१९४८ साली श्रीगोंदा शहरात उर्दू शाळेची स्थापना झाली. त्यामुळे श्रीगोंदा शहरातील पहिली ते आठवीपर्यत तेथे शिक्षणाची सोय झाली. शिक्षणाचे माध्यम उर्दू असल्याने प्रामुख्याने मुस्लिम समाजातील विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेतात. भारत – पाक फाळणीपुर्वी पंजाबी, सिंधी व शीख समाजाने देखील उर्दूला मातृभाषा म्हणून स्वीकारले होते. अतिशय गोड व दिलखेचक असणाऱ्या या भाषेची नजाकत उर्द शायरीने जगभर नेली. गालीब, मीर, इकबाल, यांच्या भाषेचे रामप्रसाद बिस्मिल ते शहिदे आझम, भगतसिंगपर्यत असंख्य क्रांतीकारी दिवाणे होते. इन्कलाब झिंदाबाद स्वातंत्र्य संग्रामात नवचैतन्य आणणारा नारा उर्दूची देणगी आहे. अशा या रसाळ व सुबोध भाषेतून राष्ट्रीय एकात्मक जोपासण्याचे काम उर्दू शाळा नेटाने करत आहे.
दरम्यानच्या काळात शाळेची दयनीय अवस्था झाली होती. शाळेची ही अवस्था पाहून अनेकांची मने व्यथित झाली. शाळेची अवस्था बदलण्यासाठी अनेकांनी हातभार लावला. लोक सहभागाची चळवळ उभी राहिली. उर्दूचे ज्ञानमंदिर सक्षम बनविण्यासाठी अनेकांची साथ मिळाली. सर्वसामान्य लोकही पुढे आले. नगरसेवक अख्तर शेख, स्थानिक मुस्लिम कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शाळेचा विकास केला. पहिली ते आठवीपर्यत मान्यता असून विद्यार्थीपट ३४ एवढाच होता. प्राथमिक नंतर माध्यमिक व उच्च माध्यमिकची सुविधा नसल्याने पालकांचा उर्दूकडे कल कमी होता. राष्ट्रपुरुषांची जयंती स्मृतिदिन नित्यनेमाने साजरी केली जाते. राष्ट्रीय सणात उर्दू शाळा सर्वात पुढे असते. शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्याध्यापिका फौजिया पठाण व शिक्षक जीवापाड मेहनत घेत आहेत. अनेकविध उपक्रम शाळेत राबवत आहेत. शिष्यवृत्ती परिक्षा, मार्गदर्शन, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचेही आयोजन केले जाते. शाळेच्या या विकासात शालेय साहित्यांचा भरघोस वापर केला जातो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेऊन अध्ययन व अध्यापन केले जाते. त्यांच्या या परिश्रमाला फळ मिळाले आहे. केंद्रातील पहिली आयएसओ मानांकन मिळवताना सर्वात स्वच्छ शाळा म्हणूनही तिचा गौरव झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासाबरोबरच शारीरिक विकास महत्वाचा आहे. त्यामुळे नियमितपणे खेळाचा सराव घेतला जातो. त्यामध्ये कबड्डी, खोखो तसेच इतर खेळांचाही समावेश आहे. या सरावामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. २०१७ – १८ च्या तालुका क्रीडा स्पर्धेत कबड्डी व खोखोमध्ये शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. अहमदनगर उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित विविध स्पर्धेत या शाळेतील विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त केले आहे.
निबंध स्पर्धेत मजमून नवेसी, वक्तृत्व स्पर्धेत तकरीरी मुकाबले, ईशस्तवनमध्ये हम्द, पैंगबर स्तवनमध्ये नाअत, कथावाचन स्पर्धेमध्ये किस्सागोई या विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर यश मिळविले. अग्नीपंथ फौडेशनच्या माध्यमातून राबविल्या गेलेल्या एक मूठ अनाथांसाठी या उपक्रमाता शाळेतील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला.
शालेय व्यवस्थापन समितीबरोबरच पालक संघ, माता – पालक संघ कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनांमुळे शाळेनेही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. ई – लर्निंगची सुविधा असणा ऱ्या या शाळेत उर्दूबरोबरच मराठी व इंग्रजीचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. राष्ट्रीय एकात्मता जपणारी व माणसांची सुदृढ बनविणारी उर्दू भाषा भारताचे लेणे आहे.
अनंत अडचणींचा सामना करीत ७५ वर्षापासून शहरात उर्दूचा झेंडा फडकत आहे. ही असामान्य बाब म्हणावी लागेल. शिक्षक, पालक व व्यवस्थापक समितीच्या प्रयत्नातून हे अपूर्व यश मिळत आहे .
शब्दांकन : अर्शद शेख प्रतिनिधी, प्रभात अमोल उदमले न्युज चॅनल
गेल्या ७० वर्षापासून उर्दू भाषेचा झेंडा उंचावत ठेवणारी शाळा श्रीगोंदा शहरात आज मानाने उभी आहे. अनेक संकटे आणि आव्हानांचा सामना करत या शाळेने नवभरारी घेतली आहे. श्रीगोंदा केंद्रातील पहिली आयएसओ होण्याचा मान या शाळेनं मिळविला असून, शहरातील सर्वात सुंदर शाळा म्हणूनही तिचा नावलौकीक आहे. फौजिया पठाण, मुख्याध्यापिका.
(प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशित झालेल्या वेळेची आहे.)
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
अग्नीपंख फौंडेशनच्या ‘बेस्ट स्कूल अँड बेस्ट लीडर’ या पुस्तकाचा आज शेवटचा भाग संपन्न झाला आहे.
