दिनांक ६ ऑगस्ट, श्रीगोंदा:
नगरपालिका कार्यक्षेत्रात असलेले मखरे वाडीतील नागरिक वेगळ्याच समस्येने हैराण झाले आहेत. रस्त्यालगत असलेल्या वाडीतील लोकांच्या अन्नपाण्यात जाणाऱ्या धुळीने त्यांचे रोजचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यात पडलेले खड्डे आणि होणारी वाहतूक यातून उडणाऱ्या धुळीने सर्वसामान्यांचे जीवन मात्र प्रभावित झाले आहे. या अडचणीमुळे स्थानिक नागरिकांनी रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर घेत, आज सकाळी प्रतीकात्मक आंदोलन केले. श्रीगोंदा नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी रस्त्यात पडलेल्या खड्यांमध्ये झाडं लावत आंदोलन केले.

मखरे वाडीतील रस्त्याची दुरवस्था..! प्रशासनाचे दुर्लक्ष..! रस्त्यातील खड्यात झाडं लावून, स्थानिकांची रस्ता दुरुस्तीची मागणी..!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरालगत पारगाव रोडवर असलेल्या मखरेवाडी या नगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने खड्डेमय रस्त्यातून उडणाऱ्या धुळीचा परिसरातील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक वेळा स्थानिक प्रशासनाला कळवूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने, मखरेवाडी ग्रामस्थांनी एकत्रित येत महिलांच्या माध्यमांतून रस्त्यात पडलेल्या खड्यांत वृक्षारोपण केले आहे.

याविषयी सामाजिक कार्यकर्ते बिभीषण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून श्रीगोंदा पारगाव रोड वरील मखरेवाडी परिसरातील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. येथे दररोज स्थानिक ग्रामस्थांना धूळ व वायू प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. खड्यांमुळे वाहनांना येण्या – जाण्यासाठी अडचण निर्माण झाली असून, येथे अपघाती क्षेत्र निर्माण झाले आहे.
ही दैनंदिन परिस्थिती झेलणाऱ्या स्थानिकांनी श्रीगोंदा नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाला वारंवार या रस्ता दुरुस्ती बाबत विनंती केली आहे. मात्र, सदरील रस्ता दुरुस्तीविषयी स्थानिक प्रशासन उदासीन असल्याचे दिसत आहे. यामुळे आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी स्थानिक ग्रामस्थ व महिला यांनी गांधीगिरी करत, रस्त्यातील खड्यात झाडं लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खड्यांमध्ये प्रतिकात्मक झाडं लावून, प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

वारंवार सदरील रस्ता विकास कामांपासून दुर्लक्षित राहत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेकदा श्रीगोंदा नगरपालिकेने आश्वासन देऊनही कामं होत नसल्याने तसेच, या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत प्रशासकीय मान्यता होऊनही काम पूर्ण होऊ शकले नसल्याने मखरेवाडीतील ग्रामस्थ हे फक्त निवडणूकीपूर्ते असल्याचा अनेकांचा समज झाला आहे.
या आंदोलनात बिभीशन जाधव, भाऊसाहेब मखरे, राजू मखरे, भाऊसाहेब जाधव, पांडू शेठ झुंजरुक, रावसाहेब जाधव, पांडुरंग वाळके, सौ. जाधव ताई, सौ. तवले ताई, सौ. झुंजरूक ताई सह स्थानिक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. Food and water are not allowed on the road ..! Situation of Makhrewadi in Shrigonda ..
याबाबत श्रीगोंदा नगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत येणाऱ्या या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास संविधानिक आंदोलन करणार असल्याचेही नागरिकांनी माध्यमांना सांगितले आहे.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

