फकिरा..
उद्या ” देत होता आणि प्रकाश अंधाराला रेटीत पुढंपुढं सरकत होता . महारवाडा ओलांडून पंत पुढे निघाले , तेव्हा त्यांना चावडीपुढं मोठी गर्दी झालेली दिसली . कित्येक कंदील पेटत होते . कैक दिवट्या ढणढणत होत्या . ते पाहताच पंत तिकडे वळले . पंतांना पाहताच सर्व लोक बोलणं बंद करून त्यांच्या रोखाने पाहू लागले .
रावसाहेब पाटील पाय पसरून बसला होता . त्याचे सर्व दात पडल्यामुळे तो वरचेवर रक्ताच्या चुळा टाकीत होता . पंतांना पाहताच तो सरळ झाला आणि विव्हळत म्हणाला ,
” बघा ह्ये काय झालं ! मला मांगानं मारलं ! ”
” मला सर्व काही समजलं आहे . ” पंत म्हणाले , ” आता शांत राहा , काय करायचं , ते पाहू . ‘
” उद्या ? ” पाटील ताडकन उठून ओरडला , ” माझं दात पडलं , त्ये काय उद्या उगवणार हायती ? आनि आम्ही गप्प बसून काय व्हनार ? न्हाय बरं , आम्ही गप्प बसनार न्हाय ! आम्ही आताच जाऊन मांगांची कत्तल करनार नि खोपटं पेटवून देनार ! जाऊ दे भडवीची- ”
” पाटील , ऐका ! पंत करड्या आवाजात बोलू लागले , ” तुम्ही फार उतावळे आहात . हजेरी घेताना – ” घरातून नको , बाहेर येऊनच दे म्हणून तुम्ही फकिराशी कुरापत काढली आणि आता वर खोपटं जाळण्याची भाषा काढता ? जा . मग आताच जा नि मांगांची खोपट पेटवा . तुम्हाला आता कोणीच अडवणार नाही . कारण फकिरानं हा गाव सोडला आहे केव्हाच ! “
” म्हंजी पळून गेला ? ‘ ‘ कोणी विचारलं .
” ते मला माहीत नाही . ‘ पंतांच्या स्वरात प्रखरता आली . ते पाटलाकडे वळून म्हणाले , “ एकही कर्ता मांग घरात नाही . त्यांची घोडी दूर गेली असतील . आता जावा नि पेटवा घरं ! परंतु या गावासाठी माळाला कटून मरणाराची अवलाद दुबळी मानू नका ! फकिरा शांत बसणार नाही ! त्याचं घर पेटवा नि आपलं विझविण्यासाठी पाणी आणून ठेवा ! जा- ‘
‘ पंतांच्या बोलांनी वातावरण तप्त झालं . दिवट्या अधिकच तेजाळ भासू लागल्या . ऐकणारे गांगरले . तरी धिटावा करून पाटील म्हणाला ,
” येऊ दे नि पेटवू दे माझा वाडा ! ”
” ठीक . मग माझ्या कानावर हात आहे . ‘ पंतांनी दोन्ही हात कानांवर ठेवून बजावलं , “ पुढं जे जे होईल , त्याचे परिणाम तुम्हीच भोगा ! फकिरा आपल्या सर्व लोकांसह आता डोंगरात गेला असेल किंवा डोंगर चढत असेल !
“एका उंच कड्यानं आपली मुंडी ढगात घातली होती . मंद गतीनं तरंगणारे प्रचंड ढग त्या कठीण सह्याद्रीच्या मस्तकावर आदळून दिशा बदलून घेत होते . उंच डोंगरातील रानटी वारे बेबंद पळत होते . त्यांच्या धसमुसळेपणानं घनदाट वनश्री नम्र होऊन त्यांना वाट देत होती . जे वृक्ष ताठ राहण्याचा प्रयत्न करीत होते , त्यांना वारा सहस्त्र करानी वाकवीत पुढं रेटीत होता . करवंदी , बोरी , बाभळी , पिंपरण , जांभूळ , सागवान , पांगीरा या वृक्षांची वाऱ्यानं दाणादाण होत होती . पालापाचोळा त्याच्यापुढं लोटांगण घेत होता .
