फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग २).

फकिरा..

मध्येच पिंगळा किजबिजत होता . अस्सल नाग व्हला पक्ष्याची शिकार करण्यासाठी सरपटत होते , तर त्यांच्याशी हाडवैर बाळगणारी मुंगसं त्या नागावर रापत होती . काही ठिकाणी त्यांच्या झटापटीही सुरू झाल्या होत्या . सापाचं गुरगुरणं आणि मुंगसाचं चिरकणं ऐकून मांगांची पोरं गर्भगळित होऊन आयांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होती . पसरलेले पाय पोटाशी घट्ट धरीत होती . मृत्यू त्यांच्या उशापायथ्याला वळवळत होता .

तिथं किती माणसं आहेत , याची गावाला माहिती नव्हती . ती काय खाातात , याची कोणाला काळजी नव्हती . मात्र मांगवाडा त्या निवडुंगात आहे , हे सर्वांना माहीत होतं . ते सर्व सनदशीर शिपाई आहेत , गावाच्या राखणदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ते गावाचे नोकर आहेत , हे कायद्यानंही मान्य केलं होतं . गावात नि रानात जे काही होईल , त्याची जबाबदारी त्या मांगांवर होती . एक जरी पेंढी इकडची तिकडे गेली , तरी सनदशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता . ते दर दसऱ्याला मानाची तलवार पुजत , त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार याचं ऐक्य जगावेगळं झालं होतं .

ज्या वेळी त्यांना इनाम म्हणून जमीन दिली , त्यावेळी अवघी तीन घरं होती ; पण आता ती पन्नास झाली होती . जमीन पुरत नव्हती . सनदशीर शिपाई हा शिक्का कायम होता . शेतकीची अवजारं नव्हती आणि मांग पिचत होते .

आकाशातून पावसाच्या धारा लागल्या , की मांगाच्या डोळ्यातून आसू गळू लागत . मजुरीची दारं बंद होऊन भुकेची आग पेटे . पोरं रडू लागत . म्हातारी टाचा घासू लागत . तरणी कंबर बांधून पाणी पिऊन दिवस रेटीत . जुलमानं जगत . भीक मागणं अपमान मानणारी ही जात खुशाल भुकेकडे पाहत विचार करी . विचार करकरून दमे आणि मग तिच्यापुढे एकच मार्ग स्पष्ट होई .

सर्वजण एकत्र जमून हत्यारं काढीत आणि भर पावसात , भर मध्यान्ह रात्री घराबाहेर पडत . दूरदूर दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि जे हाती लागेल ते ओरबाडून अगदी जिवावर उदार होऊन लुटत नि परत येऊन त्या भुकेच्या जबड्यात लोटीत . ही तिथं वहिवाट पडली होती . एक दिवस नव्हे , तर दर वर्षी सुगी येईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत होतं . काहींचा सवयीनं तो धंदाच बनला होता . दारिद्र्यात वाईटाखेरीज दुसरं काय जन्मणार ?

पण त्या निवडुंगात माणसं मात्र दणदणीत निपजत . एकाआगळी एक . बळानं , शरीरानं , हिंमतीनं तराजूत घालून जोखून घ्यावी , अशी ती माणसं निपजत . निर्जीव कोळशाचा निखारा फुलावा किंवा पडीक जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगवावं , तशी ती वस्ती वाढत होती . दौलती मांग , आप्पा मांग , बहिरू मांग अशी वयानं पोक्त झालेली किती तरी माणसं त्या वस्तीत कर्ती होती . ते मांगवाड्यात आणि गावातही ढाण्या वाघासारखे गरजत . मी मी म्हणणारे त्यांना वरमत . त्याचप्रमाणे दौलतीचा राणोजी , बळी , पांडू , दगडू , निन्या , सावळ्या , गोंदा अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत .

दौलतीच्या वयानं आता पन्नाशी गाठीत आणली होती . त्याच्या रुबाबदार मिशीत आता पांढरे केस चमकत होते , पण त्याचा दणदणीत पीळदार देह टणक होता . त्यातील जुना वळ कायम होता . शिवाय आता त्याचा राणोजी हा कर्ता सवरता झाला होता . घर आणि सरकारी चाकरी तोच पाहत होता .

बायको राहीबाई , सून राधा , फकिरा आणि सहदेव हे दोन नातू आणि मुलगा राणोजी यांमुळं दौलतीचं घर आनंदानं भरलं होतं . तो आयुष्याचे उरलेले दिवस बेफिकीरपणे काढीत होता .

परंतु आज राणोजीला भलताच उशीर लागल्यानं तो बेचैन झाला होता . राहीबाई उदास होऊन बसली होती . फकिरा , सहदेव हे बापाची वाट पहात होते व तो अजून का येत नाही , म्हणून बाहेर पाहत आज्याला विचारीत होते . त्यांना देवाच्या गोष्टी सांगून राहीबाई वेळ मारून नेत होती . राधाबाई चुलीपुढं बसून कण्या शिजवीत होती . कण्या रटरटत होत्या आणि दौलतीचे कान घोड्याच्या टापा ऐकण्यासाठी आतुर झाले होते . दहा वर्षांचा फकिरा केविलवाणा चेहरा करून म्हणाला ,

” बाबा , गबऱ्या का यीना ?

” ” गबऱ्या आता पळत यील – तुज्या बापाला घिऊन .

” एकदा पेंढार लोकांची टोळी गावदरीला उतरली होती . त्यांपैकी एका पेंढारानं आपल्या घोडीचं शिंगरू दौलतीला दिलं होतं . त्या शिंगराचा दौलतीनं प्रचंड घोडा केला होता . लहानपणापासून त्याला पोराप्रमाणं जपून त्याचंच नाव गबऱ्या असं ठेवलं होतं . तो गबऱ्या साऱ्या गावाच्या ओळखीचा झाला होता . फकिरा आणि सहदेव हे ‘ बाप कधी येणार ‘ असं विचारण्याऐवजी ‘ गबऱ्या कधी येणार ‘ , असं विचारीत . त्यांचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाली असे . रोज गबऱ्या त्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताच मोठ्यानं खिंकाळे . त्याबरोबर पोरं आनंदून उड्या मारीत . गबऱ्याचं खिंकाळणं म्हणजे त्यांचा बाप येणं असं समीकरण झालं होतं . गबऱ्याच आपल्या बापाला घेऊन जातो आणि सांजेला घेऊन येतो ; म्हणून त्याचं लक्ष राणोजीच्या ऐवजी गबऱ्याच्या वाटेकडे लागून राहत असे .

राहीबाईच्या गोष्टी ‘ हूं ‘ म्हणून ऐकत बसलेली पोरं उगीचच ‘ हूं ‘ म्हणत होती . त्यांचं सारं लक्ष गबऱ्याला खिंकाळण्यावर होतं .

एवढ्यात गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेताना खिंकाळला : ‘ आलो आलो आम्ही !

‘ पोरांनी उठून उड्या मारल्या – आला गबऱ्या – आणि दारात येऊन गबऱ्या फुरफुरला . दौलतीनं लगाम धरून त्याला दावं लावलं . राणोजीनं तलवार पाखाडीत खोचली आणि पोरं बरगडीला बिलगली . राहीचा जीव भांड्यात पडला . राधा लाजली . चोरून पाहून मान फिरवली . दौलतीनं गबऱ्याची खंदाडी घरात आणली . अमाप मक्याची कणसं चुलीकडं पळाली आणि दौलती म्हणाला ,

” उशीर केलास ?

” ” झाला वाईच . पाटलानं थांबवलं .

” ‘ इजंवाऱ्याचं लवकर यायाचं . ” राहीबाई म्हणाली .

राधानं टवकारून पाहिलं . भाजलेली मक्याची कणसं घेऊन फकिरा व सहदेव बापाच्या दोन्ही मांड्यांवर बसून ऐकू लागले .

राधानं जेवणं वाढली . जेवता जेवता दौलतीनं बोलणं काढलं .

” काय म्हणीता पाटील ?

” ” काई न्हाय.शिगावच्या जोगण्याची कथा निघाली व्हती .

” ” पंतांची गाठ पडली का ?

” ” न्हाय . पर ही जोगणीची काय भानगड हाय , आबा ?

” ” भानगड कसली ? त्यो बारा बलुत्यांचा खेळ हाय . ” दौलती सांगू लागला , “

-दोन बैती नवरानवरी व्हयाची नित्येची वरात काढायची . नवरीपाशी खोबऱ्याची वाटी असती . ती पिवळ्या फडक्यात असती . जर ती वाटी कुनी पळवली , तर त्या गावची जत्रा बंद व्हायाची आणि ज्या गावात ती वाटी जाईल , त्या गावात जोगणीची जत्रा भरायची , असा रिवाज हाय . पर वाटी पळवनारा आपल्या हद्दीत घावला , तर त्याचं डोस्कं मारायचा बी रिवाज हाय .

‘ ” खोबऱ्याच्या वाटीसाठी डोस्कं मारत्यात ? ” फकिरानं दौलतीकडे रागानं बघत विचारलं आणि दौलती म्हणाला , ” ती नुसती वाटी न्हवं ; ती त्या गावाची अब्रू असती .

” ते ऐकून फकिरा राणोजीकडे वळून म्हणाला , ” आन की गा ती वाटी हिसकून !

” हे ऐकून सर्वच हसू लागले . राधा तर सर्वांत मोठ्यानं हसली आणि मग हळूच म्हणाली , ” बराच की हाईस . ती खोबऱ्याची वाटी खासील का ?

” ” हो हो . दे आणून . त्यात काई जड न्हाय . ” फकिरा गुरकला .

” आरं , पर वाटी हिसकनाराचं डोस्कं मारत्यात ! ” दौलती म्हणाला .

फकीरा कपाळावर आठ्या आणून बोलला ,

” आबा , मारू दे डोस्कं – तू ये वाटी हिसकून .

” फकिराचं हे बोलणं ऐकून पुन्हा घर हास्यानं भरलं .

हा पोर आपला जाती धर्म बोलत आहे , हे ऐकून राहीबाईला फारच आनंद झाला . ती हसत हसत म्हणाली , ” दीस बुडला , की मुताय जायला ह्येची लंगुटी सैल व्हतीया नि म्हणं , मारू दे डोस्कं -घेऊन ये वाटी .

” मग फकिरा वरमला . मुतायची भानगड म्हातारीनं चव्हाट्यावर आणली म्हणून तो नरम आला . राधा म्हणाली , ” मग जा की , आण जा ती वाटी .

” ” थांब . ” कणसाचा मका चावून तो म्हणाला , ” मी आबाएवढा झालो ,की आणूनच दावतो तुला .

राणोजीनं फकिराला जवळ ओढून पोटाशी धरलं . हसत हसत त्या सर्वांनी अंथरुणावर अंगं टाकली . फकिरा , सहदेव हे दोघे राणोजीच्या बरगड्यांना बिलगून झोपले . राणोजी मात्र जागाच होता . त्या दोघांवर दोन हात टाकून निश्चित पडून उद्याचा विचार करीत होता तो . त्याचं मन बेबंद त्याला घाबरवत होतं . ते कधी उठून पळत होतं , तर लगेच शिवारात शिरून भर जत्रेत हाणामारी करीत होतं . तर मध्येच गबऱ्यावर बसून भरधाव धावत होतं . घटकेत ते गप्प बसून विचार करू लागे :

जर आपण ती जोगणी आणली , तर या गावावर अनंत उपकार होतील . हे बाजीबानं केलं , ते एका मांगानं केलं , असं लोक म्हणतील . आपल्या गावात जत्रा भरेल . भोवतालचे लोक जत्रेत येतील . प्रत्येक माणूस म्हणेल- ‘ राणोजीनं ही जत्रा भरवली . ‘ शंकरराव पाटील ‘ शाबास ‘ म्हणेल . जग , जगलो तर पाठ थोपटील . आणि जर आपण … तर , तर नाव होईल . डंका वाजेल . गावासाठी गेला म्हणतील . मरण कधी तरी येणारच . ते जर जोगणी आणीत असता आलं , तर गावावर उपकार होतील . आपल्या अंगावरच्या जखमा गावाच्या काळजावरच्या मोहरा ठरतील . गबऱ्याच्या टापा कोरल्या जातील .

पण मग आई , आबा , फकिरा , साधू , राधा यांचं काय ? ती कशी जगणार ? म्हातारपणी त्यांना कोण ? पोरं मोठी व्हायला दहा वर्ष हवीत . तोवर हे पाच जीव कसे जगणार ?

काय होतंय त्यांना ? जगतील ती ! आपण नव्हतो , तेव्हाही माणसं जगतच होती की . पुढंही जगणार . आणि गावावर उपकार करणारा माणूस इथं जन्मला , याची पाटलाला खात्री वाटेल . विष्णुपंताला आनंद होईल .

राणोजी डोळे झाकून विचार करीत होता . हळूहळू अंधार निघून गेला . पहाट झाली . निवडुंगात पाखरं जागी झाली . त्यांनी किलबिलाट करीत पंख झाडली . पूर्वेला अनंत रंगांच्या लकेरी उमटल्या . पाऊस घेऊन आलेल्या काळ्या ढगातून तेजोमय अरुण डोकावू लागला . त्याला पाहून कोयल हर्षभरित झालं – कुहऽऽऽ ते ऐकून आल्हाददायी वारा भिरभिरला आणि निवडुंग उजाळलं .

सृष्टीच्या गालावर स्मित तरळलं . वारणेपासून कृष्णेपर्यंत सारा खोरा प्रकाशमय झाला . गावाच्या पश्चिमेला असलेला तो सातदरा पर्वत छाती काढून उभा राहिला . सर्वत्र हालचाल सुरू झाली . निर्भयता अवतीर्ण झाली आणि आज शिगावची जोगणी आणायचीच , असा निर्धार करून राणोजी उठला .

दुपार फिरली . राणोजी शिगावला निघाला . फकिरा , सहदेव यांना काखेत घेऊन गाडीवाटेपर्यंत येऊन चिंचेखाली थांबली . दौलती तलवार आणि गबऱ्याला घेऊन आला . पोरांना खाली ठेवून राणोजीनं तलवार घेतली . सहा बोटं रुंदीचं ते लखलखीत पल्लेदार पातं , वजनदार मूठ , मुठीला वीतभर बरच्याचं फाळ , माशी…

क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading