगड्याची भाळ मागून कु – हाड पोटाशी धरून बसला होता . उमा भाकरीसाठी गावात गेला होता आणि एका मकाणाच्या खोपीत सत्तू निश्चल पडला होता .
गोंदा आता कुठं असेल ? त्यानं कुलूस कुठपर्यंत दौड केली असेल ? ठरल्याप्रमाणं झालं असलं तर ठीक , नाही तर मग मरण टळत नाही , असा तो विचार करीत होता .
इतक्यात उमा आला . त्यानं आणलेल्या भाकऱ्या लोक खाऊ लागले . तो दादा पाटलाजवळ जाऊन बसला आणि म्हणाला ,
” कसला विचार करता , पाटील ? “
” खरं सांगू ? सत्तूला पकडून इस्तू पदरात बांधून घेतल्यासारखं वाटू लागलंय- ”
” पर का ? ” उमा उत्साहानं म्हणाला , ” माणूस आता तालुक्यात पोहचला असला , तर सकाळपर्यंत बाबरखान फौजदार नक्की येईल . भिता का ? ”
” आपला माणूस तालुक्यात गेला असंल , असं कशावरून म्हणता ? ” दादा पाटील कण्हत म्हणाला , “ सत्तू हाती लागल्यापासनं मला धडकीच भरलीया . सत्त्या लस्करी मानूस हाय . काय करील , त्येचा नेम न्हाय . एकाएकी त्यो हातात आलाच का ? ”
या प्रश्नानं उमाही चरकला ; पण स्वतःला आणि दादा पाटलाला धीर देण्यासाठी म्हणाला ,
” पाटील , घाबरू नका .
‘ आता घाबरून काय करायचं ! ” दादा पाटील म्हणाला , ” पर जो इंग्रजांच्या डोईजड झाला , त्योच ह्यो सत्त्या हाय . जर का ह्यो गेला , तर वंशाला मानूसच ठिवनार न्हाय हे मातर..
या बोलण्यानं उमाला दादाची चीड झाली . तो खिन्न झाला . सूर्योदयापर्यंत आपण गुमान सत्तूचं डोकं मारून मोकळं व्हावं , असा एक विचार त्याच्या मनात आला आणि दादा पाटील म्हणाला ,
” सत्तूला आपून ठार जरी मारलं , तरी आपला जीव वाचत न्हाय- ”
आपल्या मनातील विचार याला ऐकू गेला , की काय अशी शंका येऊन उमा चटकन उठला . त्याबरोबर हा उमा सत्तूचा खून करील , अशी दादाला भीती वाटली.
फकिरा आणि गोंधळी माणसं जमवीत बहादूरवाडीच्या गावदरीला आले ” ” हे मातर … “
क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)