ऐन गिरिकंदरात एका दाट झाडीत फकिराचा तळ पडला होता . आठ कारवानी घोडी करवंदीच्या जाळीखाली पाग करून बांधली होती आणि त्याचा तो गबऱ्या पाठीवरचं जिन तसंच घेऊन उभा होता . एका कठीण प्रसंगात आपण आहोत , याची जणू त्यालाही जाणीव होती . सर्वत्र गंभीर वातावरण दाटलं होतं . फकिराची माणसं डोंगराच्या कपारीत सर्व नाक्याच्या वाटा दाबून बसली होती . हत्यारबंद माणसांनी करवंदीच्या विशाला जाळ्या उग्र भासत होत्या . त्यांना छावणीचं स्वरूप आलं होतं . चिंचणीकर पिरा , साजूरकर निळू , साधू , मुरारी , बहिरू , सावळा , तायनू महार , बहिरोजी महार , घमांडी अशी एका आगळी एक दिलदार नि बेडर माणसं तिथं वावरत होती .
आज एक महिन्यात दूरदूरचे मांग येऊन फकिराला मिळाले होते . हजेरी देऊन जगण्यापेक्षा लढून मरण्याचा त्यांनी हिय्या केला होता . आलेल्या लोकांना निरनिराळी कामं वाटून देऊन फकिरानं सर्व तयारी केली होती .
एका महिन्यात फकिरानं सह्याद्रीच्या खांद्यावरून कित्येक मैल दौड मारली होती . आणि कैक शिरजोरांना धुळ चारली होती . जे त्या भागात बळी होऊन बसले होते , त्यांना त्यानं जमीनदोस्त केलं होतं . त्याचं नाव ऐकून कैकांना कापरं भरत होतं . फकिराचा तो दरारा ऐकूनच रावसाहेब पाटील आपले शेवटचे दिवस जपून ठेवण्याचा प्रयत्न करीत होता .
परंतु फकिरानं ज्या दिवशी घर सोडलं , त्या दिवसाची त्याला सारखी आठवण होत होती . त्या दिवशी राधानं अगतिक होऊन स्वतःचं तोंड बडवून घेतलं होतं . सरूनं हुंदका कंठात दाबून ठेवला होता . म्हातारी राहीबाई ऊर बडवीत होती . दौलतीनं आसू ढाळीत गबऱ्यावर खोगीर घातलं होतं . त्या स्थितीत त्या चार जीवांना सोडून साधू नि फकिरा हे परागंदा झाले होते . आता त्यांची भेट कशी होणार ? कधी होणार ?
एकाएकी आलेला प्रसंग हा सर्वांनाच दाहक वाटल्यानं सर्वच दुःखी झाले होते . कर्ते म्हणून पुढे आलेले दोघेही मुलगे – फकिरा व साधू – फरारी होत आहेत . तेपरत कधी येणार ? का सरकार , पाटील नि खोत त्या दोघांना ठार करणार ? या अन् अशा कैक इंगळ्या राधा , दौलती , राही यांच्या काळजाला डसत होत्या .
भर मध्यान्ह रात्री जेव्हा ती सारीजणं घर सोडून निघाली , तेव्हा सर्व लहानथोरांनी दारात येऊन त्यांना निरोप दिला होता . त्यांचे ते कृश हात , दुष्काळानं जर्जर केलेले देह , फकिराच्या सारखे नजरेसमोर येत होते . गेल्या काही दिवसांच्या अनुभवानं तो पार बदलून गेला होता . एका जाळीत निवांत पडून त्या प्रसंगाची तो आठवण काढीत होता .
आज आठ दिवस त्याला घराकडचीही काहीच बातमी कळली नव्हती . सरू त्याच्या डोळ्यांपुढं सारखी येत होती . आई भिंतीला टेकून तळमळत असेल , आबा घोर करीत असेल , थोरली आई चडफडत असेल . आपलं घर , आपलं अंगण , मांडव , गाव आपणाला अंतरलं . आता किती दिवस असे जाणार , याचा विचार करीत तो पडला होता .
रात्र सामसूम झाली होती . डोंगरातील जग केव्हाच निपचित झालं होतं . चराचर अंधारात विलीन होऊन किती तरी वेळ झाला होता . अति विशाल सह्याद्री -पण तोही थंड भासत होता . मध्येच कुठं तरी एखादं पाखरू नाजूक आवाज काढून भर्रकन जात होतं . एखादं डुक्कर हुंकार देऊन रात्रीचं पोट फाडीत होतं . आणि त्या प्रसिध्द डुक्करमुसंडीनं लपलेली खोकडं जीव मुठीत घेऊन पळत होती . सशांच्या उरात धडकी भरत होती . बेलाग उंच गांजणीत तरसांची धडपड सुरू होती .
घमांडी दिवस बुडताना घराकडे गेला होता . तो घरची खुशाली ऐकून व आपली लोकांना देऊन येणार होता , म्हणून सर्वजण उत्सुक होऊन घमांडीची वाट पाहत होते . फकिराही मधूनमधून चाहूल घेत होता .
शेजारच्या जाळीत पिरा आणि घोंचीकर बळीबा हे दोघे निजले होते . ते दोघेही घोरत होते . त्यांच्या त्या प्रचंड घोरानं कोणाचंच चित्त स्थिर राहत नव्हतं . त्यांनी ती घर घर्र ऐकून ऐ मोठं रानडुक्कर त्या जाळीच्या रोखानं बावरून , कान टवकारून हळूहळू जवळ येऊ लागलं होतं ; पण डुकराची त्या दोघांवर होणारी ती चढाई कोणालाही कळत नव्हती ; कारण जो तो आपल्याच विवंचनेत होता . त्यांना झोप येत नव्हती आणि विचार त्यांना सोडीत नव्हते . आपलं काय होणार , या विचारावर बायकोपोरांचं काय होणार , या विचारानं मात केली होती .
एका जाळीखाली अंधारात सावळा अंगावर घोंगडं घेऊन बसला होता . त्यानं सडकून गांजा ओढला होता आणि त्याला तार चढली होती . त्या तारेत तो बोलत होता . नि तायनू पडल्यापडल्या ऐकत होता . तो घोंगड्याची खोळ खालवर घालून , पोटाशी आपली प्रचंड कु – हाड घेऊन सावळाच्या बोलण्याला हुंकार देत होता . आपल्या प्रत्येक शब्दाला तायनूनं हुंकार दिला पाहिजे , असा सावळाचा आग्रह होता . हुंकार देण्याला किंचित खंड पडताच तो तायनूला डिवचून जागा करीत होता . नाही तर मोठ्यानं म्हणत होता ,
” जागं हायसा का ? ”
” हं . काय की … बोला तुमी … ” तायनू अंगावर घोंगडं घेऊन त्याला म्हणत होता आणि मग सावळा समाधान व्यक्त करीत बोलत होता .
” ह्ये गोरे लोक मारुतीची अवलाद हाय . जवा मारुतीनं रावनाची लंका जाळून भुस्काट केलं , तवा रामानं मारुतीला आशीर्वाद दिला आनी सांगितलं – म्होरं तू राजा व्हशील . म्हनूनशान बघ ह्ये राज आलंया . पर , इच्याभनं , हे राम वंशाचं राज आमास्नी म्हागात पडलं . आमास्नी तीन यळा हाजरीच लावून बसलं- “
” थांबा- ” तोंडावरचं घोंगडं बाजूला सारीत तायनू म्हणाला , “ राम छेव व्हता . त्यांच्या भक्तांचे ह्ये जर राज हाय , तर मग तुम्ही कोन ? नि तुमचं त्येचं वैर का ? बोला ! ”
” आवं , त्येच तर उमजेना . ” सावळा खजील होऊन म्हणाला , ” आमी गरीब मानसं , आमास्नीच ह्ये असं का ? ”
” आनी ऐका – ‘ तायनू म्हणाला , “ जर मारुतीच्या वंशाचं गोरं हायती , तर त्येस्नी शेपूट का वं न्हाय ? “
” काय की , बा ! ” अंधारात सावळानं ओठ उफराटे केले आणि तो स्तब्ध झाला . पण पुन्हा थोडा विचार करून हळू स्वरात म्हणाला , “ मला वाटतं , सायब लोकास्नी शेपटं असतीली , पर इजारीनं ती दिसत नसतील !
” हे ऐकून तायनूला हसू आलं नि मग ते मोठ्यानं हसू लागले . त्यांच्या त्या प्रचंड हास्यानं ती कपार जागी झाली . जणू तो सह्याद्रीच खदखदून हसत असल्याचा भास झाला .
” दाजी ऽऽ ” पलीकडच्या जाळीतून फकिराचा आवाज आला . सावळानं हसू आवरून तिकडे निरखून पाहताच पुन्हा सर्व काही शांत झालं .
” येऊ का ? ” सावळा उद्गारला .
” घमांडी आला न्हाय ? ”
” हो . न्हाय आला . ” सावळा उत्तरला .
‘ का आला न्हाय अजून ? ‘
‘ कुनाला ठावं ! “
” का वाट चुकला ? “
” कुनाला ठावं ! “
” यदाळ यावा त्यो ! ”
” हो ; पर कुठं अडाकला , कुनाला ठावं ! ”
” रात उलटली- ” फकिराच्या सुरात कंप निर्माण झाला .
आकाशात पाहत सावळा म्हणाला ,
‘ अजून बाजलं मावळलं न्हाय नि चोर त्या बाजल्यापाशी गेलेलं न्हायती .
यील त्यो आता . निजा तुम्ही- “
क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)
