फकिरा..
रानात चालू लागला . पांगून ठेवलेली माणसं जमवून , त्या सर्वांचा विचार घेऊनच काय ते निश्चित करायचं , असा बेत करून तो निघाला .
चांदणं दुधासारखं वर्षत होतं . सृष्टी रुपेरी प्रकाशानं न्हाऊन निघाली होती. वातावरण धुंद झालं होतं . विहिरीवरच्या कण्हेरीची फुलं आपला सुगंध पसरवीत होती आणि त्या मळ्याला लागून असलेल्या मसणवटीत घाणेरीला बहर आला होता .
मसणवटी नि मळा यांमध्ये सावळा व भिवा आपली दहा माणसं घेऊन बसले होते . बाकीची माणसं घोंगड्यांच्या खालवरी घालून पडली होती . सावळा आणि भिवा यांनी गांजा ओढल्यामुळे ते तर्र झाले होते . जे सुचेल ते बोलत होते . वाऱ्यानं गांज्याची तार चढतच होती . भिवा चेकाळून गेला होता . तो हळूच म्हणाला ,
” पाव्हनं , आता असं करू या-
” ” कसं करू या ? ” सावळ्या हुंकारला आणि भिवा म्हणाला,
” फकिरा लवकर येत न्हाय , तवर तुमी एक गोष्ट सांगा . मी एक लावनी म्हनतो- “
” काय ? लावनी ? ” सावळा आश्चर्यानं म्हणाला , ” आवं तुमी लावनी म्हननार ? “
” का ? का ? ” भिवा चिडक्या स्वरात म्हणाला .
” मला काय समजता तुमी ? माझ्यावानी गानारा आमच्या गावात न्हाय दुसरा ! “
” ” त्ये खरं असंल , वं- ” सावळा म्हणाला .
” पर हतं मळा जवळ हाय नि आपुन पाटलाच्या गावंदरीला बसलोय- ”
“ तुमी गुमान गोष्ट सांगा ! ” भिवा गुरकला , ” आनी मग ऐका ह्या सरज्याची लावनी ! ‘
” बरं बाबा ! ” सावळा म्हणाला , ” आदी गोस्ट सुरू करतो . ऐका “
एका कुंभाराचं एक गाढव व्हतं . त्ये रोज दिवसभर काम करून थकत व्हतं . म्हनून कुंभार त्येला रातचा रानात सोडीत व्हता नि ते गाढव लोकांची उभी पिकं खात व्हतं . गहू , हरबरा , ऊस , गाजरं अशी पिकं चोरून खाऊन ते गाढव माजलं . अगदी भोपळ्यागत टमटमीत झालं- ”
” म्हंजी रातभर चोरी करून दिसाचं घरला यीयाचं त्ये ? ” भिवानं मध्येच विचारलं आणि सावळा म्हणाला ,
” हो . म्होरं त्या गाढवाला येक कोल्हा भेटला . त्यो बी चोर . मग त्या दोघांची जमली दोस्ती . आनी दोघं बी रातभर चोरून खात फिरू लागलं . पर कुनाच्या बाला घावायचं न्हाय ते दोघं .
” ” बरं , म्होरं ? ” भिवानं हुंकार दिला आणि सावळा म्हणाला,
“ एकदा अशीच चांदनी रात व्हती . गाढव नि त्यो कोल्हा एका मळ्यात शिरून खात व्हतं . पोटभर खाल्ल्यावर गाढव कोल्ह्याला म्हनतं , ‘ ए गड्या , मी गानं म्हनू का ‘ पन कोल्हा टराकला . त्यो म्हनला , ‘ मामा , तुमचा आवाज दांडगा हाय . तुमी गानं कसं म्हननार ? ‘ तवा त्या गाढवाला राग आला नि त्ये बिथरलं नि कोल्ह्याला म्हनलं , ‘ ए , भडव्या , मला काय समजतोस ? मला का गानं येत न्हाय व्हय ? “
“ मग कोल्हा काय म्हनला ? ‘ ‘ भिवानं विचारलं आणि सावळा म्हणाला ,
” त्यो काय म्हननार ? त्यो म्हनाला , ‘ गाढवमामा , तुमी हातं गानं म्हना . मी त्या बांधावर बसून मळंकरी येतील , त्येस्नी बघतो . ‘ कोल्हा दूर गेला . एका बांधावर बसला आनी त्या गाढवानं आपलं भसाडं गानं सुरू केलं . त्याबरोबर मळंकांस्नी जाग आली . त्येनी काठ्या काढल्या आनी त्या गाढवाला मार मारून खाली पाडलं . पार पडलं गाढव आनी मंग मळंकऱ्यांनी एक उळळ आनून त्या गाढवाच्या गळ्यात बांधलं . त्ये जितं व्हयील नि पळंल , म्हनून . “
” आनी , वं , मंग ? ” भिवा उद्गारला .
” आनी काय ? ” सावळा म्हणाला , ” उशिरानं गाढव जागं झालं आनी उखळासकट पळाया लागलं . तवा कोल्हा म्हनला , ‘ मामा , गानं चांगलं व्हतं . म्हनूनच तुमास्नी ह्यो मनी बक्षीस मिळालं ‘ जाली माजी गोस्ट . हं करा सुरू गानं-
” ही गोष्ट भिवाला पटली . तो एकाएकी पोट धरून हसू लागला . त्याच्या भयंकर हसण्यानं मळकरी जागे झाले आणि मसणवटीत भूतच उठलं , असं समजून पळू लागले .
भिवा पोट धरून हसत म्हणाला ,
” नका , नका , माझं गानं व्हायलं . खरं हाय , माझ्या बी गळ्यात उळळ पडायचं रं , बाबा-
” एवढ्यात फकिरा आला . सर्व एकत्र आले आणि पंतांनी जे जे सांगितलं , ते सर्व फकिरानं सर्वांना सांगून तो म्हणाला ,
” आठजन जोवर हजर होत न्हाईत , तवर आपली मानसं सुटत न्हायती . सरकार त्येस्नी सोडनार न्हाय ! “
” आठजन कोन ? ” एकदम आवाज उठला .
” ऐका- ” फकिरा म्हणाला , ” फकिरा , पिरा , मुरा , बळी , तायनू , सावळा , भिवा आनी …
” ” मग तुमचं मत काय ? ” सर्वांनी विचारलं .
” आताच त्ये मी कसं सांगू ? ‘ फकिरा म्हणाला , ” जे पंतांनी सांगितलं व्हतं , ते म्या तुमास्नी कळवलं . आता म्होरं काय करायचं , ते मुरा आल्यावर ठरवू . सत्तूचं पाठबळ मिळालं , तरच आम्ही नेर्त्याची छावनी कापून काढू , न्हाय तर … ‘
” न्हाय तर काय ? ” भिवानं मध्येच विचारलं आणि फकिरा म्हणाला ,’
न्हाय तर आमास्नी आपली मान कापून दिली पायजे- आठ मुंडकी -घेऊनच सरकार माळाला खोतानं लावलेली दावन सोडनार हाय . आनी जर आम्ही आठजन हजर न्हाय झालो , तर एकून एक मानूस कुत्र्याच्या मौतीनं मरनार हाय , समद्यात मोठा घात झाला , नि त्यो म्हंजी बळीबा घोंचीकर कैद झाला- “
” काय बळीला पकडला ? ‘ ‘ सर्वांच्या मुखांतून आश्चर्याचा उद्गार निघाला आणि तळमळून फकिरा म्हणाला ,
” बळीला कन्हाडला कैद झत्तली आनी छावनीपातूर अकरा मैल खोतानं त्येची दाढी उपटून काढली . मुस्क्या बांधून बळीची दाढी हिस्कून काढणारा खोत अजून जिवंत हायः आनी आमोबी जिवंत हाय . आमच्या घरास्नी काट्या लावून आमचा दारकोंड करनारा पाटील अजून पायावर उभा हाय नि आम्ही हजर व्हायचं का न्हाय , ह्येचा इचार करतोय …
” ” आनी ऐका- ” खंडू रामोशी म्हणाला , ” खोत हातंच- जावयाकडंच हाय . हातं बसूनच त्यो किल्ल्या फिरवतो- ”
” मग बघता काय ? ” सावळा पिसाट होऊन म्हणाला , ” बळीच्या बदलात खोताला कैद करू या चला- ‘
” हो , खरंच ! ” भिवा म्हणाला , ” आनी त्यो पाटील बी . चला . दनक्याला दनका ”
” वाईच आमचा बी हात दावू या की ! ‘ ‘ तायनू म्हणाला आणि सर्वच उठले .
” थांबा . ” फकिरा म्हणाला , ” खोताला भाईर काढायचा , तर मांजरानं कोंबड उडवावं , तसं झालं पायजी आ ियेता येता रावसाहेबाला बी वढा ; काय व्हायचं , ते होऊ द्या .
” तुम्ही थांबा हातंच ! ” बळी म्हणाला , “ आमी येतो भर्रकन . काळजी करू नका . त्येच्या बायकूला देखील कळू देत न्हाय- ‘
” मी घराकडं पळतो . ‘ ‘ फकिरा म्हणाला , ” मांगुड्यात लवकर ये .
” चेतलेली पन्नास माणसं घेऊन बळी , पिरा , सावळा , साधू हे गावाकडं धावले . वेशीपासून सर्वांनी निःश्वास रोखले होते . हातातील हत्यारं अलगद धरून भर वाऱ्याप्रमाणं ते पाटलाच्या वाड्याला जाऊन पालीप्रमाणं चिकटून बसले .
वाड्यात माणसं जागीच होती . खोत , पाटील उद्याचे मनसुबे आखीत होते . गणू नाईक , गण्या मांग अशी बरीच मंडळी बसली होती . गणू रामोशानं पुष्कळसे फरारी आणून खोतापुढं हजर केले होते . त्यांनी फकिराला कैद करण्यास मदत करावी आणि त्या बदलात सरकारनं त्यांना गुन्हे माफ करायचे , असं ठरलं होतं .
पुष्कळ उशिरानं ती आलेली मंडळी निघून गेली आणि खोत अंगणात आला. सोप्यात काही माणसं बसली होती. कंदील जळत होते. गळ्यातील जानवं कानात अडकवून खोत अंधारातच सरकला. ज्योत्यावरून उतरून एका भिंतीआडबसला आणि गप्पकन सावळाची प्रचंड मिठी त्याच्यावर पडली . किंचित धुसफूस झाली आणि खोताचे पाय जमिनीपासून उचलले गेले . तोंड कायमचं बंद झालं होतं . हा काय प्रकार आहे , हे खोतालाच उमजलं नाही . आपण दूर जात आहोत , एवढंच त्याला जाणवत होतं .
किती तरी उशिरा मामा आला नाही , म्हणून रावसाहेब पाटील चमकला . त्यानं अंधारात रोखून पाहिलं आणि तो हळूच उठून दारात आला . कोणाशी बोलत असतील , असं वाटून तो पुन्हा जोत्यावर आला . इकडे तिकडे पाहत हळूच म्हणाला ,
मामा
हुंकार आलाच नाही . सर्वत्र सामसूम असून हा एकटाच कुठं गेला , याचा विचार करीत पाटील जोत्यावरून खाली उतरला
आणि … – आणि एक भयंकर मिठी त्याच्यावर पडली . प्रथम गप्पकन तोंड बंद झालं नि लगेच तो अंतराळातून कुठं तरी वाहत निघाला आणि मग त्याच्या लक्षात आलं , आपण मृत्यूच्या मिठीत नव्हे दाढेत आहोत . हा क्रूर मृत्यू आपणाला घेऊन निघाला आहे . मामाही याच वाटेनं गेला असावा . इतक्या सहजपणे आपण फसलो कसे , याबद्दल त्याला स्वतःचा संताप आला .
मांगवाड्यात पाटलाचे पाय जमिनीला लागले , तेव्हा त्यानं डोळे फाडून सर्वत्र पाहिलं , फकिरा त्याच्यापुढं उभा होता . पिरा , सावळा , बळी त्या तलवारी , कु – हाडी , ती प्रचंड माणसं नि त्यांची ती अफाट करणी – हे सर्व पाहून पाटील भयभीत झाला . त्यानं खाली पाहिलं , तो त्याचा पराक्रमी मामा आडवा पडला होता . त्याला बांधून टाकला होता .
” शाबास ! ‘ ‘ फकिरा म्हणाला , ” माझ्या मर्दानूं ! आता मला कवा बी मरान येऊ दे . मी तयार हाय ! ह्ये दोघं मागं हायलं असतं नि मी मेलो असतो , तर होनी आमचं बी ठिवलं नसतं !
” ” फकिरा , आमास्नी गुमान सोड- ” पाटील बिथरून म्हणाला आणि खंडूनं एक लाथ हाणून त्याला क्षणात खाली पाडला .
‘ आता पाटीलकी इसर ! खंडू ओरडला .
” फकिरानं पाटलाला उचलून उभा केला नि उंबऱ्यापर्यंत ओढीत नेला आणि वैतागून तो म्हणाला ,
” ह्यो दारकोंड का केलास ? त्वा माझ्याशी इनाकारन वैर का बांधलंस ? माझी गरीब जमात नेल्याच्या माळाला डांबलीस . हे सारं त्वा का केलंस ? बोल ? “
” आता ह्यो बोलनार न्हाय . ह्येला घिऊन चला ! ‘ ‘ साधू म्हणाला आणि त्यांना घेऊन ते सर्व डोंगराची वाट चालू लागले.
‘ आमची मानसं बांधून घातलीस ! ‘ ‘ सावळा खोताच्या कानाजवळ। …
क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)
