फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग ३).

फकिरा..

बसली असती , तर ती कटून पडावी , अशी धार – अशी ती जंगी तलवार हातात येताच राणोजी भरकन् उडून गबऱ्यावर बसला आणि दौलती म्हणाला ,

” कुनासंगं भांडानतंटा करायचा न्हाय . दिसावर परतायचं .

” राणोजीनं होकारार्थी मान हलवली आणि पूर्वेकडे तोंड केलं . गबऱ्या ढ़ेगा टाकीत ओढीनं निघाला . पाठीमागून फकिरा , सहदेव एका आवाजात ओरडले ,

” आता – आमाला पेढं आण

” राणोजीच्या पोटात कालवाकालव झाली आणि त्यानं नकळत गवऱ्याला टाच मारली . एकदम धडपडून गबऱ्या तुर्की चालीवर आला आणि निघाला . त्याच्या मानेला धनुष्याकृती बाक येऊन मयूरमस्कतीच्या तुऱ्याप्रमाणं त्याचं मस्तक नाचू लागलं .

सूर्य पश्चिमेला मंद गतीनं निघाला होता आणि राणोजी पूर्वेला निघाला होता . दोघांनाही परत फिरण्याची घाई झाली होती . राणोजीची नजर आपल्या शिवारावर भिरभिरत होती . मेहनती खाऊन पडलेल्या जमिनीतून आता कुऱ्या फिरत होत्या , ओढ्या बांधून शेतकरी पेरणी करीत होते . ते काळ्या वावरात बी पेरीत होते ; पण त्यांना खात्री होती , की याच मातीत हे बी जीव धरून उगवणार आणि काळ्याची गाजा हिरवीगार पिकं शोभविणार . पुढल्या वर्षी याच जागी आपली मेहनत साकार होऊन उभी राहणार , म्हणून माणसं कष्टत होती . त्यांना पाहन राणोजी स्वतःशी म्हणाला , ‘ जे पेरावं ते उगवतं ।

‘ शिगावची जोगणी वाजतगाजत निघाली होती . बारा बलुती झुलत होती . गावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या होत्या . बायकापोरं थव्याथव्यानं उभी होती . पोळ्या खाऊन ढेकर देत गडीमाणसं धावपळ करीत होतीः जोगणी भरली , की गावाचं दुःख – दारिद्रय टळतं , अशी श्रद्धा असलेली ती माणसं जोगणीला नमस्कार करून आऊक्ष मागत होती . आज जोगणी फिरून जाताच तमाशा उभा राहणार होता . उद्या सकाळी कुस्त्यांसाठी परगावची मंडळी येऊन आधीच दाखल झाली होती . खांद्यावर पिवळे लंगोट टाकून पहिलवान मिरवत होते . सर्वत्र माणसंच झाली होती . जागोजाग जोगणी आणि जोगा थांबत , लोक नमस्कार करीत आणि मग पुढं निघत .

गावातील ताकदवान माणसांनी जोगणीभोवती हाताला हात धरून कडं केलं होतं . त्यांच्या आसपास नंग्या तलवारी धंरून धारकरी चालत होते . त्यांची करडी नजर सर्वत्र फिरत होती . तलवारीच्या सावलीतच ती जोगाजोगणीची मिरवणूक चालत होती . पुढं सर्व वाद्ये एका तालात वाजत होती . पिवळ्या कापडात गुंडाळलेली ती वाटी घेऊन जोगणी मंदगतीनं निघाली होती . तिच्या शेजारी न्हावी झडपीण होऊन सूप फिरवीत होती . चांभार लाकडी घोड्याला बोराटीचा काटा बांधून माणसं हाकीत होता . तो बोराटीचा काटा लागला , तर अशुभ असतं , ही भीती असल्यामुळं कोणीही पुढं येत नव्हतं .

बाजीबा खोताचा लेक – बापू हातात नंगी तलवार घेऊन थोड्याच अंतरावर आपलं अवखळ घोडं दौडीत उगीचच भराऱ्या मारीत होता . बहिरी ससाण्याप्रमाणे सुरकांड्या मारून तो आपल्या चपळाईचं प्रदर्शन करीत होता . हेतू हा , की कोणीही जोगणीकडे गैरहेतूनं बघू नये .

दुसऱ्या बाजूनं गज्या माळी आपलं अवखळ घोडं लगाम ओढून आवरीत होता . अशी कैक घोडी त्या जोगणीच्या आसपास घिरट्या घालून कडवा पहारा देत होती .

काखेत तलवार दाबून राणोजी त्या गर्दीत वावरत होता . पेढ्यांचा पुडा कमरेत खोचून तो पुढील योजनेत गर्क झाला होता . त्यानं गबऱ्याला वाटेगावच्या बाजूला एका ओढ्यात बांधून ठेवला होता . कुठून जोगणीवर झडप घालून कुठपर्यंत जायचं आणि मग गबऱ्याला घेऊन कसं पुढे निघायचं , याची सारी जुळणी मनात करून तो त्या जोगणीबरोबर चालत होता . जसजशी ती जागा जवळ येत होती ; तसतसा तो अधिक बेभान होत होता . त्याची गात्रं बधिर होऊन दौलती , राही , राधा , फकिरा , सहदेव यांना तो विसरला होता . एका नव्या जगातच जणू तो वावरत होता . त्याच्या मनाची , त्याच्या विचारांची वेगळीच हालचाल सुरू झाली होती . जोगणीभोवती असलेल्या कड्यात राम्या लोहार हा सर्वांत दांगट होता . त्याचे डोळे तांबारले होते . तो कोणालाही आसपास येऊ देत नव्हता . आणि राणोजीनं त्याच्यावरच आपली नजर रोखली होती . कैकाड्याच्या अंगणात जोगणी गेली , की एका दणक्यात लोहार उतरायचा , असा त्यानं विचार करून ठेवला होता . कुठला धारकरी कुठं मारायचा , हे सारं ठरवूनच तो चालत होता .

जोगणी पेठेत आली आणि भैरू रामोशी भेटला . तो जवळ येऊन म्हणाला ,

” राणूदा , तू कवा आलास , गा ?

” ” उशीर आलोय . तू वाईच भाईर ये . ” राणोजीनं त्याला जवळजवळ ओढीत गर्दीतून बाहेर नेलं .

” राणूदा , काय भानगड ?

” ‘ तू आत्ताच्या आता गावाकडं जा .

” ‘ आन् काय करू ?

” ” शंकरराव पाटील आणि पंत ह्येस्नी सांग-

” ” काय सांगू ?

” ” सांग , राणूजी जोगणी घेऊन निघाला . आडवं या .

” ” म्हंजी ?

” ” म्हंजी काई न्हाय . भैरू , तू पळ ! हत्यारबंद माणसं आडवी आली पायजेत . मी निघालोच बघ .

” ” पर तू एकटा कसा लढणार ?

” ” बघ कसा लढतो , त्ये !

“” मग मी बी थांबतो . तू जोगणी घेऊन नीघ – मी वाटा रोखून धरतो . पिरसू पुढ

” नगं , भैरू , ही थटून लढण्याची वेळ नव्हं . तू जा , पळ !

” रामोशी निरुत्तर झाला . त्यानं आडाला जाऊन पंजी आखडलं आणि तो धावत निघाला . घुमेनं निघाला . राणोजी जोगणी घेऊन निघायच्या आत गावात कसं पोहोचायचं , याचा विचार करीत तो निघाला . एक एक क्षण त्याला युगासारखा वाटू लागला .

एका चिंचोळ्या बोळात शिरून जोगणी कैकाड्याच्या अंगणात आली . उथळ जागा , पुढं गाडीवाट . पलीकडे ओढा . तिथंच गबऱ्या राणोजीची वाट पाहत उभा होता . त्या मैदानात येताच गर्दी पांगली . पहारा सैल झाला . जो तो लघवी करायला पांदीकडे व वावरात पळत गेला . कुणी चंची सोडली , कुणी चुन्याच्या डब्यात बोट घालून तंबाखू चोळू लागले , कुणाच्या तोंडात विडी पेटली .

आणि राणोजीनं भर्रकन झेप घेऊन एका वारात राम्या लोहार आडवा केला नि दुसऱ्याच क्षणात ती जोगणीची वाटी हिसकली ; तोच एक तलवार त्याच्यावर आली . क्षणात ती खाली पडली . लगेच दुसरी तळपली . तिलाही खाली लोळवून डोळ्याचं पातं लवतं न लवतं , तोच राणोजी पांदीकडे धावला . एखादा बाण जावा , तसा तो गेला आणि ओरड झाली : ‘ जोगणी गेली !

‘ जोगणीचे धारकरी पुढं आले , तेव्हा गर्रकन फिरून राणोजी ओरडला ,

” म्होरं याला , तर मुंडकं मारीन !

‘ ‘ एकच हलकल्लोळ उडाला . जिकडे तिकडे माणसं सैरावैरा धावत सुटली . सर्वत्र एकच ओरड घुमली – जोगणी गेली ! जोगणी गेली !!

अंगावर येईल त्याच्या अंगावर जाऊन , कुणाला चालवून , तर कुणाला लोळवून , कुणाला हुलकावणी देऊन , तर कुणाचा वार चुकवून राणोजी दोन पुरुष पुढ उडून पांदीत पडला आणि गवऱ्याच्या दिशेनं धावला . आता त्याला अधिकच चेव आला .

‘ जोगणी गेली ‘ असं ओरडत पळणाऱ्या माणसांनी पळत पळत दंगल माजवली . त्या दंगलीत शिगावकरांची घोडी बावचळून गेली . पळणाऱ्यात जोगणी घेऊन कोण पळत आहे , कोणाच्या लक्षात येईना . त्यात बापू खोताचं घोडं एका दिडक्या गल्लीत अडकून पडलं . पुढून येणारे लोक त्याला वाट देईनात . तेव्हा खोत चिडला . त्यानं तलवार चालवून लोकांना परत फिरवून स्वतःची वाट करून घेतली आणि घोडं पुढं केलं .

बापू खोतानं माणसं जखमी केल्यामुळं अधिकच दंगल वाढली , पण त्याची मुळीच पर्वा न करता खोत कैकाड्याच्या पटांगणात आला . म्हणाला ,

” कुणी नेली जोगणी ? ” परंतु पळती माणसं बोलली नाहीत . गज्या माळी आला . काही आणखीही घोडी आली . त्यांना ओढ्यातून गबऱ्यावर बसून दरडीनं वर आलेला राणोजी दिसला आणि शिगावच्या सहा घोड्यांना टाचा मारल्या गेल्या .

” धरा , मारा , जाऊ देऊ नका- ” पुन्हा दंगल वाढली .

गाडीवाटेनं सहा मैलांची दौड मारण्याऐवजी माळानं सरळ चार मैलात आपली शीव गाठावी , असा विचार करून राणोजीनं आपलं घोडं माळाला लावलं . सपाट माळावर येऊन त्यानं पाठीमागची ओरड वळून पाहिली व एकदम पुढे झेपावून , गबऱ्याचा लगाम काढून फेकून , हातातील वाटी कमरेत खोचून , त्यानं तलवार सरळ धरली . गबऱ्याच्या कानाजवळ तोंड नेऊन ओरडला , ” गबऱ्या , मला घेऊन लवकर चल . मला टाकून जाऊनगं . आपली शीव गाठ . चलऽऽ

” बेलगाम गबऱ्या भन्नाट निघाला . त्याच्या पायात विद्युतगती संचारली . टापांचा खडखडाट करीत गबऱ्या निघाला . वाऱ्यावर आरुढ व्हावं , तसं ते घोडं निघालं , त्याचा देह गतिमान झाला . टाच मारण्याची गरज निकामी झालं . ‘ गती ‘ या शब्दातील अर्थ दुबळा झाला . गबऱ्या आपली शीव जवळ करू लागला . उलट येणारं वारं कापीत गबऱ्या धावत होता आणि निवडुंगात निपजलेलं धैर्य हातात फरडी तलवार घेऊन लगामाशिवाय त्याच्यावर बसून धुंद झालं होतं . त्याची विजयाकडे दौड निघाली होती .

मागून खोत धावत होता . तलवार उंचावून गर्जत होता . टाच मारीत होता . त्याचं घोडं ताशावर टिपरू पडावं , तशा टापा टाकीत पीछा करीत होतं . गज्या माळ्याचं घोडं त्याच घुमेत होतं . ती सारी घोडी कानाला कान लावत झेप घेत होती .

पाठीमागच्या टापा राणोजीच्या कानात वाजू लागल्या आणि गबऱ्याची भिंगरी झाली .

शिगावची हद्द संपली .

वाटेगावची हद्द लागली .

आणि बापू खोत अधिकच भडकून पुढे निघाला . त्याला पाहून राणोजीनं विचार केला, ह्यानं वाटी परत नेऊ नये . तो कमरेची वाटी काढून चावून खाऊ लागला , गिळू लागला.

गबऱ्या दमण्याऐवजी अधिकच दौडत होता . त्याच्या नाकातून कासारखा आवाज येऊ लागला . इतक्या वेगानं तो पूर्वी कधीच धावला नव्हता .

” राणोजी जोगणी घेऊन निघाला ! ” ही खबर भैरूनं पोचवली आणि गावात एकच गडबड उडाली . हां हां म्हणता साऱ्या गावात बातमी खेळली . सारा गाव शिगावच्या गाडीमार्गानं धावत निघाला . हत्यारानं वाट गच्च भरली . ती बातमी जेव्हा मांगवाड्यात आली , तेव्हा दौलती चरकला . राहीबाई भांबावली . राधा धावत दारात आली नि थांबली . फकिरा चिंचेवर चढून आपल्या झुंजार बापाला शोधू लागला . सहदेव रडू लागला . मांगांनी कु – हाडी ठोकल्या . महार धावत निघाले . शंकररावानं खोगीर न घालताच घोडं दामटलं . पंतांनी आपला घोडा दुडक्या

क्रमशः
स्रोत:(फकिरा या अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading