फकिरा.अण्णा भाऊ साठे(भाग ३१).

फकिरा.

” काय इचार हाय ? ” सावळानं विचारलं .

” काय न्हाय- ‘ फकिरा म्हणाला , ” पिच्छा करनारास्नी हात दावून मगच पुढं जावं , असं वाटतंय- “

” मग ठरवा तर — ” मुरा म्हणाला

, ” ठरवायचं एवढंच . ‘ ‘ फकिरा म्हणाला , ” आता सरकारच्या हालचालींची खबर लागेल . जर सरकार थंड असेल , तर आपून आपली मानसं जमवून कुटं तरी उलटून ह्या मागे लागलेल्या भुतांचा निकाला लावायचा !

” सूर्य मावळेपर्यंत फकिरा त्या डोंगरावर थांबला होता . कारण आजच घमांडी येणार ह्येता नि घराकडची खबर आणणार होता . फकिराचं सारं लक्ष घराकडं लागलं होतं . हरकमा वाटून घेऊन बरोबरची सर्व माणसं आपापल्या गावी गेली होती . त्यांचं काय झालं असेल ? का कोणाला अटक झाली आहे ? जर एखादा आपल्यांतील माणूस पकडला गेला , तर ? आणि त्याच्याकडे मुद्देमाल सापडला , तर इंग्रज चैन पडू देणार नाही आणि स्वतःही चैन घेणार नाही . आता हा जो पाठीवर बाबरखान पडला आहे , तो खजिन्यासाठीच ; परंतु जर भरीला भर पडून एखादा आमचाच माणूस पकडला गेला नि त्यानं गुन्हा कबुल केला तर ? … अशा अनेक विचारांनी फकिरा आज चिंतातूर झाला होता . तो निर्वाणीचा विचार करीत होता . पाठीवर असलेल्या बाबरखानावर उलटून त्याचा निःपात करायचा , हे ऐकन सर्वच गंभीर झाले . सावळा म्हणाला ,

“ वाईच दमानं घ्या . पार जिवावरच आलं , तर मग जीव देऊ , न्हाय तर जीव घेऊ . आता भाकरी खाऊ या-

” तिन्हीसांज झाली होती . भाकरी खाऊन फकिरा एका जाळीत पडला होता . घमांडी येणार म्हणून तो त्याची वाट पाहत होता . सावल्या लांबत होत्या . सूर्याच्या अस्तित्वाला ओहोटी लागली होती , अंधाराचा काळा पडदा जगावर पसरला जात होता . किरणांतली प्रखरता शीतल होऊन ती उगीचच धडपड करीत होती . रानटी वारा गवतात शिरून त्याला पाडीत होता . उंच झाडं वाऱ्यानं कापरं भरल्याप्रमाणं कापत होती . पाखरं आपापल्या घरट्यापुढं येऊन बसली होती . त्यांनी किलकिलाट आरंभला होता . आपली तीक्ष्ण नखं मुठीत घेऊन रानमांजरं त्या पाखरांवर टपली होती .

खाली तळवटाचा सुपीक प्रदेश अस्पष्ट दिसत होता . हिरवे मळे काळ्या ठिपक्यांचा आकार घेत होते . गावं घरांचा ढीग भासत होती आणि त्यांच्यावर धुराचे ढग तरळत होते .

नकळत आज उद्यात एकरूप झाला आणि सांज रात्रीच्या अंकावर निद्रावश झाली . चराचर लुप्त झाल . दृष्टातील अपार लांबी मर्यादित झाली . सर्वत्र बिकट काळोख दाटला .

फकिरा , मुरा , पिरा , सावळा , बळी , साधू एका जाळीत येऊन सावध बसले . घमांडी येणार होता . त्यानं लौकर यावं , असं त्यांना वाटत होतं . त्याचबरोबर पाठलाग करणाऱ्यांचा अंदाज नव्हता . कदाचित तेही डोंगर चढण्याचा संभव होता . त्यात तो कडव्या नागासारखा बाबरखान फौजदार कुठं नि केव्हा वार करील , याचा नेम नव्हता .

एकाएकी तळवटाला गडबड झाली आणि फकिरा चटकन उठला . कानोसा घेऊ लागला . तोच तायनू म्हणाला , ” धनगराचं मेंढरू लांडग्यानं पळवलं असंल . ” आणि थोड्या वेळानं एक माणूस त्यांच्याच रोखानं येताना दिसला . सावळा पुढे होऊन ओरडला , ” कोन हाय त्ये ? “

” मी हाय घमांडी-

” घमांडी आल्याचं कळताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला . त्या सर्वांनी एकदम घमांडीला मिठ्या मारल्या . मग ते सर्व एका खडकावर बसले आणि फकिरा म्हणाला ,

” खाली गडबड कसली झाली ? “

‘ बाबरखान परतला .

हे ऐकून सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला . त्यांच्या उरावरचं ओझंच जणू दूर झालं आणि मोकळी झालेली मनं क्षणात उल्हसित होऊन हासू लागली ; परंतु फकिरा गंभीर होऊन म्हणाला ,

” ह्यो बाबरखान परतला का ? “

“ का म्हंजी ? ” सावळा म्हणाला , ” साप मानसाला भितो नि मानूस सापाला टाकतं , तसंच हाय ह्ये !

” मग ते सर्व घमांडीभोवती बसून ऐकू लागले आणि आणलेल्या खबरा तो सांगू लागला . घमांडी म्हणाला ,

” बाबरखान , बापू खोत , चौगुला , कबीरा आणि सरकार ह्यांनः रान चाळून काढलंय . आज सकाळी आपली सारी मानसं पकडून नेल्ला न्हेली . पंतास्नी बी छावनीचं बोलावनं आलं व्हतं , त्ये जानार व्हतं- “

” कुनाकुणाला अटक झाली ? ‘ फकिरानं चटकन विचारलं आणि घमांडी म्हणाला ,

” एकून एक मानूस न्हेलंय . दौलूआबा , राधाआई , म्हातारी आई नि सरूकाकू – म्हंजी मांगवाड्यात औसदाला मानूस ठिवलं न्हाय ! ”

” म्हंजी ? सारी मानसं न्हेली ? ” बळीनं आश्चर्यानं विचारले .

“ एक मानूस न्हाय मांगवाड्यात . ‘ घमांडी म्हणाला , ” आनी दारकोंड केलाया . समद्या दारास्नी बाभळीच्या काट्या लावून दारं कुडल्याती . ढोरं – गुरं उपाशी मरत्याती “

मग घात झाला- ” मुरा तरमळला .

” घात ? ‘ ‘ घमांडी रडकुंडीला येऊन म्हणाला , ” सरकारी शिपाई मुंगीवानी ” पसरलाय . दिसलं , त्येला अटक करत्यात . जो त्यो म्हनतो , फकिरानंच खजिना लुटला-

” हे ऐकून ते सर्व गंभीर झाले . फकिरा उदास झाला . तो खिन्न होऊन म्हणाला ,

‘ -घरटंच मोडलं माझं नि इचवाच्या पेवात पडलोय . आता पुढे काय ? ” एकाएकी त्या जाळीत वातावरण तापलं . फकिराच्या डोळ्यांपुढं अटक करून नेलेली राधा , दौलती , राही , सरू यांच्या मूर्ती उभ्या राहिल्या . म्हातारीकोतारी , बायकापोरं काय करीत असतील ?

फकिराला सरकारच्या या करणीची चीड आली . तो उद्विग्न होऊन म्हणाला ,

” आता आपुन काई तरी केलंच पायजी ! “

” काय करायचं ? ‘ ‘ मुरा उद्गारला आणि फकिरा मुराला म्हणाला ,

” अन्ना , आताच्या आता तुम्ही कुमजला जायचं आनी सत्तूला गाठून त्येला ह्ये सारं सांगायचं . नेर्त्यांची ही छावनी मारूनच काढली पायजी- “

” बरं , आनी काय करू ? ” मुरानं विचारलं .

-आणि फकिरा म्हणाला ,

” कंच्या दिसी नि कंच्या येळेला सत्तू छावनीवर येनार , त्ये पक्कं करा . म्हंजी आपुन बी त्या येळंला आपली मानसं जमवून छावनीला भिडायचं नि काढायची छावनीच मारून . आता दुसरा इलाजच न्हाय . मरान हे येणारच हाय . एवढंच की त्ये आलंच , तर वाईच लौकर तरी यील ! “

” पर म्या परत कुठं यीयाचं ? ‘ ‘ मुरानं विचारलं आणि फकिरा म्हणाला ,

‘ आता रातोरात दौड मारा . सत्तूला भेटून समदं ठरवून उद्या रातचं सातदऱ्यात या . तवर मी इकडं समदी तयारी करून वाट बघतो . ‘ असं म्हणून त्यानं आकाशात नजर झुगारली .

निरभ्र आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या . चांदण्यांचा रुपेरी रस त्या विशाल वनराजीवर ओसंडत होता . ती कीर्र झाडी शांत भासत होती आणि तो महाराष्ट्राचा – बंडखोर महाराष्ट्राचा आत्मा सह्याद्री अचल बसला होता . आज युगानुयुगं त्यानं कैक बंडखोरांना त्या एका जागी बसून – अचल बसूनच – अमोल साहाय्य केलं होतं . तो देशभक्तांचा अग्रणी , तो मराठा शाहिरांचा स्फूर्तिदाता आज जणू फकिराचा शब्द न् शब्द ऐकत होता आणि गालात हासत होता . त्यानंच कैक देशभक्तांना आपल्या कुशीत जागा दिली होती आणि कैक बलाढ्य पुंडांना , आक्रमकांना गारद केलं होतं . तो महाराष्ट्राचं कुलदैवत सह्यगिरी आज भलताच शांत नि गंभीर भासत होता .

कुमजेला जाऊन , सत्तूच्या मदतीनं छावणीवर हल्ला करण्याचा बेत नक्की करून , फकिरा उठला . मुरानं फकिराच्या गळ्याला मिठी मारली . दोघे कडकडून भेटले आणि लगेच मुरा घोड्यावर बसला .

” मारा दौड- ” फकिरा म्हणाला , “ वकूत कवा तरी येतो नि आला तर त्यो हात न्हाय . छावनीवरचा हल्ला लांबनीवर टाकू नगा ! मी बी बसत न्हाय . जर त्यो बाबरखान पाठीवर पडला , तर उद्याच मी उलटून त्याला मारून काढतो . जावा आता . उद्या लांब न्हाय ! जपून …

भर्रकन मुरानं लगाम ओढला . त्याचं घोडं जाळीआड झालं नि उसळून दौडू लागलं . त्याच्या टापांनी जंगल जागं झालं . जणू ह्या सह्याद्रीचं विशाल हृदयच धडधडत होतं . फकिरा कान लावून उशीर ऐकत उभा राहिला . हळूहळू मुरा अंधारात दूर गेला आणि

आणि फकिरा झेप घेऊन गबऱ्यावर बसला आणि गबऱ्या चालू लागला . आपण कुठं निघालो आहोत , याचा कुणालाच पत्ता नव्हता .

अर्धा डोंगर उतरल्यावर खंडू रामोशी म्हणाला ,

‘ कुठं जायचं आपुन ? ”

” नाईक , कुठं जायचं , हे परत मला इचारू नगा ! फकिरा किंचित चिडक्या स्वरात म्हणाला , ” आता मी वाऱ्यावर पाचोळा- “

” असं म्हनू नगा . ” रामोशी आवाज चढवून म्हणाला , ” हातात शिर घेऊन फिरनारानं पाचोळा होऊन चालत न्हाय- ”

” खरं हाय , नाईक ? ” – गबऱ्यावरून उतररून फकिरा खंडूच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला , “ मी हादरलो . ‘

” हादरू नगा . ” खंडू म्हणाला , ” टाचा रुतवून लढत लढत टाचंवर मरू या ! ”

” शाबास ! ” फकिरा म्हणाला , ” मरू या ! नेर्त्याच्या माळाला आमची अब्रू , आमची अवलाद नि आमची आई कृस्ना दावनीला बांधनाराची छाननी कापून काढीत मरू या ! आपुन मरू , पन ह्यो मुलूख मरनार न्हाय . ह्यो डोंगर मरनार न्हाय . ही झाडं … ही माती … ह्यास्नी मरान न्हाय !

” बोलत बोलत ते डोंगर उतरले .

सूर्य मावळत होता . गंभीर चेहरा करून विष्णुपंत छावणीबरोबर पडले आणि आपल्या घोड्याकडे निघाले . एका झाडाखाली भैरू रामोशी घोडा धरून त्यांची वाट पाहत होता . चालता चालता पंतांनी वळून पाहिलं आणि दौलतीनं हाक

क्रमशः
अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading