फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग २८).

फकिरा..

” मी ? सावळा आल्यावर जाईन . जावा . पर सावळा , तू लौकर ये , जा-

” फकिरा क्षणभर खिन्न झाला आणि गबऱ्याला तायनूच्या हातात देऊन अंधारात पुढे निघाला . सावळाही घराकडे फिरला , तेव्हा फकिरा म्हणाला ,

‘ नाना ! तायनूआबाला घरला जायचं हाय . लोकर वे नि त्येला जाऊन येऊ दे पोराबाळांस्नी भेटून …

घरात मंद दिवा जळत होता . दौलती भाकरी खाऊन दातात काडी घालीत बसला होता . राहीबाई अंग टाकायचा विचार करीत होती . राधाचं चित्त स्थिर नव्हतं . सरू बावरून गेली होती . आज एक महिना होत आला होता . फकिराला तिनं पाहिलं नव्हतं . ती मनात पेटत होती ; परंतु मनातली आग तिला विझवताही येत नव्हती . मनातलं दुःख दुसऱ्याला सांगून किंचित कमी होतं , पण सरूला तेही जमत नव्हतं . स्वतःला काय होत होतं , हे ती त्या घरात कोणालाही बोलू शकत नव्हती . म्हणून ती चडफडत होती . त्यातच अलीकडे गावात रोज नव्या भुमका उठत होत्या . कोण म्हणत , फकिराला धरणं येणार ! कोण म्हणे , सातारच्या सोजिरांनी फकिराला वेढा दिलाय . कोण म्हणे , शिगावचा खोत पाळतीवर असून तोच फकिराला पकडणार आहे . एकदा दोनदा काही माणसं दारात येऊन गेल्याचं सरूनं पाहिलं होतं . रोज फकिराच्याबद्दल एक ना एक नवी बातमी तिच्या कानावर आदळत होती .

राधा आज संतापली होती . ती बाहेर पाहत पुटपुटली , ” त्येनं आपल्या बायकूला तरी न्हाय का भेटून जायचं ? आमी न्हाऊ दे … ‘ हे ऐकून दौलतीनं गपकन डोळे उघडले आणि आवाज दाबीत तो म्हणाला ,

‘ कसा येनार त्यो ? वैऱ्याची मानसं वळचनीला कान लावून बसल्यात “

हो . खरं हाय . ” राही मध्येच म्हणाली , ” त्यो न्हाय येत त्येचं बरं हाय . देवा , नकं रं , त्येला इकडं येऊ देऊ !

” इतक्यात फकिरा गपकन घरात शिरला आणि सर्वांच्या कंठात भयंकर असा हंबरडा येऊन दाटला . राधा , सरू आणि राही यांनी शिकस्त करून आलेला हुंदका दाबला . दौलतीनं त्याला मिठी मारली . त्याच्या हातात कंप भरला होता . तलवार आईच्या हातात देऊन फकिरानं तिच्या पायांवर डोकं ठेवलं , तेव्हा सरू भानच विसरली . हुशार दौलती चटकन दारात येऊन टेहळणीवर उभा राहिला . ती घडीच अशी होती , की ती माणसं सर्व काही विसरली . त्यांची काळवंडलेली मनं क्षणात प्रफुल्लीत झाली . मायेची फुलं नेत्रातून आपोआप गळली नि पेटती हृदयं शांत झाली ; पण पुन्हा साधूची आठवणही तितक्याच वेगानं पुढं झाली .

पहाटे तायनू दारात आला . तोही पोराबाळांना भेटून हर्षभरित चेहऱ्यानं आला होता . त्याला घेऊन फकिरा पुन्हा निघाला . सरूनं त्याच्या हातात ती तलवार दिली आणि उगीचच ती लाजली . पांदीपर्यंत राधा , दौलती , सरू फकिराला घालवीत आली . राहीनं दारात उभं राहून त्याला आशीर्वाद दिला . पांदीत सावळा नि गबऱ्या यांना पाहून पुन्हा सर्वांना आनंदाचं भरतं आलं . दौलतीनं गबऱ्याची शेंडी चाचपून त्याचा मुका घेतला व ” लेका , संभाळ बाबूला- ” आपला गाल त्याच्या कपाळावर घाशीत तो म्हणाला .

फकिरा सर्वांचा निरोप घेऊन निघाला , तेव्हा राधा म्हणाली , ” आता वाट दिलीच पायजी . आमची काळजी नगं करू , जिवाला जप ! आता लौकरच दुसर फकिरा आमच्या घरात येनार हाय . हो-

” हे ऐकून सरू लाजून चूर झाली . फकिरानं चटकन तिच्याकडे पाहिलं ; पण अंधारात तिचा लाजेनं मोहरलेला चेहरा त्याला दिसला नाही . मात्र दुप्पट बळ त्याच्या अंगात संचारलं नि तो ताडकन् गबऱ्यावर उडी मारून बसला .

पूर्वेला एका काळ्या ढगात एक लाल रेषा हळूहळू प्रखर होत होती . जणू अंधाराच्या भिंतीला तडा जाऊन त्या खिंडीतून प्रकाश पुढं येत होता .

फकिरा डोंगराकडे निघाला होता . त्याची पाठमोरी आकृती राधा पाहत होती . १२ . अति उंच अशा सह्याद्रीच्या पाठीवरून ती सर्व माणसं बेडसगावकडे निघाली होती . त्या वेळी ती महाराष्ट्राचं भूषण – सह्याद्रीप्रमाणंच विशाल भासत होती . परिस्थितीनं त्यांना धनुष्याच्या कमानीप्रमाणं घडवलं होतं .

लहानशा पाऊलवाटेनं ते सर्व एकामागं एक चालत होते . कोणीही घाई करीत नव्हतं . कारण सूर्य अजून बराच वर होता . तोही मंदगतीनं विशालगडाच्या शिखरावरुन चालत होता . त्याच्या किरणांनी वारणाकाठ सोन्याच्या राशीसारखा दिसत होता . कीर्र झाडीच्या मस्तकावर रुपेरी रंगच जणू आकाशातून सांडत होता .

डोंगर बोलत होता . पाखरं सुरकंड्या घेत आपापलया घरट्याकडे जात होती . काही घरट्यांत किलबिल होती , तर काही फांद्यावर बसून गोड गीत गात होती .

आष्टीच्या धोतरानं कंबर बांधून फकिरा गबऱ्यावर बसला होता आणि निश्चल बसून समोर पाहत होता . बेडसगावात काय होणार , याचा विचार तो करीत निघाला . त्याचा चेहरा भलताच गंभीर झाला होता . वावटळीत पाचोळा सापडावा , तसा तो विचारात गिरक्या घेत होता .

सरकारी खजिना लुटला , म्हणून सरकार आकाशपाताळ एक करील . मग आपलं काय होईल ? आई , थोरली आई , सरू आणि दौलती यांना कोण मग ? आणि आपण येतेवेळी आईला हे सांगितलं नाही . चूक केली . बेडसगावचा खजिना आपण लुटणार , हे आईला न सांगून आपण चूक केली .

या विचाराची हुरहूर फकिराच्या काळजात बोचत होती ; पण गबऱ्यानिर्भयपणे त्याला क्षणाक्षणाला पुढंच नेत होता . बळी हातात मुसळासारखी काठी -घेऊन झेपा घेत होता . त्याच्या निःश्वासानं त्याच्या नाकपुड्या फुगल्या होत्या आणि घोंचीकर बळीनं घोड्यावर बसून आपली ती प्रचंड दाढी मुठीत धरली होती . वारा भन्नाट येऊन त्या दाढीला विस्कटीत होता . मुरा वरचेवर मिश्या चापून – चापून नीट बसवीत होता . सावळा वाघासारखा दिसत होता . एकूण एक माणूस निर्भय होतं . आपण आज मृत्यूशी सामना करणार आहोत , याची कल्पना असूनही ते यत्किंचितही मलूल झाले नव्हते . मात्र त्यांची मनं आपआपल्या घरात – बायकांमुलांत घुटमळत होती नि शरीर बेडसगावची वाट चालत होती .

ते सर्व बेडसगावच्या गावदरीला आले आणि सूर्य मावळला . कडुसं पडत होतं . फकिरानं आपल्या माणसांच्या टोळ्या करून गावाच्या पश्चिमेला त्यांना वारणेच्या वाळवंटात जाण्याची सूचना दिली . त्याप्रमाणे सर्व पांगून निघाले आणि सावळा , तायनू , पिरा , साधू , खंडू रामोशी यांना घेऊन फकिरा सरळ गावात घुसून निघाला . नदीच्या काठी जमून थोडी विश्रांती घ्यायची होती . शिवाय गावाला नीज लागल्याशिवाय काहीच हालचाल करता येणं शक्य नव्हतं , म्हणून तो ठरलेल्या ठिकाणी निघाला होता . गावच्या मध्यभागी फकिरा आला , तेव्हा पारावर बरेच लोग बसून गप्पा मारीत होते . त्यांनी फकिराची ती माणसं पाहिली आणि शिंग , हलगी , मशाली , तलवार , भाले , कुन्हाडी हे सारं पाहून त्यांनी कान टवकारले . काहींना तर राहवलं नाही . त्यांनी धीर करून विचारलं ,

कोण गाव पाव्हनं ?

” तेव्हा चटकन सावळा म्हणाला ,

” बुक्कलपूर ! ”

” आमचा तमाशा हाय . ‘ लगेच तायनू महार म्हणाला , “ आमची मानसं म्होरं गेली का ? “

” न्हाय बा ! ” एक गावकरी तरुण चटकन म्हणाला , ” पर नाच्या कुठाय वं , तुमचा ? ”

” त्योच तर म्होरं गेलाया . ‘ ‘ तायनू म्हणाला , “ आज सांजेला दिसंल की त्यो तुमास्नी- ”

” म्हंजी तुमचा तमाशा हातं , आमच्या गावात व्हनार हाय म्हनता ? ‘ ‘ एका गावकऱ्यानं चेकाळून विचारलं आणि सावळा म्हणाला ,

” हो . बामनाच्या वाड्याम्होरं आज आमचा तमाशा उभा हानार हाय ! “

” मग काय ? मज्जा हाय- ” सर्वच गावकरी म्हणाले आणि फकिरा हा त्या तमाशातील सरदार असावा , असा तर्क करू लागले नि फकिरा गावाबाहेर पडला .

– तोंडओळख मोडली होती . वारणाकाठ कष्टाळू शेतकऱ्यांप्रमाणं निश्चल झाला होता . कुठंही हूं की चूं होत नव्हतं . सर्वत्र सामसूम झाली होती . अंधाराच्या जाड थरानं सर्व चराचर झाकलं होतं . आकाशातील चांदण्यांच्या लखलखाटात” फक्त वारणामाईचं पात्र अंधारात तळपणाऱ्या तलवारीप्रमाणं चमकत होतं . कुठं तरी एखादं पाखरू विचित्र आवाज काढून गंभीर वातावरणाला धक्का देत होतं .

फकिराची सर्व माणसं एकत्र आली आणि मग सर्वांनी चुळा भरून भाकरी सोडल्या . “ ही भाकरी आता शेवटची समजून खाऊ या . कुनाला ठावं , आज कोन मरनार नि कोन जगनार ! ” फकिरा म्हणाला , “ पर आज आपून सरकरी खजिना फोडून – म्हंजी मरनाचं दारच फोडून यमराजाला भाईर काढनार हाय . खजिना लुटीची बातमी ऐकून सरकार पिसळून उठेल आणि परत आमास्नी त्येच्याबरोबर लढावं लागेल ! ” फकिरा बोलत होता . भाकरीच्या कोरा हातात घेऊन सर्व ऐकत होते . भिवा उठला आणि म्हणाला ,

” मरता मरता खजिना लुटू या , म्हंजी आपली पोरंबाळं तरी चार दिवस सुखानं खातील . कुनी बघितलंय म्होरचं- ‘ असं म्हणून त्यानं घास घेतला .

“ पर मगाशी सारंच घसरलं . ” तायनू म्हणाला , ” बामनाच्या वाड्याम्होरं तमाशा हाय म्हनून गाव जमून बसलाय नि आमचाच तमाशा व्हनार

” काई न्हाय . तुटून पडा ! ‘ ‘ पिरा म्हणाला , ” तमाशाला आलेले हौसे गल्लीनं पळतील . कसा तमाशा व्हतोय , त्यो तरी बधा !

” सर्वांची जेवणं झाली . मग कैकांनी गांजा ओढला . तर होऊन मग तयारी केली . त्या वेळी रात्र बरीच झाली होती . गाव सामसूम भासत होता . त्याचा अंदाज घेऊन फकिरा म्हणला – हं ! पेटवा मशाली ! एकदम सर्व उठले . मशाली पेटल्या . त्यांच्या उग्र प्रकाशात शांत वारणा जागी झाली . वाहतं पाणी अधिकच अवखळ भासलं . कु – हाडी ठोकून सरळ बसल्या . भाल्यांची फाळं सज्ज झाली आणि घमांडीनं हलगी शेकली . शिंग – हगली खजिना लुटणारे मर्द जिवावर उदार झाले . हळूच जाऊन घात करणारी भ्याड माणसं ती नव्हती , तर वाजत – गाजत जाऊन , मरणाला जागं करून मग त्याला कवटाळणारी ती मर्द माणसं होती . फकिरा भर्रकन पुढे निघाला .

” हं , चला- ‘ ‘ कोणी तरी हुंकारलं आणि सर्व चालू लागले . शिरताच हलगीवर टिपरू पडलं नि शिंगानं आरोळी ठोकली . सारा प्रदेश थरारला . बेडसगाव एकदम जागा झाला नि कान टवकारून ऐकू लागला .

” कसलं शिंग ? – ” गाव बोलला नि पुन्हा स्वतःच उत्तरला , ” असेल वरात !

” हलगीच्या कडाक्यानं गल्ल्या हादरल्या नि शिंगानं भीतिदायी वातावरण पेटलं . फकिरा वादळाप्रमाणं ब्राह्मणाच्या वाड्यापुढं येऊन दाखल झाला . रघुनाथ ब्राह्मणाचा तो वाडा आता जागा झाला होता ; परंतु दीड लाखाचा खजिना पोटात घेऊन निर्भय बसला होता . प्रचंड जुन्या चालीचा मजबूत दरवाजा बंद होता आणि त्या दरवाज्यावरच्याच कमानीत एका खिडकीत रघुनाथ येऊन पाहत होता . – वरात का बंड ? -या प्रश्नानं त्याचं काळीज फोडलं होतं .

क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading