फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग २१).

फकिरा..

– आणि मग डोंगरातील कोल्ही , लांडगे यांनी गावदरीलाच तळ दिला . वैरण न मिळाल्यामुळे मेलेली गुरं खाऊन गावची कुत्री माजली आणि सर्वत्र कोल्ह्या – कुत्र्यांचं राज्य प्रस्थापित झालं .

उभा मांगवाडा साथीनं कण्हत पडला होता . जे कोणी उभे होते , ते पोटासाठी धडपडत होते . म्हातारी टाचा घासून खळ्या खणीत होती आणि राधाबाई व सरू घरी दाणे दळून घरोघर तरवणी पुरवीत होत्या . आजाऱ्यांची सेवा करीत होत्या . जे काही जवळ होतं , ते शेवटपर्यंत मांगवाड्यात सर्वांना चारून मग एकदम आपण सर्वच उपाशी मरायचं , असा त्या दोघांनीही निर्धार केला होता .

आणि फकिरा , सावळा , साधू , मुरा मरणारांसाठी गोरी खणून हैराण झाले होते . एकट्या मांगांचीच नव्हे , तर उभ्या गावाची मढी पुरण्याचं काम त्यांच्याकडे आलं होतं . मरणानं जातिभेद नष्ट केला होता .

दुपारची वेळ होती . वातावरण तप्त झालं होतं . फकिरा नुकताच येऊन बसला होता . सरू व राधा याही आल्या होत्या . दौलती व राहीबाई एका जागी बसून कोण कोण मेलं , याची चौकशी करीत होते . इतक्यात मोक्या आला . म्हणाला ,

“ दाजी हाय काय ? ‘

” हाय – या ? ” फकिरा म्हणाला.

” आता कशाला येऊ ? चिंगा म्हातारी गेली- ”

” मग चला तर- ” असं म्हणून फकिरा उठला.

सर्वांनी चिंगा म्हातारीला मातीआड केलं आणि ते परत फिरले. वाटेत चालता चालता मुरा म्हणाला,

“दाजी, ही म्हातारी जगली असती. ‘

“ मग तिला का जीव नकोसा झाला? ” सावळानं खवचटपणं विचारलं आणि मुरा म्हणाला, ” अन्नावाचून मानूस मरतंय- “.

” म्हंजी कसं ? ” फकिरा हुंकारला व मुरा म्हणाला,

“मांगवाड्यात आज या घडीला चिपटंभर दानं न्हायती! माज्यानं हे हाल बघवंना- “

” मग काय करायचं ? ” फकिरानं विचारलं .

” काई करता येत न्हाई ! ” मुरा उद्गारला .

बोलत बोलत ते सर्व पांदीला आले आणि मांगवाड्याकडे वळून चालू लागले . मध्येच थांबून फकिरा म्हणाला ,

” तुम्ही जावा आणि एकूण एक माणूस जमून बसा ! मी गावात जाऊन येतो .

” असं म्हणून तो झरकन पांदीनं गावाकडं निघाला. त्याची सर्व गात्रं बधिर झाली होती. तो विष्णुपंत कुळकऱ्यांच्या वाड्यापुढं कधी आला , ते त्याच्या लक्षात आलं नाही . समोर वाडा पाहून तो एकदम भानावर आला .

काळोखानं विष्णुपंतांचा तो प्रचंड वाडा गिळंकृत केला होता . सर्वत्र2 अंधारानं आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं होतं . गावात हूं की चूं होत नव्हतं . मधून मधून एखाद्या घरी रडण्याचा हलकल्लोळ उसळत होता , पण रडणाऱ्यांनाही ” रडण्यासाठी तकवा नव्हता . क्षणभरच ओरडून मग पुन्हा सर्व काही शांत होत होतं . मध्येच कुत्री दीर्घ सूर काढून रडत होती , त्यामुळं गावात भेसूरता अधिक उग्र होत होती .

फकिरा वाड्याच्या ढेलजेत येऊन थांबला. देवळीत जळणाऱ्या निरांजनाचा मंद प्रकाश त्याच्या मजबूत देहावर थरारला. फकिरानं हाक मारली ,

” आबासाहेब- “

” कोण , फकिरा ? ‘ पंत गडबडीने मधल्या अंगणात आले . पंतांच्या वयानं आता साठी गाठली होती , पण त्यांचा धिप्पाड देह अजून दणदणीत होता. प्रचंड मस्तकावरचं टक्कल, रुंद गर्दन, टपोरे डोळे आणि पल्लेदार शुभ्र मिश्या यामुळं पंत एखाद्या ढाण्या वाघाप्रमाणं दिसत होते. त्यांचा आवाजही गुहेत वाघ गुरकल्याप्रमाणं गंभीर होता.

फकिरा पुढं होऊन एकदम पंतांपुढं थांबला . त्यानं आपले कठीण , मजबूत हात पाठीमागं धरले होते . त्याचे रसरसणारे डोळे पंतांवर स्थिरावले . त्याचा रुबाबदार चेहरा घामानं डबडबला . तो मनातल्या मनात शब्द शोधू लागला ; पण पंतांनीच सुरूवात केली ,

” मांगवाड्यात आणि महारवाड्यात काय चाललं आहे ? ” त्यांच्या करारी नेत्रांत चिंतेचा भाव तरळला .

देवळीत जळणाऱ्या निरांजनाकडे पाहत फकिरा म्हणाला ,

” मांगांम्हारांचा वंशच उरत न्हाय , आबा ! “

” आतापर्यंत किती माणसं दगावली ? “

” चार दिसांत बारीक मोठी ईस . ‘ फकिरा पुटपुटला . त्याचे शब्द अंधारात चडफडत गेले .

” मग तुझं म्हणणं काय आहे ? ” पंतांनी पुन्हा प्रश्न केला .

फकिरा ओठांवरून कोरडी जीभ फिरवीत म्हणाला ,

” भाकरी भाकरी करून पोरांचं चरफडून मरनं आणि त्यांचा तो हंबरडा आता माझ्यानं ऐकवंना . ढेकळावाणी काळीज इरगाळंत माझं !

” फकिराच्या पापणीत देवळीतील त्या निरांजनाच्या प्रकाशाचे कण लोंबकळू लागले आणि त्यानं गरकन मान फिरवून आसू दडवले .

“ तसं नाही- ‘ पंत समजावणीच्या सुरात म्हणाले , ” धीरानं घ्यायला पाहिजे आता , फकिरा . “

” आबा- ‘ फकिराच्या काळजातून कण्हत बोल आला , “ मांग – म्हार भोपळीचा नि करडूचा पाला खाऊन जगतोय , पण जमेना . नुसती उपासमार असती , तर पोट बांधून काळीज शाबूत ठिवलं असतं ; पण ह्या साथीनं कडेलोट केलाय आमचा – ‘ फकिरानं पुढचे शब्द गिळून घेतले आणि पंतांकडे पाहिलं .

पंतांनी पुन्हा तोच प्रश्न केला ,

“ मग आता पुढे काय ?

” पंतांचा धीरगंभीर आवाज वाड्यात घुमला आणि फकिरा मंद स्वरात म्हणाला ,

” तुमीच सांगा ! ”

” मी ? मी काय सांगू ? गाव दुष्काळाच्या दादेत आहे , हे मी सरकारात कळवलं आहे ; परंतु टीचभर चिठ्ठीनं त्याचं उत्तर नाही आणि मी म्हणजे केवळ मृतांची नोंद करणारा झालो आहे.

‘ ” मग आमास्नी धनी कोन ? ” फकिराचा स्वर वैतागला .

” कोण कोणाचा धनी नाही ! ” पंत चटकन बोलून गेले , “ माझ्याही भोवती आक्रोश सुरू आहे , मी संकटात आहे ; परंतु माझं स्पष्ट मत आहे , की तुम्ही जगलंच पाहिजे ! मरणापेक्षा आज जगणं हे महत्त्वाचं आहे . ”

“ पन , आबा , कसं ? ” फकिरा अधिकच चिडक्या सुरात उद्गारला .

” जसं जमेल , तसं ! ” पंत खटकन बोलले , “ काहीही करा , पण जगा ! ” त्यांनी झेप घेऊन , निरांजनाची वात वर करून मोठा प्रकाश केला . प्रकाशाची पाचर अंधारात खोल गेली अन् अंधारा थरारला .

” मग आम्ही काय करावं ? ” फकिरानं गोंधळून पुन्हा प्रश्न केला आणि पंतांचा चेहरा बिथरला . त्यांच्या आवाजात अधिक कडवटपणा आला .

” ते मला कळत नाही . ” पंत गळ्यातील जानव्याला करकचून तिढा देत म्हणाले , “ तुम्ही कुत्र्यासारखं मरू नका ! हेही दिवस जातील.

” पंतांच्या मुखातून शब्दांऐवजी निखारेच बाहेर पडले आणि फकिराच्या अंतःकरणात धैर्याचा महासागर लाट उसळीत उठला . त्यानं पंतांपुढं हात टेकला आणि तो उठून म्हणाला ,

” आबा , मी जातो ! ”

” जा . उकिरड्याचा पांग फिटतो आणि तुम्ही तर माणसं आहात , माणसं- ” पंतांनी फकिराला निरोप दिला .

काजळी झाडताच ज्योत प्रखर व्हावी , तद्वत फकिराचं मन उजळलं . गगनाला गवसणी घालण्याची प्रबलता त्याच्या छातीत निर्माण झाली . त्याच्या तरुण पायांत विजेप्रमाणं हिंमत संचारली . तो चिखल तुडवावा , तसा अंधाराला तुडवीत , बेभान होऊन मांगवाड्याकडे विद्युतगतीनं निघाला .

‘ तुम्ही जगलंच पाहिजे ! ‘ हे पंतांचे शब्द त्याच्या डोकीवर घण घालीत त्याच्याबरोबरच धावत होते . त्या शब्दांचे काहूर उठलं होतं आणि ते जणू फकिराला लोटीत सुटलं होतं .

मांगांची आणि महारांची ती दोनशे घरं त्या काटेरी निवडुंगाच्या कड्यात गांगरून बसली होती . गंभीर शांतता नांदत होती . वाऱ्याच्या झपाट्यानं ते निवडुंग करकरत होतं. जणू काही वातावरण दाणेच खात बसलं होतं .मध्येच एखादं घुबड घूत्कार करून भीतीला उठवीत होतं . तिथं माणसाचं अस्तित्व नि शब्द त्या काट्यात रांगत होते . फकिराच्या दारापुढच्या लिंबाखाली जेवढी उभी माणसं होती , तेवढी जमून फकिराची वाट पाहत होती . या निकराच्या समयी पंत काय सांगणार हे ऐकण्यासाठी त्यांची मनं उत्सुक झाली होती .

जे अगदी जेर झाले होते नि भुकेनं वाकले होते,

ते मनात म्हणत हाने , ‘ पंतांच्या मनात देव शिरावा आणि त्यानं पंतांना सांगावं – ह्या गरीबांस्नी दे घरात असंल नसंल , त्ये … ‘

तर कोणी अंधारात फकिराच्या वाटेकडं रोखून पाहत अंदाज बांधीत होते

फकिरा येताना पंचवीस पोती जोंधळे घेऊन यावा . फकिराचं पंतांवर भलतंच वजन आहे . पंत फकिराचा बोल वाया जाऊ देणार नाहीत आणि यावेळी पंत नक्कीच मांग – महार मरू देणार नाहीत .

असे नाना तर्क करीत माणसं फकिराची वाट पाहत होती . त्यांच्या डोळ्यांतील बुबळं कार्यक्षम झाली होती . मनं सारखी दुःखं विसरली होती . पंत काही तरी करतील , या एकाच आशेनं त्यांच्या रक्तबंबाळ मनांना हुरूप आला होता . आपला निर्वंश होणार , ही भीती पार विसरून आता ते अंधारातून त्यांच्याकडे येणाऱ्या धान्याच्या पोत्यांचा हिशेब करीत होते .

इतक्यात अंधारातून एक धिप्पाड आकृती प्रचंड काठी टाकीत , अंगावर घोंगड्याची खोळ घेऊन त्या झाडाकडे येताना सर्वांना दिसली . ‘ आला फकिरा ! ‘ असं मनात म्हणून सर्वच सरळ बसले . ती कानांची कवाडं खाडकन उघडली गेली ; परंतु दुसऱ्याच क्षणी ते निराश झाले . ती आकृती त्यांच्याजवळ येताच तो फकिरा नव्हे , हे लक्षात येऊन कुणी तरी विचारलं ,

” कोन हाय ? “

” मी तायनू म्हार हाय , गा .

अंधारात सर्व वळवळ झाली . पुन्हा स्वर नरमाईनं कण्हले ,

” काय , तायनुबा , कसं ? ”

” सारीच माणसं वळीनं निजवून आलोय . ” तायनू गंभीरपणे म्हणाला आणि बहिरूनं विचारलं , ” म्हाताऱ्याचा ताप उतरला का ? “

” ह्या तापाला औशिदच न्हाय . ” सावळाचा आवाज चरफडत आला .

तायनू म्हणाला ,

” या तापावर एकच औशिद हाय “

कंचं ? कंचं ? ” जवळजवळ सर्वांनीच तो प्रश्न एकदम विचारला आणि मग तायनू महार म्हणाला , ” भाकरी ! ” “

क्रमशः
स्रोत:(फकिरा या अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading