दिनांक ३१ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरात पर्यावरण पूरक ग्रीन सिटी उपक्रमाअंतर्गत श्रीगोंदा नगरपरिषद व निसर्ग प्रेमी मिळून एक हजार झाडे लावणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश शहरातील हरित क्षेत्र वाढवून पर्यावरणाचा समतोल साधणे आहे.
शुक्रवारी सकाळी, औटीवाडी तलावाजवळील परिसरात या मोहिमेची सुरुवात श्रीगोंदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांच्या हस्ते जंगली झाडांच्या वृक्षारोपणाने करण्यात आली. या वेळी मुख्याधिकारी भगत यांनी उपस्थित निसर्ग प्रेमींना संबोधित करताना सांगितले की, “श्रीगोंद्यातील निसर्ग प्रेमींनी हाती घेतलेला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे. हरित क्षेत्र वाढविणे आजच्या काळाची गरज आहे, आणि नगरपरिषद या उपक्रमाला पूर्ण सहकार्य करेल.”
वृक्ष मित्र नवनाथ दरेकर यांनी या प्रसंगी त्यांच्या मनोगतात ५० हजार बियांच्या रोपणाचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी संत तुकाराम महाराज वृक्ष संवर्धन समिती स्थापन करून युवकांना या चळवळीत सहभागी करून घेतल्याचे सांगितले. “वृक्ष लागवड आणि संवर्धन ही चळवळ भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा मानस आहे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी शहाजी खेतमाळीस, देवीदास खेतमाळीस, मिठू लंके, विशाल दंडनाईक, संकेत गांजुरे, सहदेव खामकर, सुभाष ठोकळ, संदीप ठोकळे, धनंजय औटी, संभाजी तरटे, अभिजीत औटी, अंकुश चौधरी आणि मनिषा काकडे यांची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन नवनाथ खामकर यांनी केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






