कोथिंबीरे मळ्यातील बहुंताशी समाज शेतमजुरी, वीटभट्टी व बांधकाम काम करतो. हातावर पोट भरणारा हा समाज दिवस उगवला की कामावर जाणारा. पूर्वी शिक्षणाचा कसलाही गंध या मळ्याला नव्हता. मात्र आपल्या मुलांनी शिकावे, मोठे व्हावे हा आशावाद प्रत्येकामध्ये होता.
अशा वातावरणामध्ये १९४६ साली चिंचेच्या झाडाजवळ एका छपरात शाळा भरू लागली. पावसाळ्यात हे छप्पर गळायचे. ही परिस्थिती पाहून मळ्यातील बाबुराव आबाजी कोथिंबीरे यांनी १५ रुपये महिन्याने दोन खोल्या शाळेसाठी भाड्याने दिल्या. त्यावेळी विठ्ठल घोडके शाळेचे मुख्याध्यापक होते. मळ्यातील या शाळेत जवळपास ४० विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाळेला हक्काचे वर्ग नसल्यामुळे पट टिकविणे हे शिक्षकांसमोर आव्हान होते. १९८५ साली मुख्याध्यापक पांडुरंग शिंदे यांच्या प्रयत्नामुळे शाळेला महाराष्ट्र शासनाची जागा मिळाली. याच जागेवर दोन वर्गखोल्याचे बांधकाम करण्यात आले. २००० पर्यत शाळेचा पट ६० च्या पुढे होता. याच काळात इंग्रजीचे वारे वाहू लागले. जवळपास इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सुळसुळाट झाला आणि आपोआपच मळ्यातील या शाळेचा पट कमी होऊ लागला. शाळेला रंग नाही, कंपाऊंड नाही , झाडे नाहीत अशी शाळेची अवस्था असल्याने विद्यार्थ्यांचेही मन शाळेत रमत नव्हते. अशा वातावरणात मुख्याध्यापिका मनिषा गायकवाड व सहकारी शिक्षक प्रशांत बोरुडे २०१३ मध्ये या शाळेवर हजर झाले. कष्टाळू व झोकून देऊन काम करण्याच्या वृत्ती दोघांमध्ये असल्याने शाळेच्या विकासाकडे त्यांनी लक्ष दिले. मळ्यातील लोकांनाही शाळेबद्दल आपुलकी वाटू लागली. प्रांत बोबडे यांनी घरोघरी भेटी देऊन लोकसहभागाचे महत्व पटवून दिले. लोकांनाही शिक्षकांचे महत्व पटले. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लावली. वेळेचे महत्व पटवून सांगितले. आणि मग लोकसहभागातून मळ्यातील शाळेचे कपडे बदलू लागले.
सांस्कृतिक कार्यक्रमाचा कोणताही वारसा नसताना २०१५-१६ मध्ये पहिल्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे शाळेत आयोजन करण्यात आले. या पहिल्या कार्यक्रमाला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून पालकांनी तब्बल १ लाख रुपयांचा निधी शाळेला दिला. या निधीतून शाळेच्या भौतिक सुविधांची उणीव भरून काढता आली. प्रथमच शाळेला कंपाऊड व गेट बांधण्यात आले. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून विंधनविहीर घेण्यात आली. शाळेभोवती वातावरण प्रसन्न राहावे म्हणून वृक्षारोपण करण्यात आले. वर्गखोल्यांचे रंगकाम करण्यात आले. लोकसहभागातून दोन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले. लोकांनी श्रमदानातून ऑफिसची उभारणी केली. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी उपकरणे आणण्यात आली. वातावरण प्रसन्न झाल्याने मुले हसतखेळत शिकू लागली. कल्पक विकासासाठी शाळेमध्ये गांडूळखताचा प्रकल्प राबविण्यात आला. सेंद्रियशेतीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
श्रीगोंदा शहराच्या नगराध्यक्षा छायाताई गोरे यांनी ई लर्निगसाठी एलईडी संच दिले. मुख्याध्यापिका मनिषा गायकवाड व प्रशांत बोरुडे यांनी शाळेला संगणक संच भेट दिला. या माध्यमातून मळ्यातील शाळा डिजिटल बनली. प्रभागाचे नगरसेवक नाना कोथिंबीरे, राजू गोरे, सुरेश भंडारी आणि शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांचा शाळेचा प्रगतीमध्ये मोलाचा वाटा राहिला आहे. याशिवाय शाळेच्या विकासासाठी प्रशासकिय अधिकारी पाठीशी उभे राहिले. केंद्रप्रमुख गजानन ढवळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करुन प्रोत्साहन दिले. विस्तार अधिकारी सुरेश ढवळे, निळकंठ बोरुडे, गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
२०१८ मध्ये प्रशासनाने प्रशासकिय बदल्या झाल्या. त्यामध्ये मुख्याध्यापिका गायकवाड व सहशिक्षक बोरुडे यांना बदलून जावे लागले. त्यांच्या जागी मुख्याध्यापिका सुनिता लोखंडे व सहशिक्षिका सुनिता बोरुडे रूजू झाल्या. नवीन आलेल्या शिक्षकांनी सुध्दा विकासाचा आलेख पुढे सुरुच ठेवला आहे.
- शब्दांकन: अंकुश शिंदे, प्रतिनिधी, दिव्य मराठी नीराज शिंदे, प्रतिनिधी , श्रीगोंदा वार्ता
शाळेचा सुरु असलेला विकासाचा आलेख आणखी पुढे न्यायचा आहे. शाळेत वनऔषधी उद्यान, प्रथमोचार कक्ष, स्वतंत्र संगणक कक्ष, प्रयोगशाळा कक्ष, व्यासपीठ असे विविध उपक्रम राबवायचे आहेत. हे करण्यासाठी पालकांची साथ आम्हाला प्रेरणा देत आहेत.
सुनिता लोखंडे,मुख्याध्यापिका
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
