वीटभट्टीवरील मातीच्या ढिगाऱ्यावरून निरागस पळणारी मुले अस्वस्थ करत होती. ही मुलं शाळेत यायला तयार नव्हती. एखाद – दुसरं पोरगं शाळेत आलच तर इतर मुलं त्याला चिडवायची. त्यामुळे शिक्षकांनी समस्या जाणून घेऊन प्रत्येक मुलाला शाळेत आणायची खुणगाठ बांधली. वंचिताच्या हाती शिक्षणाची पाटी हा उपक्रम राबविला. आणि पाहता पाहता सगळी मुले शाळेत आली. अन गोपाळवाडीच्या शाळा आनंदी बनली.
श्रीगोंदा तालुक्याच्या पश्चिमेस ५० किलोमीटर अंतरावर गोपाळवाडी ही छोटीसी वस्ती. राजापूर गावापासून नदीमुळे दुस – या तीरावर गेलेली ही वस्ती. साधारणत : ४०० ते ५०० दरम्यान या वस्तीची लोकसंख्या. शेती व वीटभट्टी हा येथील प्रमुख व्यवसाय. याच वस्तीवरील गोपाळवाडी शाळा एक आनंदी शाळा बनली. शिरूरपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर गोपाळवस्ती. मुलभुत सुविधांपासून कायमच वंचित. ओढा आणि खाचखळग्यांचा कच्चा रस्ता. पावसाळ्यात गुडघाभर चिखल अशी परिस्थिती. या वस्तीवर वीटभट्टीवरील स्थलांतरीत मुले. मात्र या शाळेतील शिक्षकांनी मुलांच्या गुणवत्तेवर काम करण्यास सुरुवात केली. शिक्षकांनी सुरु केलेल्या कामामुळे मुलांमध्ये बदल होत गेले. पालकांच्या बदल लक्षात आल्याने तीन वर्षात कायापालट झाला.
या शाळेत मुलांना कृतियुक्त अध्ययन दिले जाते. मुलांसाठी स्वत: शैक्षणिक व्हिडिओ निमिर्ती केली जाते. लोकसहभागातून ग्रामस्थांनी शाळेला संगणक दिला. शाळा डिजिटल करण्याचे ठरवले. त्यावेळी पालकांनी शाळेला पुन्हा एकदा प्रोजेक्टर दिला. शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या सहकार्यातून शिक्षणाचे कोणताही गंध नसेलेल्या पालकांची मुले आनंदी शाळेत रमू लागली. दाणेवाडी व गोपाळवाडी शाळांच्या संयुक्त स्नेहसंमेलानाच्या माध्यमातून दीड लाख रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव केला.
अतिशय टापटीप गणवेश. प्रत्येकाला ओळखपत्र. हिरवीगार झाडी. सुंदर बगीचा. उत्तम दर्जाचा शालेय पोषण आहार. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण करण्यात आली.
सोशल मिडियाचा शाळेने प्रभावी वापर केला. फेसबुकसारख्या माध्यमातून अनेक दानशूर दात्यांचा शाळेशी संपर्क झाला. पुण्यातील प्रसिध्द उद्योजक कस्तुररत्न फाऊंडेशनचे अध्यक्ष किर्ती ओसवाल यांनी ग्रंथालयासाठी दहा हजार रुपयांची १७५ पुस्तके भेट दिली. या कामात शिक्षकांनी भर घातली. त्यामध्ये आणखी ५०० पुस्तकांची भर घालून ग्रंथालय शाळेत सुरु करण्यात आले. शाळेतील हातपंपावर विद्युतपंप बसवून शाळेच्या पाण्याची समस्या कस्तुररत्न फाउंडेशने मिटवली. जागतिक महिला दिनी शाळेस एक लॅपटॉपची भेट दिला.
सोशल मिडियातील अनेक दानशूर हातांनी शालेय साहित्य व दप्तरे दिली. बालदिनी शिक्षणापासून वंचित २५ मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणली. फ्रेण्डस अँकडमी कोल्हापूर व इनरव्हील कोल्हापूरच्या मदतीने मुलांना गणवेश व शालेय साहित्य वाटप केले. गणवेशामुळे असमानता दूर झाली. सर्व मुले एकसारखी दिसू लागली. त्यांना शाळेची गोडी लागली. मालक व मजुरांची मुले एकत्र शिकू लागली. या कामासाठी गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद व विस्तार अधिकारी निळकंठ बोरूडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांव्दारे शाळा आपले वैशिष्ट्ये टिकवून आहे. शाळेत वृक्षारोपण उपक्रम झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करणे, पर्यावरण रक्षण मातकाम, बागकाम व अक्षरबाग तसेच एक घास चिऊचा हा पक्षी वाचवा उपक्रम, स्काइप इन द क्लासरुम व्हिडिओनिर्मिती अभ्यास संदेश प्रणालीव्दारे दररोजचा अभ्यास नियमितपणे पालकांपर्यत पोहचवला जातो.
शाळेने स्वत : चे युट्युब चॅनेल केले आहे. ब्लॉगही आहे. मुलांचे इंग्रजी सुधारण्यासाठी टॅग कोऑर्डिनेटर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षिका शोभा कोकाटे या प्रशिक्षण देत आहेत. राज्यस्तरावरील नवोपक्रम स्पर्धेमध्ये ळेला टाकाऊतून टिकाऊ हँण्डवॉशस्टेशन या उपक्रमाला सर फाउंडेशन सोलापूर यांच्याकडून शिक्षिका शोभा कोकाटे यांना इनोव्हेटिव्ह टिचर्स अवार्डने सन्मानित करण्यात आले. वंचिताच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल ऑल इंडिया रेडिओवर मुलाखत प्रसारित करण्यात आली. शिक्षिका शोभा कोकाटे यांना गुरुकुल नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या शाळेच्या यशाच्या वाटचालीमध्ये शिक्षिका शुभांगी सोनवणे यांचाही मोलाचा वाटा आहे.
शब्दांकन : दिपक वाघमारे, पुढारी प्रतिनिधी
समाजासाठी आदर्श काम करण्याची जिद्द अंगी बाळगून सर्वजण काम करत आहेत. शाळेची वाटचाल पाहता वंचिताच्या विकासासाठी समाजात जिवंत असलेला हा सेवाभावच खरा आशेचा किरण आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालकांसह सर्वजण परिश्रम घेत आहेत.:शोभा कोकाटे, उपामुख्याध्यापक
(प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशित झालेल्या वेळेची आहे)
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
