दिनांक २३ नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा:
सन २०१९ ते २०२४ या सत्ताकाळात भारतीय जनता पार्टीने ‘तत्वशून्य राजकारण’ केल्यामुळे शहरातील पायाभूत सुविधांची दुरवस्था झाली.
श्रीगोंदा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते संतोष इथापे यांनी भाजप आणि मागील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. ‘विकासाच्या घोषणा करून श्रीगोंद्याची बारामती करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी प्रत्यक्षात श्रीगोंद्याचं भिंगाण केलं,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला.
इथापे यांनी माध्यमांशी बोलताना शहरातील आणि तालुक्यातील विकासाच्या मुद्द्यांवरून विद्यमान लोकप्रतिनिधींना घेरले.
प्रत्येक समाजाला गृहीत धरून राजकारण केले, म्हणूनच भाजप आणि पाचपुते यांचा मानस स्वतःच्या घरातील उमेदवार देण्याचा होता. तत्कालीन नेते आणि पुढारी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येत होते, तरीही विकास का झाला नाही? याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल.
लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांची शहर विकासाची जबाबदारी असताना त्यांनी सातत्याने भ्रष्टाचाराकडे कानाडोळा केला, ज्यामुळे शहर पूर्णपणे भकास झाले.

सन २०१९ ते २०२४ या सत्ताकाळात भारतीय जनता पार्टीने ‘तत्वशून्य राजकारण’ केल्यामुळे शहरातील पायाभूत सुविधांची दुरवस्था झाली, असे इथापे म्हणाले.
शरद पवार साहेब यांनी शहरासाठी पाणी योजना मंजूर केली, मात्र सत्ताधाऱ्यांनी त्याचा बोजवारा उडवला. शहरातील वीज, पाणी, रस्ते, धुळीचे साम्राज्य आणि आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले. शहरातील पडलेले फुटपाथ, नादुरुस्त दिवे, वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांचे हाल आणि रस्त्यांची दुरावस्था झाली.
श्रीगोंदा शहरात कधीही जंतू नाशक फवारणी किंवा आरोग्याच्या संदर्भातील उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. अशुद्ध पाणी आणि जागोजागी कचऱ्याचे ढीग यामुळे श्रीगोंदा शहर घाणीच्या विळख्यात सापडले आहे.
“जनतेच्या समोर विकासाच्या मुद्द्यावर समोरच्या दोन्ही/तीनही उमेदवारांना मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही.”
इथापे यांनी महाविकास आघाडीच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त करत, ही निवडणूक जनतेने हातात घेण्याचे आवाहन केले.
महाविकास आघाडीने वार्डा-वार्डात जनतेच्या हिताला बांधील असलेले उमेदवार उभे केले आहेत. लोकांनीच ही निवडणूक हातात घेऊन महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.
राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये मात्र बेबनाव होऊन श्रीगोंदा शहरात त्याची तीन शकले उडाली असल्याचे वास्तव सर्वांसमोर आहे. ‘सत्तेच्या लाभापाई एकत्र झालेल्या सात जणांना ‘हम साथ साथ है’ चा नारा एकत्र देता येणार नाही,’ अशी त्यांची अवस्था आहे.
स्थानिक राजकारण आणि शहर विकासाचा विचार करता, कोणी श्रीगोंदा शहराचं वाटोळं केलं व दर्जेदार विकास कामावर कोणी लक्ष दिले नाही, हे जनतेला चांगलेच माहीत झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे मत इथापे यांनी व्यक्त केले.
भ्रष्टाचारावर बोलत असताना बघ्याची भूमिका घेऊन वाद पेटवणाऱ्यांना जनता मतपेटीतून जागा दाखवेल, असा इशारा इथापे यांनी यावेळी दिला आहे.
स्रोत:(अधिकृत मुलाखत)
