फकिरा.अण्णा भाऊ साठे(भाग ३०).

फकिरा..

त्याला झालं होतं . तो नाक फेंदारून घोड्याला सारखी टाच मारीत होता .

” लोकरात लौकर फकिराला पकडला पाहिजे ! नाही तर पन्नास हजारांपैकी एक पैही हाती लागणार नाही ! ‘ ‘ बापू खोत बोलत होता , ” एवढं मोठं लष्कर आज पंधरा दिवस त्याला पकडू शकत नाही , याचा अर्थच मला समजत नाही !

” ” त्याचा अर्थ सरळ आहे . ” प्रांताधिकारी म्हणाला , ” पळणाराची एक वाट आणि शोधणाराच्या हजार वाटा . त्यांचा थांगच लागत नाही , त्यामुळं आमच्या लोकांची दौड व्यर्थ आहे . शिवाय एवढं मोठं धाडस हा मांग करील , यावर आमचा विश्वासच बसत नाही- ”

” थांबा , सरकार- ” प्रांताला मध्येच अडवून रावसाहेब पाटील म्हणाला , ” शेवटी तुम्ही जे बोलला , त्येचा अर्थ आमाला कळत न्हाय ! ”

” अर्थ सरळ आहे . ऐका- ” प्रांत म्हणाला , ” जर फकिराला दौलतच हवी होती , तर त्यानं तुमच्या घरावर दरोडा घातला असता . सर्वशक्तिमान सत्तेशी वैर बांधण्याची त्याला गरजच काय होती ? म्हणून असं वाटतं , की सरकारी खजिन लुटणारे लोक भयंकरच असले पाहिजेत . सुतकीनं तिजोरी फोडून सरकारी दौलत घेऊन जाणं …

‘ प्रांत बोलता बोलता थांबला . त्याचा चेहरा किंचित उग्र झाला आणि चिंतेच्या छटांनी तो झाकळून गेला .

नेांच्या माळाला छावण्या पडल्या होत्या . सातारचे सर्व वरिष्ठ अधिकारी येऊन दाखल झाले होते . गोऱ्या फौजेनं बंदूका भरल्या होत्या . नीर काढून गुन्हेगारांना पकडून चिरडून टाकू , या हिरीरीनं सर्व चक्रं फिरत होती -चोराकडून चोर पकडण्याची नीती सरकारनं अवलंबिली होती आणि त्या कार्यात त्या खोऱ्यातील नामवंत गुन्हेगार जवळ केलेले होते . त्यांना हत्यारं , अन्न , मदत सर्व काही पुरवलं जात होतं . थोडक्यात इंग्रजांनी आकाशपाताळ एक करीत आणलं होतं .

आज छावणीत बापू खोत , रावसाहेब पाटील , कुमजकर कबीरा , धोंडी चौघुला , सातारकर गण्या मांग अशी कैक इरसाल माणसं बसली होती . सर्व बडे अधिकारी तीक्ष्ण नजरेनं त्यांचे चेहरे निरखीत होते . त्यांच्या बोलण्याचा भावार्थ ताडून खऱ्याखोट्याचे धागे जुळविण्याचा खटाटोप करीत होते .

माळाला सर्वत्र शुभ्र छावण्या पसरल्या होत्या आणि त्या छावण्यांतून गोरे लोक हत्यारबंद वावरत होते . जणू काय कोणी तरी त्यांच्याशी युद्धच पुकारलं होतं .

उशीर विचार करून बापू खोत पुन्हा म्हणाला , ” सरकारनं हे लक्षात घ्यावं , की फकिरा गावच्या पाटलाला मारून फरारी झाला आहे . पहिजे तर विचारा ह्या रावसाहेबाला – ह्याचे दात पाडले त्यानं !

” साहेब का हे ? – अशा भावार्थानं सर्वच लोक रावसाहेब पाटलाकडे पाह लागले .

मध्यभागी सर्वांपेक्षा वरिष्ठ अधिकारी बसला होता . तो इंग्रज होता . त्याला मराठी समजत नव्हतं . म्हणून त्याच्या कानाजवळ एक दुभाषा ताठ उभा होता . महत्त्वाचा शब्द किंवा प्रांताच्या चेहऱ्यावर उमटणारा भाव ताडूनच तो इंग्रज दुभाषाला खूण करीत होता आणि चटकन तो दुभाषा नम्रपणे वाकून मराठीचा इंग्रजी तर्जुमा करून सांगत होता . त्याला सर्व लोक जॉन मायकेल म्हणत . तोच आता खजिना लुटणाऱ्यांचा निःपात करण्यासाठी आला होता . रावसाहेब पाटलाकडे सर्वांनी टवकारून पाहताच जॉन साहेबानं दुभाषाला विचारलं ,

” हा कोण ? ”

” हा एका खेड्याचा पोलीस पाटील आहे . याच्याच गावच्या एका फकिरा नावाच्या मांगानं खजिना लुटला असावा , असा याचा दावा आहे .

हे ऐकून साहेबाचा चेहरा लालेलाल झाला . निळी बुबुळं गरगरा फिरली आणि तो पुढं रेलून म्हणाला ,

” हा फकिरा कसला आहे ?

” साहेबाच्या या सवालानं सर्वच गर्भगळित झाले . कोण उत्तर देतो , याची सर्वच वाट पाहू लागले . आणि मगरूर खोत आपला तुटका हात पुढं करून म्हणाला ,

‘ माय – बाप ! फकिरा भारी जबरा माणूस आहे . तो सिंहासारखा दिसतो , पण बळ हत्तीचं पाळतो आणि त्याच्या हातात तलवार तर विजेप्रमाणं खेळते .

” हो , हो . ” रावसाहेब पाटील मध्ये म्हणाला , ” मामाचा हात त्यानंच तोडलाय-

” हे ऐकून साहेब गंभीर झाला . चिंतेचा भाव त्याच्या चेहऱ्यावर दाटला . तो पुटपुटला ,

” कुठं आहे तो आता ? “

” फरारी – ” सर्वांनी एकदम उत्तर दिलं आणि साहेब अधिकच गंभीर झाला , तसा कबीरा चेकाळला . त्यानं खोताला खूण केली आणि खोत हळूच म्हणाला , ” ह्या फकिराला विष्णुपंत कुलकर्त्यांची मदत आहे . नव्हे , तो बामन त्याचा कणाच आहे . खजिना फकिरानंच लुटला आहे . जर हे खोटं ठरलं , तर जीभ कापून देईन

” मग पकडा त्याला ! ” साहेब भडकून उठला आणि सर्वांवर नजर फिरवित म्हणाला , ” फकिराला पकडण्यासाठी जे करावं लागेल , ते करा

छावणीत वातावरण एकदम तंग झालं . अधिकाऱ्यांनी कमरेचे पट्टे नीट केलं . हत्यारं चाचपली आणि एकाग्र दृष्टीनं ते पुढील हुकूम ऐकू लागले . साहेब टेबलावर बोटानं रेषा ओढीत म्हणाला ,

खास लष्कर कामाला लावून त्याला वेढा घाला . त्याचबरोबर तो सत्तू आहे , त्यावर सारखं दडपण लावून धरा ! काही लोकांनी त्याची ससेहोलपट चालू ठेवा चला

आणि मग दुप्पट धावपळ सुरू झाली . सर्व शक्ती फकिरावर रोखली गेली . सर्व विचार फकिराला शोधू लागले . हजारो डोळे , हजारो हत्यारं फकिराच्या मागावर निघाली . शेकडो घोडी दौडू लागली . सर्वांच्या जिभेवर ‘ फकिरा ‘ हेच शब्द खेळू लागले . आणि

– सूर्य हळूहळू वर आला . किरणं मांगवाड्यात उतरू लागली . अंधाराचा विरविरीत थर दूर होऊ लागला . मांगांची माणसं जागी होऊन पाहू लागली आणि एकदम भयभीत झाली . पोरं गांगरली . स्त्रिया मुलं पोटाशी धरून पळू लागल्या ; पण

पण रात्री अंधारातच इंग्रज सैनिकांनी मांगवाड्याला वेढा दिला होता . सर्व वाटा रोखल्या होत्या . हत्यारांनी मरणाचा हात धरला होता . जागोजाग गोरे शिपाई शिकाऱ्यांप्रमाणे सज्ज झाले होते . मांगवाड्यातील लोकांचा गोंधळ पाहून एका अधिकाऱ्यानं हुकूम सोडला ,

‘ -कोणीही पळायचं नाही . जो पळेल , तो मरेल ! आपापल्या घरात बसून राहा ! ” ह्या हुकमानं वातावरण थरारलं . मांग आपआपल्या खोपटापुढे दीनवाणे होऊन बसले आणि आता पुढं काय होणार , याची वाट पाहू लागले . तोच रावसाहेब पाटील ओरडला , ” कोणी घरात जायचं नाही ! ” असं म्हणून तो अधिकाऱ्याकडे वळून म्हणाला ,

” साहेब , ह्यांचा दारकोंडा केला पाहिजे ! “

” दारकोंडा ? ” मांगाची खोपटं न्याहाळीत तो साहेब म्हणाला , ” अरे , पण ह्यांच्या घरांना दारंच नाहीत ; मग ह्यांचा दारकोंड करण्याचा प्रश्नच कसा येतो ? माझ्या हे लक्षातच येत नाही . म्हणे , दारकोंड करा ! दारं नसल्यावर दारकोंड ! ” असं म्हणून तो साहेब पोट धरून हसू लागला .

” हासताय काय ? ” पाटील चिडला .

” मग काय रडू ? ” तो अधिकारी बिथरला .

” मी दारकोंड करून दावतो ! ” पाटील म्हणाला . ” मग करा ना ! ” असं म्हणून तो अधिकारी डोळे वटारून पाहू लागला आणि पाटील पुढं होऊन म्हणाला , “ ह्या निवडुंगाच्या डांबांनी आनी बाभळीच्या नांग्यांनी साऱ्या खोपींची दारं कुडून टाका !

“” हां – हे पटलं . ” साहेबानं मान डोलावली .

थोड्याच वेळात काटेरी कुंपण घेऊन , सर्व घरांची दार बंद करून , मांगांचा दारकोंड पूर्ण करण्यात आला . सर्व माणसं आपापल्या दारात निर्वासित होऊन बसली आणि त्यांच्यावर लष्करानं कडक पहारा सुरू केला .

मांगांचा आणि महारांचा दारकोंड झाला होता . त्या सर्व लोकांना जनावरांप्रमाणं वागवण्यात येत होतं . ती माणसं विचार करीत होती , की हा अन्याय आम्हांवर का ? फकिराला पकडण्यासाठी आम्हांला यांनी अडकवलं आहे याचा अर्थ काय ? बरोबर आहे . फकिरा आमचा आहे , म्हणून आम्हांलाच यांनी चिरडून टाकायचा बेत केला आहे ; पण आमचा दारकोंड करून का यांना तो फकिरा सापडणार आहे?

आणि त्याच वेळी निवडक सैनिक आणि बलिष्ठ घोडे घेऊन बाबरखान फकिराच्या मागे धावत होता आणि फौज पाठीवर घेऊन फकिरा सह्याद्रीतून दौडत होता . साधू , बळी , मुरा , सावळा , तायनू महार , निळू नि चिंचणीकर पिरा , भिवा असे निवडक साथीदार घेऊन तो झुकांड्या देत होता . गबऱ्याला जणू ती धावपळ कळून चुकली होती . त्याचा तर पायच जमिनीवर ठरत नव्हता . कीर्र झाडीतून , उभ्या कड्यावरून , सपाट प्रदेशातून तो फकिराला घेऊन वाऱ्याप्रमाणं धावत होता . त्याच्या पाठीवर पळून पळून कैक सरकारी घोडी कोकदम्याला आली होती . कैकांनी आपली घोडी बदलून घेतली होती . कैक सैनिक बदलून गेले होते .

कारण फकिराला कैद करणं सोपं नव्हतं . पिच्छा करणं आणि कैद करणं यातील भेद सैनिकांना उमगला होता . जर का हा फकिरा अचानक उलटला , तर सारंच मुसळ केरात जायचं , ही भीती सर्वांनाच वाटत होती . म्हणून ते पिच्छा करणारेही जीव राखूनच पाठलाग करीत होते .

आणि फकिरा आपली नेक माणसं घेऊन नि हत्यारं नीट धरून पळ काढीत होता . पळ काढताना उलटण्याचीही तयारी त्यानं केली होती . मध्येच उलटून शत्रूला चेचून काढायचं , असा विचार त्यानं केला होता .

तब्बल आठ दिवस धावपळ करून शेवटी फकिरा एका डोंगरावर जाऊन पोहोचला होता. मागावरच्या लोकांना घोटाळ्यात घालूनच ते उंच शिखर त्यानं गाठलं होतं . आज तो दमगीर होऊन एका झाडाखाली बसून विचार करीत होता. आता लौकरच लौकर उलटून मागची माणसं कापून काढलीच पाहिजेत , तरच उसासा घेता येईल .

आणि बाकीचे जोडीदार पुढं निघण्याची तयारी करीत होते . सर्वांनी जेवणं आटोपली . पुन्हा खोगीर घातलं , तेव्हा फकिरा म्हणाला ,

‘ आता किती पळायचं ? आपले सारे लोक कुठं हायती , त्याचा पत्ता न्हाय . मनगटानं मजबूत असलेल्या मानसांची मला आज गरज व्हती ; पन तीच न्हायती ! “

क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading