श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील एक नावाजलेली शाळा. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाची विद्याधाम प्रशाला . प्रशालेची स्थापना जून १९६४ रोजी झाली. शाळा सुरू झाली पण इमारत नव्हती . गावातील वाड्यामध्ये ज्ञानार्जनाचा श्रीगणेशा झाला. देवदैठण, पाडळी, कडूस, ढवळगाव, राजापूर, हिंगणी, पिंप्री कोलंदर अशा अनेक ठिकाणची शाळेच्या इमारतीची गरज ओळखून संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष किसनभाऊ बरमेचा, सचिव गुरुवर्य गो. ना. वाघ यांनी इमारतीसाठी प्रयत्न सुरू केले. ज्ञानदेव अलभर, माजी सरपंच चिमाजी बनकर यांचेही योगदान मोठे होते. संत निबंराज महाराजांचे वंशज चैतन्यबुवा निंबराज दंडवते यांनी स्वमालकीची जागा उपलब्ध करून दिली. देवदैठण ग्रामस्थांच्या लोकसहभागातून व श्रमदानातून सिद्ध नदीच्या काठी पावन भूमीत शाळेची टुमदार इमारत उभी राहिली.
मो जक्या विद्यार्थी संख्येवर सुरू झालेल्या शाळेत आज अकराशे विद्यार्थी संस्कारक्षम शिक्षण घेत आहेत. ५५ वर्षापुर्वी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. या शाळेतून शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर्स, राजकीय पदाधिकारी, सैनिक, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, खेळाडू , कलाकार , उत्तम शेतकरी घडत आहेत. वेळोवेळी संस्थेचे अध्यक्ष सुकुमार बोरा, सचिव तु. म. परदेशी, शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र भटेवरा सातत्याने शाळेच्या गुणवत्तेकडे लक्ष देतात. या ज्ञानमंदिराची घडी बसविण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडली ती शाळेच्या मुख्याध्यापकांनी. यामध्ये किसन जगताप, लालासाहेब गावडे, धनाजी खरमाटे व संभाजी शेळके या सर्व मुख्याध्यापकांच्या अथक प्रयत्नातून नंदनवन फुलत गेले. श्रीराम बडवे व शांता पडवळ यांनी आपली सगळी नोकरी या एकाच शाळेत करून तीन पिढ्यांना ज्ञानदान केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा, निबंध स्पर्धा, सरकारी चित्रकला परीक्षा, गायन, वादन, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, अपूर्व विज्ञान सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मागील वर्षी श्रीगोंदा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते. गणेशोत्सव साजरा होत असताना आकर्षक लेझीम पथक, ढोल पथकातील विद्यार्थी कार्यक्रमाची शान वाढवतात. प्रशालेत कलाशिक्षक संदीप वेताळ, सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गीतमंचाची स्थापना झाली असून राष्ट्रीय उत्सव , विविध कार्यक्रमांची शोभा वाढवण्याचे काम सुरेल स्वागतगीतांच्या माध्यमातून विद्यार्थीनी करतात. गीत मंचच्या विद्याथीर्नीनी गायलेल्या गीतांचे प्रसारण अहमदनगर आकाशवाणी केंद्रावरून करण्यात आले. विज्ञान शिक्षक प्रमोद रुपनर व इतर शिक्षकांच्या सहकार्याने’ अपूर्व विज्ञान प्रदर्शन सोहळा ‘आयोजित केला जातो. शिक्षिका संजया नितनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर येथील राज्यस्तरीय गुरुवर्य गो.ना. वाघ स्मृतीवक्तृत्व स्पर्धा, नगर येथील कथाकथन व सकाळ नाट्य वाचन स्पर्धा विद्यार्थ्यांनी गाजवल्या. प्रशालेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून भरघोस यश मिळवतात. विद्यार्थी संगणक साक्षर होण्यासाठी सुसज्ज संगणक लॅब, तसेच प्रयोगशाळा उपलब्ध आहे.
प्रशालेच्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाची यशस्वी परंपरा तर सुरूच आहे. दहावीमध्ये २०१६-१७ साली शिल्पा अरुण गायकवाड हिने १०० % गुण संपादन करून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला. निवेदिता शिंदे, मेघा शेळके यांनी गणित विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले . क्रीडा शिक्षक संदीप घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू तयार झाले. केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत प्रशालेची खेळाडू विद्या सुभाष साठे हीने तिहेरी उडी क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत तिहेरी उडी क्रीडा प्रकारात वंदना आबा ढवळे, शिल्पा अरुण गायकवाड, वैष्णवी मल्हारी वाघमारे यांनी व पिंगल मल्हारी वाघमारे हिने रिले या प्रकारात कांस्यपदक मिळवले. गोरख वीर, राहूल खेडकर, ज्योती वाघमारे, गणेश अलभर, संजय वाळके हे खेळाडू राज्यस्तरापर्यंत पोहचले. क्रीडा शिक्षक अमोल कातोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीच्या मुले व मुलींच्या संघाने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर आपला दबदबा निर्माण केला. मुलींच्या संघाने विभागस्तरीय स्तरापर्यंत मजल मारली . वाघोली येथे आयोजित राज्यस्तरीय मल्हार करंडक – २०१७ या स्पर्धेत शंभर शाळांचा समावेश असताना या स्पर्धेत ‘ सर्वसाधारण विजेतेपदाचा मान प्रशालेने मिळवला. अग्नीपंख आयोजित एक मुठ धान्य… अनाथांसाठी या उपक्रमातून १५ पोते धान्य जमा केले. रंभा विराट व प्रदीप पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट स्काऊट गाईड पथक कार्यरत आहे . अनेक गाईड विद्यार्थीनी राज्य पुरस्कारास पात्र ठरल्या आहेत .
शाळेचे मा. मुख्याध्यापक लालासाहेब गावडे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्य शासनाचा आदर्श मुख्याध्यापक तसेच वनश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. मा. मुख्याध्यापक धनाजी खरमाटे यांना आदर्श मुख्याध्यापक मिळाला. क्रीडा शिक्षक संदीप घावटे यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. राहूल कौठाळे यांनी नागरी सेवेत, संदीप पोपट बोरगे चित्रपट क्षेत्रात, प्रतिक राजेश अलभर यांनी नेव्हीमध्ये तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉ. मगन ससाणे, डॉ. विकास कौठाळे यांनी यश मिळविले आहे. नितीन बबन बनकर संशोधन क्षेत्रात काम करत आहेत. अजय कौठाळे, प्रीतम कौठाळे, प्रविण वेताळ, राहूल खेडकर, नारायण करंजुले, अभिजीत भालेराव, सौरभ सातव, दत्तात्रय साबळे, संपत ससाणे हे विद्यार्थी शाळेचे नाव रोशन करत आहेत. स्वप्निल सिताराम भवर याने राष्ट्रीय नेमबाजीमध्ये यश मिळविले. संतोष छबन जाधव आणि अशोक हरकचंद कोठाळे यांना सैन्यदलात असताना वीरमरण आले. अशोक कोकाटे, रविंद्र कळमकर, बाळासाहेब बनकर, मोहन बनकर, नामदेव कौठाळे पोलीस दलात कार्यरत आहेत. अशा अनेक माजी विद्यार्थ्यांनी जगभरात शाळेच्या नावलौकीकात भर घातली आहे.
अग्निपंख फाउंडेशन श्रीगोंदा, सुरभी बहुउद्देशीय संस्था देवदैठण, सेवाप्रीत फाऊंडेशन अहमदनगर, आमदार राहूल जगताप, डॉ. विश्वजीत चव्हाण पाटील (पुणे), किर्ती दादा ओसवाल, लक्ष्मीकांत दंडवते, पत्रकार दिपक वाघमारे, महेश बंडगर, प्रशांत शिंदे, विश्वास गुंजाळ, कमलताई सावंत, वसंत बनकर, प्रकाश कौठाळे, अतुल लोखंडे, सुभाष वाघमारे, सर्जेराव कौठाळे, राजेंद्र कौठाळे, सिताराम भवर, चांगदेव वाघमारे, पोपट कौठाळे, वेदांत कॉम्प्युटर, सिद्धी क्लासेस बेलवंडी यांनी मोलाची मदत केली आहे .
शब्दांकन: संदीप घावटे, लोकमत प्रतिनिधी.
शाळेचा नावलौकीक वाढला आहे. हे श्रेय शिक्षक, सेवक, विद्यार्थी यांना जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी संस्कारक्षम शिक्षण देण्यावर भर आहे. शिक्षण, खेळ, कला, गायन, वादन यात शाळा परिपूर्ण आहे. भविष्यातही अशीच गुणवत्ता जपण्याचा प्रयत्न करू. संभाजी शेळके, मुख्याध्यापक..
(प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशित झालेल्या वेळेची आहे.)
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
