श्रीगोंदा नगरपालिकेचा गलथान कारभार,पावसात काम केल्याने रस्त्याच्या दर्जा व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह.

दिनांक ७ जून श्रीगोंदा:

श्रीगोंदा नगरपालिके मार्फत शहरांतर्गत रस्त्यांची कामे चालू आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून चालू असलेली कामांचा निपटारा पावसाळ्याच्या आत करण्याचे निर्देश असताना प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत,स्थानिक प्रशासन आणि सर्व सदस्य मिळून,ठेकेदारांमार्फत अनधिकृतरित्या श्रीगोंदा शहरात भर पावसात रस्त्याचे काम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कामांमूळे रस्त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होणार असून, ही सर्व मिलीभगत असल्याचे खाजगीत बोलले जात आहे.

सविस्तर वृत्त असे की,काल दिनांक ६ जून रोजी सायंकाळी श्रीगोंदा जामखेड रोड वरील चंद्रमा पेट्रोल पंपा शेजारी चालू असलेल्या नियोजित रस्त्याच्या कामामध्ये,काही वेळापूर्वी पाऊस होऊन गेला असतांना व नमूद रस्त्यावरून पाणी वाहत असतानाही, या रस्त्यावर डांबरी सिलकोट करण्याचे काम नमूद ठेकेदाराच्या मार्फत चालू होते.या बाबतीत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवत सामाजिक माध्यमांतून हा घडलेला प्रकार सर्वांसमोर आणून दिला आहे.

वाहत्या पाण्यात,साठलेल्या डबक्यांवर डांबर टाकण्याचे काम चालू होते. अशा पद्धतीने शासनाच्या निर्देशांना मूठमाती देऊन, रस्त्यांची कामे यापूर्वीही केली गेली असून, आत्ताही अशा प्रकारे बेजबाबदारपणे कामे केल्याने कामाच्या दर्जा आणि गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पावसात केली जाणारी रस्त्याची कामे हे निकृष्ट दर्जाचे असतात असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच प्रशासनानेही या बाबत नियमावली दिलेली आहे. तरीही, मग्रूर ठेकेदार स्थानिक सभेचे सदस्य आणि मुख्याधिकारी यांच्या मिलीभगतीने सदर अनधिकृत कामे पूर्णत्वाला नेले जात आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थार्जन होत असल्याचेही काही सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

नमूद प्रकरणी कामे पावसातही रेटून नेली जात असल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले असल्याने सदरील ठेकेदारांवर कारवाई करण्या संदर्भात मंत्रालया सह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रहार संघटनेचे पदाधिकारी नितीन रोही यांनी माध्यमांना सांगितले आहे. याविषयी जनआंदोलन करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

प्रहार संघटनेचे नितीन रोही हे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, बांधकाममंत्री व राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु यांनाही निवेदन देणार असून, नगरपालिका अधिकारी व नगराध्यक्ष,नगरसेवक यांच्या विरोधी आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे समजते आहे.

१७ रस्त्यांच्या कामांना किती निधी आला ?, किती खर्च झाला ?, रस्ता कसा झाला आहे ? त्याची लांबी/रुंदि किती आहे ? या कामांकडे कीती दुर्लक्ष झाले आहे ? , किती गलथान कारभार झाला आहे ? भष्ट्राचार किती केला गेला आहे ? याची माहिती जनतेसमोर जन – आंदोलनाच्या माध्यमातून मांडणार असून, याआधी पत्रकार परिषद घेऊन, नगरपालिकेचा गलथान कारभार/भष्ट्राचार बाहेर काढणार असल्याचे रोही यांनी माध्यमांना सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading