फकिरा..
शरीरात शिथिलता निर्माण झाली . कुणी बसल्या जागी पाय लांबवले . काही देह आडवे झाले . शांत , अगदी शांत वातावरण निर्माण झालं . इतक्यात एक खणखणीत आरोळी घुमत उठली :
” ऐका , हो , वाटेगावकर मंडळी ऽऽऽ ” तो बाजीबाचा आवाज सर्वांनी ओळखला . विष्णुपंतानं उलट आरोळी दिली ,
… काय म्हणणं आहे ?
” सर्व लोक खडबडून उठले . हत्यारं सज्ज झाली .
” आमचं म्हणणं असं , की तुम्ही गुमान परत जा .
” ” ते काय म्हणून ? आमच्या हद्दीत शिरून आमचा माणूस तुम्ही मारला आहे !
” ” याला पुरावा काय ? ‘ असं म्हणत बाजीबा पुढे पुढे येऊ लागला .
त्याबरोबर एल्गार झाला .
” खबरदार – पुढं येऊ नका ! ” भैरू खेकसला .
” न्हाय येत ; परंतु आम्ही तुमच्या हद्दीत शिरलो , असं कोण म्हणतं ?
” बाजीबानं प्रश्न केला .
” हातच्या काकणाला आरसा कशाला ? ” शंकरराव पाटील खेकसला आणि बाजीबा म्हणाला , ” मग सकाळ चौकशी करू . जर तुमचं म्हणणं खरं ठरलं , तर शिर परत करू . ठरलं ?
” ” ठरलंऽ ठरल ऽऽ ठरलं ऽऽ ‘ ‘ सर्वांचा एकच आवाज उठला .
सकाळ उजाडली . दोन्हीकडचे पाच पंच नेमले गेले आणि चौकशीला सुरुवात झाली . बाजीबा , विष्णुपंत , शंकरराव ही मंडळी पुन्हा वाटेगावला गेली . त्यांनी प्रेतं पडलेली जागा पाहिली . आसपासची जागा पाहूनच राणोजी आपल्या हद्दीत दरवर गेला होता . पण बापू खोतानं आगळीक करून पुढे जाऊन त्याचं शिर मारून रिवाज मोडला , असं सर्वांचं मत झालं . वाटेगावचा विजय झाला ,
बाजीबानं परत शिगावला जाऊन राणोजीचं शिर परत केलं . शिर हाती यताच वाटेगावकराना आनंद झाला . त्यांनी परत जाऊन राणोजीच्या प्रेताला अग्नी दिला . त्याच्या शेजारीच घोड्यालाही माती दिली . तो वाटेगावचा प्रचंड विजय होता . दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांनी गाव एका वेगळ्याच भावनेनं धुंद झाला . कधी नव्हतं , ते आता गावात घडणार होतं . आजपासून बरोबर बारा महिन्यांनी गावात जत्रा भरणार होती आणि चंद्र – सूर्य असेपर्यंत भरणार होती . एका राणोजीच्या आत्मसमर्पणानं गावात एक जुना रिवाज , नवा नियम सुरू होणार होता . म्हणून सर्व लोक राणोजीचं कौतुक करीत नि हळहळत . ते राणोजीचे गुण गात आनंदात नाचत होते आणि रडतही होते .
मांगवाड्यात मनं भुईसपाट झाली होती . दौलती , राहीबाई , राधा , फकिरा , साधू यांच्या डोळ्यांपुढं अंधार झाला होता . आकाश त्यांच्या डोकीवर कोसळलं होतं . त्यांची भावकी आक्रोश करीत होती , कारण त्यांचा आघाडीचा मोहरा पडला होता . दौलतीचं जहाज फुटलं होतं . आता तो उरलेल्या आयुष्यात नुसता भरकटत राहणार होता किंवा बुडून मरणार होता .
गावकऱ्यांनी मांगवाड्यात येऊन दौलतीसह सर्वांना धीर दिला ; चार दमाच्या गोष्टी सांगितल्या . ‘ सर्व मिळून आता राणोजीच्या दोन पोरांना जगवू या , जपू या ; त्यानं वाटेगावावर अनंत उपकार केले आहेत , त्याची फेड करू या . गाव मांगांना अंतर देणार नाही !
‘ तिसऱ्या दिवशी स्वतः विष्णुपंत मांगवाड्यात आले . शिंदेशाही जोडा , धोतराचा पायघोळ , डोकीला जरीचा रुमाल , करारी पण देखणा चेहरा , पाणीदार डोळे , टोकदार नाक , दाट भुवया , पल्लेदार काळ्या मिश्या , असा तो कुलकर्णी पूर्वी कधीच मांगवाड्यात आला नव्हता . इंग्रज अधिकारी ज्याला खडी ताजीम देत , तो राजासारखा माणूस आलेला पाहून सर्व मांग दौलतीच्या दारात जमले . दौलतीनं पळत जाऊन पटकर आणून पसरलं .
“ धनी , का तसदी घेतली ?
” ” शिर देण्याइतकी ही तसदी नाही , दौलूनाना . ” हे पंतांचे शब्द ऐकून दौलती लहान मुलासारखा डोळे पुसू लागला . त्याला पाहून पंतांचं ऊर भरून आलं .
” नाना , रडायचं नाही . हा राणोजी जिवंत आहे , असं समजून चला .
” ” ह्या पटकरावर त्यो बसत व्हता .
” ” मी त्यावर बसतो- ‘ ‘ पंत त्या पटकुरावर बसत म्हणाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला . ” त्याची दोन पोरं जगलीच पाहिजेत ” पंत निर्धारवाणीनं म्हणाले .
पंतांचे ते आपुलकीचे शब्द ऐकून आणि त्यांच्या डोळ्यांचं पाणी पाहून दौलतीला धीर आला . त्याचे आसू आटले . आनंद अश्रूत ते गडप झाले .
शंकरराव पाटीलही येऊन दौलतीला पंतांप्रमाणेच सांगून गेले . मग मात्र त्याचं काळीज फुगलं .
राधाचं कपाळ फटफटीत झालं . केवळ फकिरा , साधूकरिताच जगायचं , असं म्हणून ती जिवंत राहिली . राहीबाई या वयात एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूचा आघात कशी सहन करू शकली , याचं गावाला कोडं पडलं . तिला एकाच भावनेनं जीवदान दिलं – आणि ती म्हणजे सूड !
फकिरा मात्र उदास झाला . आपला बाप आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला . ‘ मारू दे मुंडकं . ये वाटी हिस्कून ! ‘ हे बापानं ऐकलं , असं त्याला वाटत होतं . आता बाप दिसणार नाही , खाऊ आणणार नाही , मांडीवर घेणार नाही ! आणि तो आपला गबऱ्या खेकळणार नाही !
फकिरा गबऱ्याचं दावं घेऊन आसवं ढाळीत होता . साधू मात्र राधाला सारखा रडवित होता.तो बापाला विसरला नव्हता.
राणोजी ! त्यानं एकट्यानं शिगाव लोळवला नि जोगणी पळवून नेली .
ज्यांनी प्रत्यक्ष राणोजीची ती तडफ पाहिली होती , ते सर्व आपापल्या गावी राणोजीचे पोवाडे गाऊ लागले . त्या खोऱ्यात वाटेगावच्या मांगांचा मोठा बोलबाला झाला . हे जोगणी प्रकरण भलतंच गाजलं .
पावसानं आखडलेले पाय पसरले . आकाशातून मुसळधार पाऊस वर्जू लागला . विजेचा लखलखाट नि मेघांचा गडगडाट यानं सृष्टी हादरली . बियांचे कण मातीत रुजले आणि लहान अंकुर वर आले . हळूहळू काळी वावरं हिरव्या शालीत गेली . एक न्यारी सृष्टी अवतरली . नवा सुगंध दरवळू लागला . एक नवी ऊब दुनियेला आली . माणसांच्या आशा नजरेच्या आटोक्यात आल्या . पाऊस गेला आणि सुगी आली . पावसाच्या तडाख्यातून मुक्त झालेलं ऊन नवं नवं भासू लागलं . दमट जमीन उसासे घेऊ लागली , आकाश निरभ्र झालं . निळ्या आसमानात चपळ पाखरं भिरणीस लागली . शिवारात सुगीची हातघाई सुरू झाली . दौलती रानात फिरू लागला . काढणी , मोडणी , खळी धुंडाळू लागला . त्याला पाहून राणोजीची आठवण होऊन गावकरी त्याच्यापुढे कणसांची रास लोटू लागले . गावानं हात सैल सोडल्यानं दौलतीचं घर भरू लागलं . राही दोन शेळ्या घेऊन निवडुंगात फिरू लागली . फकिरा , साधू यांना दूध मिळावं , म्हणून ती खटपट करीत होती . ती पोरंही आजीला मदत करीत होती . दौलती पंढरीला जाऊन आला . गबऱ्यासाठी फकिरा रडतो , म्हणून येताना एक पांढरं शुभ्र शिंगरू आणलं होतं . त्याला फकिरा एक एक मूठ गवत आणून घालीत होता . नवा गबऱ्या अजून खेकाळत नव्हता . पोरांनी त्या नव्या शिंगराचं नावही गबऱ्याच ठेवलं .
राधा आयाबायांतून लोकांच्या मोडणीला जात होती . दिवसभर कामात गुंतल्यानं तिला उरातील कळीचा विसर पडत होता , म्हणून ती सारखं काही ना काही काम करीत होती . कुंकवाशिवाय सारं आयुष्य कंठण्याची भयंकर जबाबदारी तिच्या शिरावर पडली होती .
रोजच्याप्रमाणं ती रानात निघाली होती . बरोबरीच्या बाया पुढे गेल्या होत्या . पोरं राहीबरोबर माळाला गेली होती . दौलती शिवारात गेला होता आणि राधा डोक्यावर पाटी घेऊन चौघुल्याच्या शेताकडे लगबगीनं निघाली होती . मागंपुढं कोण नव्हतं . आता ती दोन पोरं आणि स्वतःचा देह याची काळजी घेत होती . कारण अजून तिच्या देहातली तरुणपणाची ताण नमली नव्हती .
पुढं एक गाडी आली . ती कोणाची असेल बरं , असा एक विचार तिच्या डोकीत येऊन गेला . गाडी ओढ्यातून वर येऊन गाडीमार्गानं गावाकडे येऊ लागली . धुंद बैल डुलत येत होते . राधा बाजूनं चपापून पुढं जात होती . गाडी जवळ आली . आणि तीचमकली . – गाडी पाटलाची . एकदम कासरं ओढून पाटील म्हणाला , “ राधा , कुठं ? ”
” मोडणीला .”
क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)
