कर्मवीर आण्णांचा..परिसस्पर्श..

श्री संत शेख महम्मद महाराज यांच्या पावनभूमीत व श्रीमंत महादजी शिंदे यांच्या ऐतिहासिक कर्मभूमीत श्रीगोंद्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे महादजी शिंदे विद्यालय जून १९५३ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या परिश्रमातून सुरू झाले .

जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय बाबूमिया बँण्डवाले यांना कर्जतमध्ये भाऊराव पाटील आल्याचे समजले. बाबुमिया यांनी स्वत: कर्जत गाठले. सोबत दादा पाटील होते. त्याकाळात शिक्षणाचा प्रचार प्रसार कमी असल्यामुळे शिक्षणाविषयी आस्था असणारी मंडळी खूपच कमी होती. या काळात बाबुमिया यांनी गावातील लोक एकत्र आणले. त्यामध्ये विठ्ठल दादा मोटे पाटील अन काही व्यापारी साथीला आले. आणि आण्णाकडे त्यांनी श्रीगोंदा शहरात एक माध्यमिक विद्यालय सुरु करण्याची मागणी केली. या मागणीचा अण्णांनी विचार करुन १९५३ साली बैठक बोलावून संस्थेची ध्येयधोरणे समजावून सांगितली.

या बैठकीनंतर शहरात जागेचा शोध सुरु झाला. श्रीमंत महादजी शिंदे यांच्या जळक्या वाड्यातील नगरखान्यात शाळा सुरु करण्याचे निश्चित झाले. अखेर १३ जून १९५३ रोजी या नगारखान्यात ८ वीचा वर्ग सुरु झाला. या शाळेच्या रुपाने श्रीगोंदा तालुक्यात पहिले महाविद्यालय सुरु झाले. पहिल्या वर्षी आठवीच्या वर्गात तब्बल ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

या शिक्षणाच्या चळवळीदरम्यान कर्मवीर अण्णांनी श्रीमंत शिंदे यांची भेट घेतली. श्रीमंत महादजी शिंदे यांचा सात तळाचा वाडा, १३२ खणांचा वाडा, जळका वाडा आणि सिदनकर वाडा असे एकूण चार वाडे व सुमारे ८०० एकर जमीन रयत शिक्षण संस्थेला दान दिली. त्यावेळी जागेचे बक्षीसपत्र करण्यास अण्णांकडे पैसैही नव्हते. याशिवाय अनेक अडचणी आल्या. मात्र या अडचणींवर मात करत बक्षीसपत्र करण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यातील एक उत्कृष्ट ज्युनिअर कॉलेज म्हणून या संस्थेचा नावलौकीक वाढला. संस्थेच्या धोरणाप्रमाणे या विद्यालयातून केवळ मुलींकरीता स्वतंत्र शाळा सुरु करण्यात आली. श्रीगोंदा शहरात १९९० – ९१ साली मुलींची पहिली शाळा उभी राहिली. या नंतरच्या काळामध्ये अनेक शाळा सुरु झाल्या. या स्पर्धेच्या काळात शाळा कुठेही कमी पडली नाही. इंग्रजीचे वारे वाहू लागल्याने शाळेने समी इंग्रजीचे वर्ग सुरु केले. सेमीचे वर्ग सुरु करण्यात आल्यानंतर शाळेच्या प्रगतीचा आलेख वेगाने उंचावला. विद्याथीर्संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शैक्षणिकदृष्ट्या वाडा जरी चांगला असला तरी जुना झाला होता. त्यामुळे शाळेसाठी नवीन इमारतीचे काम सुरु करण्यात आले. सर्वांच्या सहकायार्ने दोनच वर्षामध्ये शाळेची दीड कोटी रुपयांची तीन मजली थाटात उभी राहिली. १३ जून २००९ सालापासून शाळेत गुरुकुल प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली. सेमी इंग्रजी आणि गुरुकुल प्रकल्पामुळे शाळेच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली. त्यामुळे दहावी आणि बारावीची निकाल कौतुकास्पद लागत आहेत.

उत्तुंग असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शाळेने वर्तमानातही विद्यार्थी हिताच्या अनेक योजना राबविल्या. स्पर्धा परिक्षा व शिष्यवृत्ती परिक्षेत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी वेळोवळी यश मिळविले आहे. गतवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी तब्बल २५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळविली. खेळातही विद्यार्थी सातत्याने अग्रेसर असतात. राज्य पातळीवरील बुध्दिबळ स्पर्धेत क्षितीज अविनाश मोरे याने यश मिळविले. वेटलिफ्टिंगमध्ये गणेश दिगंबर बायकर याने राज्यपातळीवर विद्यालयाचा दबदबा निर्माण केला. व्हॉलीबॉल विभागात ओंकार अशोक आळेकर याने छाप पाडली.

भविष्याचा वेध घेण्यासाठी माजी विद्यार्थी संघाची स्थापना शाळेत करण्यात आली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आयुक्त भाऊसाहेब दांगडे, सिंचन अधीक्षक हेमंत धुमाळ, निवडणूक निर्णय अधिकारी अरुण आनंदकर, कृषी आयुक्त सप्रे, उपनिबंधक सोपान शिंदे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, जितेंद्र इंगळे, डॉ.संतोष शिंदे, डॉ. शिल्पा पटारे, डॉ. उत्तम वडवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी संघ काम करीत आहे.
शब्दांकन: गणेश कवीटकर, प्रतिनिधी, सी न्युज

महादजी शिंदे विद्यालय तालुक्यातील सर्वात जुने विद्यालय आहे. तालुक्यातील शैक्षणिक दृष्ट्या विकसित असणारे तालुक्यातील एकमेव विद्यालय आहे. विद्यालयाला नावलौकिक वाढवण्यामध्ये, शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती , माजी विद्यार्थी संघ यांचा मोठा वाटा आहे. भविष्यात विद्यार्थीहिताचे प्रकल्प राबविण्यात नक्कीच प्राधान्य राहिल.
तुकाराम कन्हेरकर, प्राचार्य

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading