मोटिव्हेशन व्हिलेज हिवरे बाजार..

अहमदनगरपासून १६ किलोमीटर दूर असलेले हिवरे बाजार हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून हत्ती घोड्याच्या बाजारासाठी प्रसिध्द होते. त्यानंतरच्या काळात हिवरेबाजार अधोगतीला गेले. मात्र या खेड्यात पोपटराव पवार सारखा ध्येयवेडा खेळाडू पुढे आला. आपले गाव हेच आपले कुंटूब अन वैभव मानून निस्वार्थ भावनेने ग्रामविकासाचे पायलट प्रोजेक्ट राबविले. या प्रयत्नातून बाजार हिवरे एक स्मार्ट ग्रीन व्हिलेज म्हणून जगाच्या नकाशावर चमकले.

पुर्वीपासून समृद्ध असलेल्या या गावात वाढत्या शहरीकरणाचा प्रभाव पडला. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, अनियमित पाऊस, शेतमालाला मिळणारा कमी भाव, गावात रोजगार संधीचा अभाव, अंधश्रध्दा जुगार आणि दारू, अस्वच्छता यासारख्या समस्यांनी गावाला ग्रासले .

गावातील क्रिकेटची मैदाने गाजवणारे पोपटराव पवार हे पदवीधर झाले. १९९० च्या सुमारास आपली जन्मभुमी सुधारण्यासाठी क्रिकेटच्या मैदानातून पोपटराव पवार ग्रामविकासाच्या मैदानात उतरले. गावातील नागरिक तरुण मित्रांच्या मनाची मशागत केली. पोपटराव पवार बिनविरोध सरपंच झाले. त्यांनी कागदावरची ग्रामसभा पारावर आणली . विकासाचे नियोजन सुरू झाले .

पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाणलोट क्षेत्राचा विकास करण्यासाठी डोंगर, पडीक तसेच गायरान जमिनीवर वृक्ष लागवड केली . दरवर्षी प्रतिमाणसी एक झाड लावण्याचा संकल्प राबविला. त्यातून स्मृतिवन विकसित झाले. गावातील मृत व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण व संवर्धन सुरू केले . हे गाव एव्हरग्रीन झाले .

१९९० पूर्वी ९० ते १४० फुटावर लागणारे पाणी आता ३५ ते ६० फुटावर आले. गावात ३१८ विहिरींचा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम पाझर तलाव, शेततळी भरून वाहू लागली. माथा ते पायथा या पद्धतीने पाणी अडवले. पाण्याचा संचय वाढल्यामुळे दुष्काळाला दूर ठेवण्यात गाव यशस्वी झालं. पाणी आलं तसं समृद्धी आली. गावची अर्थव्यवस्था सुधारली.

गावात सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. सेंद्रीय शेती उपक्रम गावामध्ये सुरू केला. वाढीव लाभ पाहून गावातील इतर शेतकरीही सेंद्रीय शेतीकडे वळाले . गावात खरीप- रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन एकत्रित केले जाते. गावातील ३०० कुंटुबांपैकी ९७ कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न आज पाच लाख रुपयांपर्यंत आहे. ७० कुटुंबाचे उत्पन्न ५ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. १० लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाची संख्या ५६ असून गावातील साक्षरता दर ९५ टक्के इतका आहे. ९५ शेतकऱ्यांकडे ड्रीप आणि स्प्रिंक्लरची व्यवस्था आहे . गावाचे दरडोई वार्षिक उत्पन्न ९९ हजार रुपयांच्या घरात गेले आहे. गाव सोडून गेलेली ४८ कुटुंबे पुन्हा गावी परतली. गावात दुग्धव्यवसायाला चालना देण्यात आली. चारा डेपो, डेअरी तयार करण्यात आली . याचा परिणाम जनावरांची संख्या वाढली. यामुळे आज ४ ते ५ हजार लिटर दूधाचे संकलन होत आहे .

गावात विवाहापूर्वी मुला – मुलींची एच.आय.व्ही चाचणी करणे बंधनकारक आहे. संपूर्ण गावाची एकाचवेळी शेतजमीन मोजणी करण्याचे अनोखे कामही गावाने केलं आहे. एक गाव एक स्मशानभूमी सारखा उपक्रम राबविताना पोपटराव पवारांना मिळालेल्या दलित मित्र पुरस्काराच्या रकमेतून मागासवर्गीय कुटुंबांना स्नानगृहे बांधण्यासाठी मदत करण्यात आली. गावात गेल्या दहा वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जाते. गावात तंटा नाही की दारू. गावात दारु तसेच गुटखाबंदीची १०० टक्के अंमलबजावणी केली जाते. गावातील दुकानात गुटखा, तंबाखु, सिगारेट विक्रीला बंदी आहे. ग्रामसभेने तसा केवळ ठराव केला असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणीही केली जाते. ग्रामविकासाच्या सर्व कामात आणि समित्यांमध्ये महिलांचा सहभाग आहे. गाव, गावठाण, रस्ते, वस्त्यांच्या स्वच्छतेमध्ये सगळा गाव एक होऊन काम करतो. गाव पूर्ण हागणदारीमुक्त असून शौचालय गोबरगॅसला जोडून त्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात आला आहे. एक मुल एक झाड, बालवृक्षमित्र पुरस्कार, चराई बंदी, कुऱ्हाड बंदी सारख्या उपक्रमाबरोबरच गावात लग्नवरात आणि बॅन्जोला मनाई आहे. गावाला अनेक मान – सन्मान आणि पुरस्कारांनी गौरविले आहे.

देश विदेशातून गावाला दररोज ४०० ते ५०० लोक भेट देतात. १९९० पासून बाजार हिवरे गावाने पोपटराव पवार यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्यांनी माय इज माय फॅमिली हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गावात जीव ओतला. त्यामुळे गाव आणि गावातील कुटुंब समृध्द झाली. त्यामुळे ग्राम विकासाच्या चळवळीत हिवरे बाजार व्हिलेज हे मॉडेल व्हिलेज ठरले. ही किमया पोपटराव पवार यांच्या राजकारण विरहीत विचाराने साध्य झाली. महाराष्ट्र शासनाने आदर्श गाव, यशवंत ग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, महात्मा गांधी तंटामुक्ती, राजमाता भारत सरकारने निर्मल ग्राम, वनग्राम, राष्ट्रीय जल पुरस्कार देऊन हिवरे बाजारच्या ग्राम विकासाला सलाम केला.

कृषी क्षेत्रासमोरील पाणी ही मोठी समस्या आहे. पाणी उपशाच्या प्रमाणात पाणी जमीनीत मुरविले अथवा साठवले जात नाही. त्यामुळे कृषी व्यवसाय अडचणीत सापडला आहे. गेल्या चार वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलशिवार अभियानाची लोकचळवळ महाराष्ट्रात उभी केली. याचे भविष्यात चांगले परिणाम दिसून येणार आहेत . त्यासाठी चळवळ अधिक व्यापक करावी लागणार आहे . चळवळ व्यापक झाली तरच खेडी आणि शेतकऱ्यांचे अस्तित्व कायम राहील.

पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव समिती

शब्दांकन : नागेश सोनवणे, प्रतिनिधी, लोकमत
(स्रोत:अग्निपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading