फकिरा..
भाकरीचं नाव ऐकताच सर्व पुन्हा खिन्न झाले . त्यांचं जगणं – मरणं भाकरीत होतं आणि तीच त्यांना मिळत नव्हती – नव्हे , दिसत नव्हती . केवळ कोरडी भाकरी मिळावी , यासाठी ती माणसं चरफडत होती .
एवढ्यात फकिरा आला . त्याबरोबर सर्वांनी कान टवकारले . त्यांचे चेहरे गंभीर झाले . पटकुरं झटकून काहीजण किंचित पुढे सरकून बसले . मग सर्वांनी आपले निःश्वास रोखून धरले . सर्व डोळे फकिरावर स्थिर झाले आणि लिंबाच्या मुळीवर बैठक मारून फकिरा म्हणाला ,
” हं , बोला , गा ! “
तायनू महार पुढं सरकत शांतपणे म्हणाला ,
” काय म्हनलंत पंत ? ” “
त्येंनी जगाय सांगितलंय . ” फकिरा म्हणाला . “
पन कोरड्या बोलानं आम्ही कसं जगायचं ? ” सावळा बसल्या जागचा उठून बोलला आणि जरा पुढं येऊन पुन्हा बसला .
” खरं हाय त्ये . ” फकिरा म्हणाला , ” आपून नि कुळकर्णी एकाच वाटंवर वाटचाल करतोय . मातर फरक एवढाच , की आपून आधी पोचनार नि पंत वाईच मागनं त्याच जाग्यावर येनार ! म्हंजी मरनार -आलं का ध्येनात ? ”
” मग आमची वाट काय ? ‘ मुरा उद्गारला .
” म्हंजी आमी मेलं पायजे ! ‘ ‘ किवंडा हरी महार ओरडला .
” न्हाय ! आमी जगलंच पायजे ! ” फकिरा खेकसला .
” आरं , पर कसं ? ” सावळानं मान वाकडी करून विचारलं .
कोंडी महार खांद्यावर ताऱ्या घेऊन उभा राहिला . त्यानं हात जोडून विचारलं ,
” पांडुरंगा , इठ्ठला ! माजी दोन पोरं घडीची सोबती हायती . त्येच्या पोटात आज दोन दिवस शिपीभरबी तरवणी न्हाय . आता मी काय करू ! ‘
” मी म्हनंन तसं करा ! ‘ फकिरा ताडकन उठून ओरडला .
” काय करू ? – बोला , दाजी . ” सर्व कंठातून एकच प्रश्न बाहेर पडला आणि त्या सर्व गोंगाटावर मात करीत फकिरा म्हणाला , ” पंतांनी सरकारात आर्ज केलं , पन सरकार उत्तर देत न्हाय . मारुतीवानी तोंडाची मानसं बघून आमास्नी वाटलं , ह्ये मारुतीच्या वंसाचं राज हाय . पर आता मातर असं वाटतं , की ह्ये कुंभकर्नाच्या अवलादीचं राज हाय . आपून तलवार घेऊनच होच्या उरावर नाचलं पायजे ! …
” ‘ आपून तलवार घेऊनच त्येच्या उरावर नाचलं पायजे ! … ‘ हे फकिराचे निर्वाणीचे शब्द त्या काळोखाचं ऊर चिरीत दूर गेले . फकिरा चपळाईनं घरात गेला . त्याच्या पाठोपाठ राधा , दौलती , राहीबाई , सरूबाई हीही घरात गेली . फकिरा त्वेषानं पेटला होता . त्यानं देव्हाऱ्याकडे झेप घेऊन ती तलवार हाती घेतली . हीच तलवार धरून राणोजी शिगावच्या भर जत्रेत निर्भय झत्तला होता ! हीच तलवार धरून फकिरानं खोताचा हात तोडला होता !
फकिरानं मग आईच्या पायांवर डोकं ठेवलं . राहीबाई आणि दौलती यांच्या कृश पायांना मिठी मारून , सद्गदित होऊन तो म्हणाला , “
आई , थोरले आई ! आबा . मी मरून ही मरनारी मानसं जगवनार ! मला अडवू नका- ” मग त्यानं सरूबाईच्या पाठीवरून हात फिरवून म्हटलं , ” हबकू नगं . संभाळ सारं- ” आणि तो बाहेर आला .
त्याच्या हातातील ती नंगी तलवार बघून सर्वांच्या छातीत हत्तीचं बळ खवळून उठलं . क्षणभर हालचाल झाली . फकिरा एक एक नाव उच्चारू लागला “ साधू , बळी , मुरा , केरू सावळूनाना , घमांडी , तायनू महार , केसू महार , सुकाना , भाना … आनि ज्येच्या पायांत बळ नि उरात हिंमत असेल , त्येनं एका बाजूला निघावं !
” त्याचा हुकमी आवाज ऐकणाऱ्याच्या उरात शिरू लागला आणि प्रत्येक हृदयातून हुंकार निघू लागला .
घोंगावत आग्या मोहोळ उठावं , तद्वत दीडशे माणसं उठून बाजूला झाली . अंगात त्वेष चढून बेभान झालेल्या सावळानं डोकीवरचं घोंगडं , हवेत भिरकावून शड्डू ठोकला ,
“ उभं व्हाऊ नक्षा . हत्यारं घ्या . हत्यारं उपाशी मरत्यात ! “
फकिरा म्हणाला ,
” हो , हत्यारं घ्या !
” क्षणभर धावपळ झाली . कु – हाडीचे दांडे ठोकून बसले . तलवारी झळझळल्या . मग म्हाताऱ्याकोताऱ्यांना उद्देशून फकिरा म्हणाला ,
” आम्ही येईपातुर तुम्ही मढ्यांस्नी पानी पाजून जतन करा . उद्या सकाळी अन्नाचा हतं ढीग लावतो . घाबरू नका !
” आकाशात गडद काळोखात दोन चांदण्या मंद लुकलुकत होत्या . त्यांचा चोरटा प्रकाश फकिराच्या तलवारीच्या पात्यावर पडून ती तलवार उग्र भासू लागली . फकिरानं आकाशात दृष्टी रोखून रात्रीचा अंदाज घेतला आणि तो चालू लागला . त्याच्या पाठीमागं दीडशे हत्यारं चकाकत निघाली . उरलेली माणसं आपापल्या घराकडं गेली .
” गबऱ्याला तरी घेऊन जा ! ” राधा काळीज कठीण करून म्हणाली आणि खटकन थांबून फकिरा उत्तरला . ” नगं , त्येला आताची दौड निभनार न्हाय. त्यो थकलाय- ” त्याबरोबर गोठ्यात गबऱ्या खेकाळला. त्याच्या त्या खेळाळण्याचा आवाज त्या निवडुंगात निनादला . राधाचं काळीज निर्धास्त झालं . जणू गबऱ्यानं ‘ घाबरू नको – फकिरा विजयी होऊन येणार ‘ असा तिला धीरच दिला .
गावाबाहेर पडून माळाला लागल्यानंतर सावळानं आपली चाल वाढवूनती फकिराशी जुळविली आणि त्याच्या पार खांद्यापाशी तोंड नेऊन तो म्हणाला ,
” दाजी , आपून कुटं जायचं ? “
” माळवाडीच्या मठकऱ्याला लुटाला ! ” फकिरा उद्गारला आणि वादळाप्रमाणं समोर पाहत धावत निघाला . मग सारेच धावू लागले .
त्यावेळी माळवाडी शांत होती . कोपीत एखादा म्हातारा बसावा , तशी ती डोंगराच्या खोऱ्यात बसली होती . तिच्या डोकीवर ती काळी रात्र नाचत होती . गावाच्या एका टोकाला तो मठकऱ्याचा चिरेबंदी वाडा वाळीत टाकल्याप्रमाणं फटकून उभा होता . त्या वाड्याच्या त्या चिरेबंदी भिंतीवर अंधार टकरत होता .
फार पूर्वी एका राजानं एका पुजाऱ्याला एका प्राचीन मठाची देखरेख ठेवण्यासाठी चौदा गावं इनाम दिली होती . तेव्हापासून आजपर्यंत त्या चौदा गावांच्या इनामावरच त्या मठाचा खर्च चालला होता ; परंतु त्या चौदा गावांच्या जमिनीसाठी नि त्या दौलतीसाठी त्या गावात भलतीच होड लागून आजपर्यंत कैकांचे खून पडले होते . एक दुसऱ्याचा खून करून त्या मठाच्या मालकीसाठी आपल दत्तक घालीत होता . आजही त्या प्रचंड वाड्यात पाच मालकिणी आपलं रांडपण रेटीत होत्या . तिथं पेवांत किडे नांदावे , तशी माणसं नांदत होती .
मठकऱ्याच्या त्या चौसोपी वाड्यात प्रत्येक खांबाला दाण्याची एकएक कणगी उभी होती . कैक पेवांत धान्य सडत होतं . बाहेरच्या त्या कणगी सारख्या लावून खांबांशी जखडून उभ्या केल्या होत्या . जागोजाग शिकारी कुत्री खुरमुंडी घालून निजली होती . प्रत्येक कुत्र्यापाशी एक एक चाकरीचा गडी हत्यारबंद पडला होता . त्या विस्तीर्ण वाड्याच्या मधल्या अंगणात पलंग टाकून तो मठकरी निवांत निजला होता . सोप्यात शेकडो गुरं दावणीला रवंथ करीत होती . तिथं निर्भय निजणाराच्या घोरण्यानं रातकिडे भयभीत झाले होते . चौदा गावाचं धान्य नि जीवन पोटात घेऊन तो दगडी वाडा सुस्कारे टाकीत होता .
आणि त्याच वेळी त्या दगडांना फकिराचे हात भिडले होते . दीडशे लोकांनी गावाची नाकेबंदी करून मठ आणि गाव यांच्यामध्ये पाचर मारली होती . सावळा , बळी , मुरा यांनी पहिला आडणा मारायचं काम पुरं केलं होतं . गावची मुख्य वाट साधूनं दाबली होती .
हातात ती तलवार घेऊन फकिरा वाड्यात शिरण्यासाठी उतावळा झाला होता .
सर्वत्र शांतता नांदत होती . जणू वादळापूर्वीची ती शांतता प्रस्थापित झाली होती .
माळवाडीची मठकरी पलंगावर पडून घोरत होता. मध्येच त्याच्या तोंडाची मचमच होत होती. आपल्याभोवती एक महासंकट विळखा घालीत आहे, याची त्याला मुळीच जाणीव नव्हती.
बाहेर सावळा आडणा मारायचं काम वेगात करीत होता. त्यात त्याला ते कार्य कसलाही आवाज न होऊ देता पार पाडायचं होतं . आडणा मारून आत शिरण्यापूर्वी दंगल होणं हे हुकमी पराजय होण्यासारखं असतं, याची त्याला कल्पना होती . म्हणून तो आपलं कार्य जलद पण काळजीपूर्वक करीत होता .
-आणि फकिरा हातात तलवार घेऊन नाचत होता. त्याचं मन वाड्यात शिरण्यासाठी उत्सुक झालं होतं . सर्व कार्य पार पाडून सूर्योदयाच्या आत आपण आपल्या घरी गेलं पाहिजे आणि त्या बेतानं हा कार्यभाग उरकावा , असं त्याला वाटत होतं , म्हणून तो एकसारखा म्हणत होता,
” सावळूनाना, आटप लौकर. न्हाय तर घात व्हईल .
” सावळा दरवाजा मारून फकिराला म्हणाला ,
” हं – तयार असा ! “
” तयार हाय . दरवाजा द्या लोटून ! ” फकिरा गंभीर आवाजात म्हणाला आणि सावळानं तो प्रचंड दरवाजा लोटला . त्याच्या आवाजानं रात्रीच्या त्या शांत वातावरणात सारा वाडाच हादरला . पेटत्या मशाली आणि नंग्या तलवारींनी मठकऱ्यांचं अंगण गच्च भरलं . सोप्यातील सर्व गुरं धडपडून उठली . कुत्र्यांनी वाडा डोकीवर घेतला . मठकरी दचकून जागा झाला आणि त्यानं लाथा मारून चाकरांना जागं केलं आणि मोठ्यानं बोंब ठोकलीः
” धावा … धावा ! …
फकिरा पुढं होऊन त्वेषानं ओरडला ,
” बोंबलू नगं . न्हाय तर मुंडकंच मारीन ! कुनीच , नरड्यातनं कसलाच आवाज काढायचा न्हाय ! न्हाय तर जिवंच मराल ! ”
पुन्हा सर्व काही पूर्ववत झालं. उठलेले चाकर पुन्हा आपल्या जागी निपचित पडले. कुत्र्यांना मात्र फकिराच्या बोलण्याचा अर्थच कळला नव्हता. ती आपली तशीच भुंकत राहिली. मठकरी पुन्हा आपल्या जागी पडून पाहू लागला .
खांबाशी जखडून उभ्या केलेल्या कणगींवर कु – हाडीचे दणके बसून कणगीबाहेर पडलेल्या त्या धान्याची गंगा अंगणापर्यंत धावत फकिराकडे आली आणि पन्नास सशक्त माणसं धान्याची पोती भरून वाड्याबाहेर जाऊ लागली.
मठकऱ्याच्या पहिल्या बोंबेनं जागा झालेला गाव साधू , घमांडी यांनी पुन्हा निजवला होता. पन्नास माणसं जागोजाग गोफणी जोडून दगड सोडीत होती. पुढे
क्रमशः
स्रोत:(फकिरा या अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतुन)
