फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग २०).

फकिरा..

” न्हाय , रं बाबा . ” राधा म्हणाली , ” घरात आत्या हायती . त्येंच्यानं काम व्हत न्हाय नि या घरात भूत नाचतंय , त्येला कुटं सोडू ? ”

” त्येची नकं काळजी करू . ‘ पिराजी म्हणाला , ” तू आत्याला बी घे संग नि चल . फकिराची काळजी करू नकं . त्या भुताला मी मंतीर मारतो .

” पिरानं फारच आग्रह केला आणि एक चाकोरीत कैक वर्ष काढून कंटाळा आलेली राधा चिंचणीला गेली . ती राहीलाही घेऊन गेली .

ऐन डोंगराच्या पायथ्याला परबती मांगाचं घर होतं . अगदी सह्याद्रीच्या कवळ्यातच चिंचणी वसली होती . सभोवतालची घनदाट झाडी , उंच डोंगर , बाजूला असलेलं कुरण – राधाला ते सारं नवंनवंच वाटलं . त्यात परबतीचा संसारही नेटका होता . पिराजी , त्याची बायको , एक मूल आणि नुकतीच वयात आलेली पिराजीची बहीण सरूबाई . साठ वर्षांचा म्हातारा परबती आणि म्हातारी . ही सारी माणसं कशी एका माळेत ओवलेल्या मण्यांसारखी वागत होती .

दोन दिवस सरूबाईची आणि राधाची चांगली ओळख झाली . फकिराची आई म्हणून परबती मोठ्या आदरानं तिच्याकडे पाहू लागला . एकदा दोनदा तो बोलता बोलता बोलूनही गेला ,

” बाई , तू साधी न्हाईस – तू एका वाघाची आई हाईस ! ”

हे ऐकून राधाच्या अंगावर मूळभर मांस चढल्यासारखं झालं . फकिराबद्दल तिला अभिमान वाटू लागला .

परबतीचा तो संसार , ते घर , पिराजीचं मूल हे सारं पाहून राधाच्या मनात नवाच विचार घोळू लागला जर फकिराचं लग्न केलं , तर त्यालाही मूल होईल . तोही संसाराला लागेल आणि आयाबाया सांगतात , तसंच का होणार नाही ? लोक म्हणतात , स्त्री ही पुरुषाची वेसण असते . मग आपण फकिराला

राधाला सरूबाईचा गोड स्वभाव , रंगरूप , सर्व काही पसंत पडलं . ही सरू आपली जर सून झाली , तर उभ्या गावात उजवी ठरेल , असा विचार करून एके दिवशी तिनं पिराजीला बाजूला नेऊन आपला हेतू सांगितला .

” पिराजी , एक गोष्ट बोलू ? “

” आक्का , इचारू नगं . मला माग . ” पिराजी म्हणाला , “ माझं डोस्कं कापून पायावर ठिवीन मी ! ”

” नगं मला डोस्कं तुझं . ‘ राधा म्हणाली , ” मला सरू देऊन टाक ! मी फकिराचं लगीन करत्ये . “

” तुला सून पटली ! ”

” हो . मला पटली . ”

” रंगानं – रूपानं , गुनानं !

“” साऱ्यानं – साऱ्यानं , बाबा …

” मग लगीच घेऊन जा निलाव लगीन बरं ! “

” म्हंजी तू नामानिराळाच . बरा हाईस की ! “

मग मी काय करू , ते सांग . “

” तू ह्या लग्नात काय करनार ? “

” काय करू ? बोलिवलंस , पर पोळ्या खाईन … ”

” म्हंजी माज्या आयत्या पोळ्या खानार तू ? “

‘ मग सांग , काय , करू त्ये !

” ” लगीनच करून देऊ ! “

” न्हवं . लगीन माझ्या दारात झालं पाहिजे . ”

” मग सारं सामान घेऊन येतो नि तितं करतो . “

” मग जमलं , ” राधा हरखून म्हणाली , ” बाबास्नी इचार सांजेला . ”

” त्येला काय इचारायचं ? ” पिराजी म्हणाला , ” ही बातमी ऐकून आबा । टिरीनं ढोलकं वाजवील . तयारी कर . सारं लागंल , त्येला गाडीत भरती चल . नवरी तुझी . नवरा तुझा . हे घर बी तुझं ! ”

राधाचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि जेव्हा संध्याकाळी ही गोष्ट परबतीला व इतरांना समजली , तेव्हा सर्वांचे चेहरे हर्षानं मोहोरलं . सरू लाजून चूर झाली .

फकिराचं लग्न निश्चित करून राधा जलदीनंच परतली . फकिराच्या कपाळाचं बाशिंग आपण आता लौकरच पाहणार , या गोड विचारात त्या सासू – सूना देहभान हरपल्या होत्या . आता आपण सासू नि आजेसासू होऊन सून आणि नातसून दोघी आपल्या हाताखाली घेणार – केवढं हे आपलं नशीब ! या कल्पनेनं राहीबाई मनातल्या मनात हसत होती .

राधाबाई नि राहीबाई दोघी कह आल्या . पिराजी त्यांना पोचवण्यासाठी गाडी घेऊन निघाला होता . तो बैलांना सारखा दाबीत होता . ऐन दुपारी त्यानं कृष्णा गाठली आणि भाकरी खाण्यासाठी वाळवंटावर गाडी सोडली .

कृष्णाकाठच्या आंबराईत दूरदूरचे वाटसरू बसले होते . कोण जेवण करीत होते , कोण चुली पेटवून पीठ मळत होते , तर कोणी भाकरी खाऊन सावलीत आराम करीत होते . राधा , राही , पिराजी यांनी दुपारचं जेवण त्या सावलीत उरकलं , त्याच वेळी दूर कुठं तरी तापसरीचा भयंकर रोग आला असून मुंगीप्रमाणं माणसं मरत असल्याचं ते वाटसरू एकमेकांत बोलताना राधानं ऐकलं आणि तिचं काळीज चरकलं . एक – दोन दिवसांच्या तापात माणूस मरतं , हे ऐकून तर तिला भीती वाटली . फकिराच्या लग्नाच्या कल्पनेनं मोहरलेलं तिचं मन ही तापसरीची बातमी ऐकूनकाळवंडलं , ती खिन्न झाली . तिला त्या आंबराईत बसवेना . तिनं पिराजीला सांगून गाडी जुंपली आणि घर जवळ केलं .

आली आली म्हणता कार्तिकी पौर्णिमा आली . सर्वत्र तुळशीची लग्नं लागली आणि मग लग्नसराई सुरू झाली . पहिलीच तिथी धरून राधानं फकिराचं लग्न उरकून घेतलं . भोवतालच्या वीस गावात कुणाचं झालं नसेल , असं फकिराचं लग्न झालं . इंग्रजी लष्कराला हुलकावण्या देत स्वतः सत्तू दोनशे माणसांसह लग्नाला आला होता . त्यानं सुरती रुपयांनी नवरानवरीची ओटी भरली . उभा गाव फकिरावर तांदूळ टाकायला राधाच्या दारात आला . स्वतः विष्णुपंत , शंकरराव पाटील ह्या मंडळींनी देखरेख केली आणि त्या वेळी प्रत्येकाच्या डोळ्यांपुढे माळानं गबऱ्याला घेऊन दौडत येणारा राणोजी तरळला . दौलती आणि राहीबाई यांनाच वरबाप वरमाईचा मान मिळाला . त्यांनीच मळवट भरला . राधा विधवा होती , परंतु ती आनंदात होती . तिला कुंकवाचं दुःख वाटत नव्हतं .

सावळा तर मुख्य कारभारी होता . घमांडी , मुरा , बळी , साधू ही मंडळी आलेल्या पाहुण्यांची उस्तवारी करीत होती . फकिराच्या कपाळी पाच दिवस बाशिंग ठेवायचं , असा राधाचा निर्धार होता .

नवरा – नवरी बरोबर गेली . सर्व थोरांना मान दिला आणि लग्न संपलं .

आपण एक महान कार्य पार पाडलं , असं राधा , दौलती , राही यांना वाटलं . दौलती नि राहीबाई यांनी बोलून दाखवलं ,

” आता फकिराचं बाशिंग ह्या डोळ्यांनी बघितलं . आता ह्ये कवाबी झाकू दे . आम्ही तयारी केलीया- “

कार्तिक महिन्यापासून वैशाखापर्यंत सहा महिने फकिरा घर सोडून कुठंही गेला नाही . राधाचं काळीज डोंगराएवढं झालं . लग्नाला आलेली सरूबाई चारच दिवस माहेरी जाऊन लगेच परत आली होती . ती राधाला काहीच काम करू देत नव्हती . सारं घर एकटीच आवरीत होती . त्यामुळं आम्ही जे पूर्वी कष्ट काढले , त्यासाठी आता देवानं आम्हाला सुखच द्यायला विचार केला आहे , असं राधा , राहीबाई , दौलती यांना वाटू लागलं होतं ; परंतु आता साधूवरही चार तांदूळ पडलेले पाहावे , हा विचार काही त्या तिघांना सोडीत नव्हता .

सहा महिन्यांपूर्वी दूर कुठं तरी चालू झालेली तापसरी आता अगदी जवळ आल्याची बोलवा सुरू झाली होती . लोक काजबारले होते . मरणाच्या भयंकर कल्पना त्या खोऱ्यातून प्रत्येक माणसाच्या मनात नाचत होत्या . त्यातच गावंच्या गावं , घरच्या घरं बसल्याच्या कथा एक दुसऱ्याला सांगत होते .

– आणि ते खरंही होतं . ती साथ अति उग्र स्वरूप धारण करून इंच इंच जमीन व्यापीत पुढं पुढं सरकत होती आणि गावात साथ पसरताच भरला संसारजिथल्या तिथं टाकून लोक सैरावैरा पळत होते . जणू त्यांच्यासाठी भयंकर वणवाच लागला होता . जो पळत नव्हता , तो निश्चित मरत होता . शंभरात फक्त दहाच कशीबशी वाचत होती . मरणारांना पुरण्यासाठी माणसं उरत नव्हती . घरातील सर्वच माणसं एकदम तापसरीचं भक्ष्य होत होती . मग त्या घरात कोण मरण पावला , हे पाहण्यासाठीही कुणाला शुद्ध उरत नव्हती .

या भयंकर साथीची बातमी ऐकून राधाचं काळीज पुन्हा चरकलं . दौलती हबकला . राहीबाई घाबरली आणि त्या तिघांच्याही पुढं एकच प्रश्न नाचू लागला .

” -आम्ही कुसळं वाढवून मेरू घडवला ; पण आता ह्या तापाच्या साथीत तो मेरू टिकाव धरणार का ? ”

ही साथीची भयंकर भीती पाठीवर टाकून माणसं कसा तरी धीर धरत होती ; परंतु पुन्हा दुसऱ्या एका तितक्याच भयंकर संकटानं मानवावर आक्रमण सुरू केलं.

ज्येष्ठ महिना मार्ग गेला . मृग नक्षत्र निघालं . माणसांनी चपळाई करून आपापल्या जमिनी पेरून टाकल्या आणि येणाऱ्या साथीला तोंड देण्यासाठी मनाची तयारी केली.

आकाशात ढगांनी प्रचंड धडपड केली. अक्राळविक्राळ ढग गगनात जमले व लगेच लोळत दूर निघून गेले . एकही थेंब पृथ्वीवर पडला नाही . मृग नक्षत्र कोरडं ठाण निघून गेलं . मृग नक्षत्रानं दगा दिला ; पण पुढील नक्षत्र काही असंच कोरडं जाणार नाही , असा विचार करून माणसांनी कोलमडणाऱ्या मनाला आशेचा धीर दिला , पण …

पण दुसरंही नक्षत्रं आलं तसंच गेलं . मग मात्र हाहाकार उडाला . आषाढ कोरडा गेला नि धूळ उडू लागली . वळावानं उगवलेली गवतं मातीत एकरूप झाली . मातीत पेरलेलं बी पाखरांनी उकरून खाऊन त्याचा माग बुजवला आणि भयंकर दुष्काळ सुरू झाला .

सुंदर प्रदेश भकास झाला . एक भयंकर आग सर्व काही जाळून जावी , तशी स्थिती झाली . माणसं हंबरू लागली . गुरं हाडं – चिंध्या खाऊ लागली .

रोग , दुष्काळ आणि मृत्यू हे हातात हात घालून सर्वश्रेष्ठ मानवतेला चिरडीत निघाले आणि मृत्यूचं उग्र तांडव वाटेगावच्या समीप आलं . उपाशी माणसांवर साथीनं सहज कबजा केला . घरच्या घरं कण्हू लागली . दुष्काळानं केवळ हाडांचे सापळे केलेली माणसं गारद करायला मृत्यूला सोपं झालं .

वाटेगावात माणसं मरू लागली. दाही दिशांना अंधार दाटला. लोकांना वालीच उरला नाही. सुरुवातीला मसणवटात काही चिता जळाल्या; पण लवकरच लाकडांची टंचाई आली आणि मग मढी मातीआड करण्याचीच सर्वांवर पाळी आली; परंतु लौकरच तोही प्रश्न बिकट झाला. दुष्काळातील उपासमारीनं अस्थिपंजर झालेल्या माणसांना दुसऱ्यासाठी खड्डा खणणं अवघड झालं. मग एका एका गोरीत बसतील तितकी मढी गाडली जाऊ लागली .

क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading