मातृत्वाचे हृदय:स्नेहांकुर.

नगरमधील चित्रा टाकीचा परिसर म्हणजे कधीकाळचा रेडझोन. या परिसरातील रस्त्यावर वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुली, महिला सातत्याने असायच्या. हाच गिरीश कुलकर्णी यांचा कॉलेजला जाण्याचा रस्ता. या महिला – मुली वेश्या व्यवसाय का करतात ? हा प्रश्न गिरीष यांना सतावयाचा. या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचे गिरीष यांनी ठरविलं. पिडीत महिलांच्या भवितव्याचा अभ्यास गिरीष यांनी केला. या अभ्यासातून महिला व मुली आणि त्यांच्या मुलांसाठी संस्कार केंद्र सुरू केलं. अशा भवदिव्य स्नेहालयाचे बीज १९८९ ला अंकुरले. दिवसेंदिवस स्नेहालयाच्या कामात आणखी भर पडली. चाईल्ड लाईनच्या माध्यमातून कुमारी माता व बेवारस बालकाचे संगोपन पुनर्वसन करण्याच्या कायाहून मातृत्वाचा हृदयस्पर्श स्नेहाकुंरचा अरुणोदय झाला. स्नेहाकुंरच्या घरट्यातून ५५० बेवारस बालके विश्व पाहात आहेत. ४०० कुमारी मातांना जीवन जगण्याचा अधिकार मिळाला आहे.

सारडा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करीत असताना डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी आरामातील जीवनाला रामराम केला. स्नेहालयाचे बीज रोवले. वेश्या, मुली, महिला अन त्यांच्या मुलांचे आरोग्य आणि संस्कार संगोपन यावर काम सुरू केले. सुरुवातीला लोकांनी टिंगल केली पण हा ध्येयवेडा माणूस थांबला नाही. टीकेतून सामाजिक क्षेत्रात काम हिमंत मिळाली. या ध्येयवेड्या माणसाच्या हातात हात घालून कामाची करण्यासाठी अनेकजण पुढे आले अन पाहतापाहता स्नेहालयाचा वटवृक्ष उभा झाला.

सध्या स्नेहालायाच्या छत्राखाली विविध विषयावर बेळगाव, पुणे, जुन्नर, श्रीरामपूर, संगमनेर, श्रीगोंदा, पाथर्डी या ठिकाणी २२ प्रकल्पाचे काम चालू आहे. वेदनांच्या कुंडात २७५ जण निस्वार्थ पणे आपले योगदान देत आहेत. अनेक परदेशी पाहुण्यांचे हात स्नेहालयाच्या कामात लागत आहेत. ज्या वेश्या महिलांसाठी काम केले त्या पिडीत महिलांनी स्वतःचे बाजूला ठेवून अनेक नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीचा हात दिला. आपली एक दिवसाची कमाई लातुरचा भुकंप, जम्मू काश्मीर, केरळ आणि चेन्नई मधील आपत्तीग्रस्तांच्या मदत म्हणून काम करण्याचा आदर्श पिडित महिलांनी समाजासमोर घालून दिला.

डॉ. गिरीष कुलकर्णी यांच्या सामाजिक जाणिवेच्या लढ्याला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, अभिनेता अमीर खान यांनी पाठबळ दिले. भारत जोडोच्या अभियानाच्या माध्यमातून आपत्तीग्रस्त काश्मीरी मुलांचे शिक्षण, संगोपन, एच. आय. व्ही. मुले, माता, शोषित वंचितासाठी काम सुरु आहे. या मुलांसाठी सेंद्रीय शेती, पैठणी विणकाम प्रकल्प सुरु करण्यात आले आहे. नगर शहरातील झोपडपट्टी मधील मुलामुलींसाठी इंग्लिश मेडीयम स्कुल व हॉस्पीटलमध्ये सेवेचा जागर सुरू आहे.

समाजसेवेचा वसा सुरु असतानाच डॉ. गिरीश कुलकर्णी यांचे डॉ. प्राजक्ता यांच्याशी विचार, आचार जुळले. दोघांनी सहजीवनाची रेशीमगाठ बांधली. डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी बेवारस नवजात बालके कुमारी माता पुनर्वसनकडे लक्ष घातले आणि स्नेहाकुंरचा एक स्वतंत्र प्रकल्प सुरू झाला. कुमारी माता, बलात्कारित – स्त्रिया यातूनच अनौरस बालकांचा जन्म होतो. जन्मताच ज्यांना अडगळीचे ठिकाण, मुतारी, कचराकुंडी, अशा ठिकाणी सोडून दिले जाते, या जीवांना मायेचा स्पर्श आणि माणुसकीची आईची ऊब स्नेहांकुर मधून मिळत आहे. या प्रकल्पात बालकांचे स्नेहांकुर प्रकल्पामध्ये संगोपन केले जाते. कायदेशीर दत्तकविधान प्रक्रीयेद्वारे त्यांचे चांगल्या व योग्य कुटुंबामध्ये पुनर्वसन केले जाते.

कुमारी माता, अत्याचारीत स्त्रिया मुली यांचे समुपदेश, कायदेशीर मदत आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी देखील स्नेहांकुर प्रयत्न करीत आहे. मागील दहा वर्षात स्नेहांकुर प्रकल्पामार्फत ५५० पेक्षा जास्त बालकांचे दत्तक विधान आणि ४०० पेक्षा जास्त कुमारीमाता आणि बलात्कारित सियांना मदतीचा हात देण्याचे महान कार्य झाले आहे. विविध प्रकारे जनजागृती अभियान आणि डॉक्टरांच्या भेटीद्वारे दत्तक विधान आणि परित्याग प्रक्रियेची माहिती महाराष्ट्राच्या कानाकोप यात पोहचवली आहे. यामुळे बेवारसपणे अनौरस बालकांना सोडून देण्याचे प्रमाण घटले आहे. ही सर्व कामे करत असताना कार्यकर्त्यांसमोर अनेकदा सामाजिक दांभिकता आणि कायदेशीर प्रक्रिया असे पेचप्रसंग निर्माण होतात, यातून सजगतेने मार्ग काढावा लागतो. अनेकदा कार्यकर्त्यांना धोका पत्करावा लागतो, त्यांच्या जीवावर बेतण्या इतपत प्रसंग ओढवतो. पण त्यावर हे कार्यकर्ते मात करतात. माणूस म्हणून जगताना माणुसकीच्या जाणीवा प्रगल्भ होणे ही काळाची गरज आहे.

शब्दांकन: अनिल गावडे, प्रशासकीय अधिकारी, स्नेहालय

बेवारस नवजात बालकांचे संगोपन आणि कुमारी मातांना जीवन जगण्याच्या लढाईत मदत करण्यासाठी प्राजक्ता कुलकर्णी व त्यांची टिम काम करत आहे. त्यासाठी मदतीला हजारो हात पुढे आले आहेत. स्नेहांकुरमध्ये उमलेल्या फुलांना वंशवृद्धी असलेल्या आई – वडीलांचा परीसस्पर्श होतो. त्या फूलांचे सोने होते यापेक्षा जगात मोठा आनंद कशातून मिळेल .

डॉ.गिरीश कुलकर्णी, संस्थापक स्नेहालय नगर

(स्रोत:अग्नीपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading