अत्यंत निष्क्रीय व अयशस्वी खासदारला आगामी निवडणुकीत लोकं धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत..: घनःशाम शेलार..

दिनांक १० फेब्रुवारी २०२४,श्रीगोंदा:

खासदार डाॅ. सुजय विखे पाटील हे २३ मे २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. खासदारकीच्या गेल्या चार साडेचार वर्षाच्या कालाखंडात त्यांना श्रीगोंदा तालुक्यातील एमआयडीसी व श्रीगोंदा-नगर तालुक्याला वरदान ठरणा-या साकळाई योजनेची आठवण झालेली नव्हती. मात्र, लोकसभेच्या निवडणुका समोर आल्यानंतर साकळाई उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण व एमआयडीसीला तत्वता मंजुरी अशा फसव्या घोषणा हा विखे पिता पुत्रांचा चुनावी जुमला आहे. ही जनतेच्या डोळ्यात धुळफेक आहे. असा आरोप घनःशाम शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

श्री शेलार यांनी पुढे म्हटले आहे की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल २०१९ ला पार पडली. या निवडणुकीचा निकाल २३ मे २०१९ रोजी जाहीर झाला. त्यात डॉ.सुजय विखे पाटील हे खासदार झाले. त्यावेळी राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकार कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी डाॅ.सुजय विखे यांना खासदार करा मी साकळाई योजनेचे पाणी श्रीगोंदा व नगर तालुक्याला देईल. अशी घोषणा केली होती.

विखे खासदार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सहा महिने राज्याचे मुख्यमंत्री होते. तर, श्री राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यात कॅबिनेट मंत्री होते. खरंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली पाहिजे याची जाण व भान खासदारांना असायला पाहिजे होती आणि त्यांनी त्या प्रश्नांचा प्रामाणिकपणाने पाठपुरावा करायला पाहिजे होता. मात्र, त्या कालखंडामध्ये आपण दिलेल्या कुठल्याही आश्वासनाच्या बाबतीत त्यांनी पाठपुरावा केलाच नाही.

उलट १९९७ साली मी पाठपुरावा करून साकळाई उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण पूर्ण करून त्यावेळी रू.१२८ कोटीची योजना मंजुरीसाठी शासन दरबारी गेली होती. मात्र त्यावेळी या योजनेला जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व काही लोकप्रतिनिधींनी विरोध केला. म्हणून, ती योजना मंजूरी विना पडून राहीली. तिला मंजूरी न देता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काही महिन्यापूर्वी त्यांनी लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करण्यासाठी हेतूपुरस्सर पुन्हा साकळाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाची घोषणा केली. ही घोषणा म्हणजे सरळ सरळ लोकांच्या भावनांशी अत्यंत दुर्दैवी खेळ असून, हा खेळ तालुक्यातील जनतेने ओळखलाय याची प्रचिती त्यांना साखर व दाळ वाटप कार्यक्रमात आली.

त्यामुळे विखे पिता पुत्रांनी डॅमेज कंट्रोल म्हणून नवीन नौटंकी सुरू करून, पुन्हा दिशाभूल आणि धुळफेक करत श्रीगोंदा एमआयडीसीला तत्वता मंजुरी अशा प्रकारची फसवी घोषणा केली आहे. ही त्यांची लोकसभा निवडणुकीसाठीची केविलवाणी धडपड आहे. त्यांना जनतेने दिलेली संधी त्यांनी मातीमोल केली असून, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ते कोणतेही भरीव काम करू शकले नाहीत. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर केलेल्या फसव्या घोषणांना जनता फसणार नसून, अत्यंत निष्क्रीय व अयशस्वी खासदारला आगामी निवडणुकीत लोक धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत असा घणाघात श्री शेलार यांनी केला.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading