दिनांक ७ एप्रिल २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे धार्मिक वातावरणात संत परीक्षक श्री गोरोबा काका यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती स्थापना, कलशारोहण व नूतन मंदिर लोकार्पणाचा भव्य कार्यक्रम गुरुवार, दि. १० जुलै २०२५ (चैत्र शुद्ध त्रयोदशी, शके १९४६) रोजी आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती माजी सैनिक नंदकुमार चंदन यांनी दिली.

या पवित्र निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणी व संत परीक्षक गोरोबा काका यांच्या मूर्तींची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता प्रतिमा पूजन, होम-हवन व नवग्रह पूजन होईल.

दुपारी १२ वाजता बालब्रम्हचारी योगी श्री तेजनाथजी महाराज यांच्या पवित्र हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलश प्रतिष्ठापना व मंदिर लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे संध्याकाळी होणारी हरिजागर सेवा, जी ह.भ.प. संदीपान महाराज तनपुरे यांच्या वाणीने रंगणार आहे. त्यानंतर ह.भ.प. लक्ष्मण महाराज पाटील (आळंदी देवाची) यांचे प्रभावी कीर्तन होणार आहे.

या धार्मिक कार्यक्रमात कोळगावसह परिसरातील नागरिकांनी, विशेषतः कुंभार समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात सहभाग नोंदवला आहे. आयोजकांनी भाविकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन अध्यात्मिक लाभ घ्यावा.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)


Advertise..
