फकिरा..
स्वयंपाकात दंग झाली . एवढ्यात दौलती आला . चूळ भरून त्यानं पाय सरळ केले आणि विचारलं , ” फकिरा कुठंय ?
” पण फकिरा आला नाही . मग घावऱ्या स्वरात दौलती म्हणाला , ” आगं , प्वार कुठ दिसंना की .
” हे ऐकून राधाच्या उरात धस्स झालं . तिनं दारात येऊन चौफेर पाहत हाक मारली : ” फकि ऽऽ राऽऽहऽऽ “
ती दीर्घ हाक दूर दूर गेली आणि शांत झाली ; पण उत्तर आलं नाही . मग तिच्या हृदयात कालवाकालव झाली . तिनं चटकन पश्चिमेकडं पाहिलं . सूर्य निम्माच उरला होता . आता अंधार पडणार , मग मी फकिराला कुठं शोधू , या विचारात ती वेडी झाली . हुंदका कंठात येऊन टकरा घेऊ लागली .
दौलती, राही निवडुंगात धावपळ करू लागली. आळीतील माणसं गोळा झाली . काही दिसेल त्या वाटेनं पळत सुटली . बळी , मुरा , इशा , किशा हे फकिराचे जोडीदार सैरावैरा झाले . निवडुंगाचे डवंगे धुंडाळू लागले. राधा मेख रोवल्याप्रमाणे दारात उभी राहिली. साधू रडू लागला . सावल्यांची चित्रं अंधार पुसू लागली. सर्वाचं धाबं दणाणलं .
” हाय ! आरं , बघा दिसतोय का न्हाय ? आंधार पडायच्या आत बघा . ” बहिरू मांग ओरडला , ‘ ‘ म्होरं व्हा नि ती हीर बघा . ” विहिरीचं नाव ऐकताच राधानं हंबरडा फोडला.
तिला ती कल्पनाच विषारी वाटली आणि बळी एकदम चरकला , ” आगा , हाय ! ” ‘
‘ कुठं हाय ? “
” हे बघा.चिंचंच्या शेंड्याला जाऊन बसलाय.
” मग एकदम ओरड झाली : ” हाय . या , या..
” सर्व लोक चिंचेखाली जमून वर पाहू लागले . फकिरा पार शेंड्याला जाऊन खुशाल बसून खालचा तो सर्व प्रकार पाहत होता आणि एका पायाला झोके देत होता. राधा रडत वर पाहू लागली. दौलती नरमाईच्या स्वरात म्हणाला,
” आरं, चोरा ! मारलं व्हतंस आमास्नी.
” फकिरानं खाली पाहिलंही नाही. मग राहीबाई म्हणाली,
” ये खाली – रात व्हतीया.
” सर्वच लोक आग्रह करू लागले, ” फकिरा , खाली ये. अंधार होतोय.
” पण फकिरा हूं की चूंन करता तसाच बसून होता . मग बहिरू म्हणाला,
‘ ‘ पोरांनू , व्हारं वर , नि आना त्येला खाली.
” हे ऐकून तो एकदम ओरडला,
” वर येऊ नका , न्हाय तर मी उडी मारीन !
” फकिराच्या या दरडावणीनं सर्वांची पाचावर धारण बसली . त्यांच्या तोंडचंपाणी पळालं . राधानं डोकीवरचा पदर ओढून तो त्या वाटेवर पसरला “
मी पदर पसरत्ये – पाया पडते – तू खाली ये .
” दौलतीनं गुडघे टेकून म्हटलं,
” उडी टाकू नगं , फकिरा – बाब्या , ये – ये. “
राहीबाईच्या हातापायांना कापरं भरलं . मग तो शांतपणे खाली आला आणि राधानं त्याच्यावर झेप घेतली . त्याला पोटाशी धरून ती रडू लागली . सर्वांचा जीव सुळावरून उतरला आणि कडूसं पडलं .
बहिरू म्हणाला ,
” त्येला काई म्हनू नका .
तरीही दौलती म्हणाला ,
” फकिरा , असं का ? आमास्नी मारू नकं .
” ” आई , मला वाईट म्हनतीया . ” फकिरा फुसफुसला.
” ती खुळी हाय . आता तुला वाईट म्हनल , त्येचं डोस्कंच फोडतो . मातर तू डोस्कं फिरवून घेऊ नकं.
” मग कोणीच काही बोललं नाही . प्रत्येक माणूस मग फकिराशी जपून बोलू लागला . राधाला तर जन्माची अद्दलच घडली.
हिवाळा आला नि गेला . मग उन्हाळा आला. चैत्राचं चावरं ऊन धगधगू लागलं, ते पोलादाच्या रसाप्रमाणं ओसंडू लागलं. निळ्या तलम वस्त्राचा रंग आकाशाला आला. चैत्रपालवीनं झाडं नटली. नवे मुगारे लुसलुसू लागलं. तारुण्यात विद्रूपताही फिकी पडते, तद्वत झालं, काराट्याबोराट्यांनाही बहर आला. नव्या फण्या येऊन निवडुंगाची मान अधिकच उंचावली. टचटचीत लाल बोंडं डोळ्यात भरू लागली . फण्यांचे काटे सणसणू लागले.
मांगवाड्यात मोठी धडपड सुरू झाली होती. आपापल्या दारात मांगांनी वाख लावून चऱ्हाट वळायचं काम सुरू केलं होतं. मोठी माणसं दारात सावलीला बसून पड सोडीत होती. लहान लहान पोरं चाकं फिरवीत त्या उन्हात डोकीवर चिंध्या घेऊन मागं सरत होती. ती वैतागली होती. तापलेली चक्रं कुईकुई आवाज काढीत होती. वाखाच्या बट्या आणि बुरकूल सर्वत्र उडत होता.
काही आंगचुकार पोरं निवडुंगात दडून आईबापांना गुंगारा देऊ पाहत होती. ती मुंगसाप्रमाणे त्या निवडुंगात शिरून दडत होती. दौलतीच्या चिंचेखाली फकिरा आणि साधू यांनी विटीदांडूचा खेळ मांडला होता . कुरघोडीच्या खेळाला राधानं मनाई केल्यामुळे सावलीला ते विटी कोलीत होते. दौलती चावडीवर गेला होता.
राहीबाई शेळ्या घेऊन रानात गेली होती. राधाचा बसल्या जागीच डोळा लागला होता.
हळूहळू चोरटी पोरं जमली. इशा , किशा , भिवा , बळी, मुरा आले आणि डाव रंगू लागला . तोच सावळा मांगाचा घम्या आला. त्यानं एक नवा खबर आणली होती. ती त्यानं पोरांत सोडली. सारी पोरं एकत्र आली. आतुर होऊन घम्याभोवती जमली.घम्या मध्ये बसला.
हा घम्या लांबट चेहऱ्याचा, गोरा व उंच होता. त्याचं नाकही लांबट होतं मान लांब होती. त्याची शेंडीही तशीच होती. पण ती सदैव ताठ असे. तो बापासारखाच बिलंदर होता. घमेंडखोर सावळानं आपल्या लाडक्या मुलाचं नाव घमांडी ठेवलं होतं, आसपासच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या प्रथम सावळाकडे येत आणि मग घमांडी त्या आळीत घरोघर पेरी, आजही एक नवी बातमी घेऊन तो आला होता. पोरं जमली आणि घमांडी गंभीरपणे म्हणाला , ” राजेवाडीच्या माळावर, सरकारी बंगल्याजवळ लस्कर आलंया . बघाय चलता का ?
” ए , लस्कर कसलं असतं, र ? ‘ ‘ इशानं विचारलं. आणि घम्या म्हणाला , ” गोऱ्या लोकांचं असतं. दांडगं असतं.
” ” पर त्ये गोरं लोक कसलं असत्यात ? ” मुरानं विचारलं . घम्या बुचकळ्यात पडला .
फकिरा म्हणाला, ” सांग की, गोरंलोक कसलं असत्यात?
” ” त्ये मला ठावं नाय . ” घमांडीनं सांगून टाकलं आणि बळी म्हणाला , ” मग आपुन त्ये लवकर बघू , चल. ‘
” राजेवाडी लांब हायरं. ‘ फकिरा माळानं पूर्वेला पाहत म्हणाला.
” आरं , अवघं तीन मैल . चला की . ” घम्या चेकाळून बोलला आणि सारीच पोरं राजेवाडीला निघाली. फकिरा साधूला म्हणाला , ” साधू , तू येऊ नक . पाय भाजतील . मीच बघून येतो नि तुला सांगतो .
” ” लौकर ये ! ” साधू गंभीरपणे म्हणाला .
” मी लौकर येतो , पण आईला सांगू नकं . ” फकिरानं धोक्याची सूचना केली आणि पोरं गाडीवाटेनं धावत निघाली. ती सात पोरं गावदरीचा ओढा ओलांडून पुढं गेली आणि पळू लागली. आईबापांना आपली आठवण होण्याआधीच लष्कर बघून परत यायचं , असा विचार करून ती पळत होती.
ऊन मी म्हणत होतं. माळाची वाट फोफाट्यानं भरून बिलबिलीत झाली होती.
उन्हांन तो फोफाटा तापाला होता. उष्ण वाऱ्याच्या लाटा माळाच्या कुसळावरून मंद गतीनं येऊन गरम धूळ डोकीवर घेत होत्या. त्या धुळीतून ती पोर पळत होती. घामानं भिजली होती. धुळीचे लोट उडवीत ती राजवाड्याची शिव गाठीत होती.
त्यांनी पहिल्या दमात राजेवाडीचा माळ गाठला आणि समोरच्या सरकारी बंगल्याच्या सभोवती तळ देऊन पडलेल्या गोऱ्या लष्कराला ती पाहू लागली. आतुर नजरा भिरभिरू लागल्या. त्या अफाट माळावर सर्व काही तापलं होतं. वाटेकडेला फक्त एकच बाभळीचं झाड होतं, पण त्यालाही विस्तार नव्हता. पाय होलपटलेली पोरं त्या झाडाजवळ गेली आणि एकदम थबकली. समोरच्या वाटेगावचा चंदू आत्तार आपलं करड्या रंगाचं घोडं दुडक्या चालीवर दामटीत येत होता. त्यानं कल्हई रंगाचा भला मोठा पटका बांधला होता. त्याचं रुंद कपाळ, दाट भुवया, भोऱ्या पिळून आकडे वळलेल्या मिश्या आणि भोरी रुंद दाढी, आखूड गर्दन, मजबूत छाती, वर इंग्रजी जॅकेट अशा अवतारात तो कुणाचंही लक्ष वेधून घेत असे. तो सारखी घोड्याला टाच मारीत होता. त्या माळाची त्याला चीड आली होती. त्याला वाटेगाव जवळ करायचं होतं.
आत्ताराला ओळखून पोरांचे पाय मंदावले. त्यांनी त्याला बाजू देण्यासाठी वाट रिकामी केली; पण जवळ येताच चंदूनं लगाम ओढून घोडं उभं केलं. पोरंही मग उभी राहिली. आत्तारानं एक एक पोर निरखायला सुरुवात केली. डोळे वटारून तो पाहू लागला.
सर्वांच्या पुढं फकिरा होता. त्यानं अंगात गोल पैरण घातली होती. खाली लंगोट नेसला होता. त्याच्या रसरशीत चेहऱ्यावर घाम डबडबला होता. त्याच्या डोकीचे केस विस्कटून डोकीतून पाणी मानेवर झिरपत होतं. त्याचा सावळा रंग, घारे डोळे, सरळ नाक, रुंद कपाळ आणि चेहऱ्यावरचा तरतरीत भाव पाहून चंदूनं बळीकडे नजर वळविली. बळी उंचीनं गिड्डा वाटत होता. त्याचं नाकतोंड देखणं दिसत होतं. त्यानं पैरण घालून खाली लंगोटी लावली होती. जवळच मुरा काखेत हात धरून उभा होता. त्यानं एक खेडं डोकीला गुंडाळलं होतं. त्याच्या अंगातील जुनी पैरण फाटून तिच्या चिंध्या झाल्या होत्या. तो बिचकून उभा होता. त्याच्या मार्ग तो किडकिडीत किशा बुजून उभा होता. त्यानं फक्त लंगोटी लावली होती. त्या लंगोटीचा मागचा उरलेला शेव शेपटीसारखा लोंबत होता. त्यामुळं तो वानरीच्या पिलाप्रमाणे दिसत होता. बहिरू मांगाचा इशा अंगातली पैरण खांद्यावर टाकून घेऊन पळ काढण्याच्या विचारात होता. सावळा मांगाचा घम्या एका पायावर उभा होता: पाय भाजत आहेत, असं भासवण्यासाठी तो तोंड वाकडंतिकडं करीत होता आणि आप्पा मांगाचा भिवा आत्ताराला मनातल्या मनात शिव्या देत होता.
ही सारी पोरं नीट बघून मग आपली मान उंचावून, भुवया उंचावून चंदू म्हणाला. ” ए बिरमुटेकी फौज, किदर भागताय, रं ? दरुडा करनेकू ? बोलो ना. वाचा बैठी क्या, रं ? ” त्यानं घम्याला पुढं बोलावीत विचारलं, ” तू सावळा मांगका ना , रं ? मग लेका नक्कीच दरुडा पडनार , तर.
” कोण काहीच उत्तर देत नव्हता. ते डोळे रोखून आत्ताराची दाढी पाहत असल्यासारखे नुसते पाहत होते. मग त्यानं फकिराला विचारलं , ” तू राणोजीका ना.रं ? “
क्रमशः
स्रोत:(फकिरा या अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतुन)
