प्रशासकीय निर्देशांना मूठमाती..आरोग्य विभागाचे दुर्लक्ष…
दिनांक २८ एप्रिल,श्रीगोंदा:
काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा शहरासह तालुक्यात कोरोना आजार सदृश्य लक्षणं जाणवल्याने नमूद पीडित व्यक्तींना स्थानिक आरोग्य प्रशासनाने ताब्यात घेत,वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात क्वांरनटाईन वॉर्ड मध्ये दाखल केले होते.
उपचार घेत असतांना त्यांचे स्त्राव नमुने NIV पुणे येथे तपासणीसाठी पाठवले गेले .अहवाल प्राप्त झाल्यानंतर ते संशयित इसम कोरोना निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.काही दिवस निरक्षणाखाली ठेवल्यावर त्या रुग्णांना दवाखान्यातून घरी रवाना करण्यात आले.त्यांना साधारण १४ दिवस घरीच राहत निरनिराळ्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना स्थानिक आरोग्य विभागाने दिल्या होत्या. मात्र,काही दिवसांपूर्वीच दवाखान्यातून बरे करून घरी पाठवण्यात आलेल्या या रुग्णांपैकी काही चक्क घरात न राहता जनसंपर्कात असल्याचे निदर्शनास आले आहे.
सर्वत्र कोरोना आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.शहरांमध्ये पोसत चाललेल्या या आजाराची मुळं आता ग्रामीण भागापर्यंत पाय रोवताना दिसत आहेत.भारत सरकार सह राज्य शासनाने केलेल्या लॉकडाऊनच्या अवाहनाला सर्वत्र बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. साधारण प्रमाणात काही लोक निर्देशांचे व सूचनांचे उल्लंघन करतानाही सर्रास आढळले. यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाने उग्ररूप धारण करीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हातातील काठीचा फिरस्त्यांवर प्रतिबंध म्हणून वापर केला.
दरम्यान कोरोना सदृष्य आजाराचे लक्षणे असलेले काही इसम श्रीगोंदा कार्यक्षेत्रात आढळून आले होते.यात सहा लोक जे एका धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्रित जमलेल्या ठिकाणी गेले होते.तसेच शिक्रापूर येथील कोरोना आजाराने बाधीत महिला डॉक्टरकडे उपचारासाठी गेलेल्या महिलांपैकी श्रीगोंदयातील एक महिला व इतर दोन असे संशयित म्हणून स्थानिक प्रशासनाने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात निगराणीत ठेवले होते. नमूद कालखंडामध्ये त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या.त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने,यातील सहा लोक दिनांक २० एप्रिल रोजी, दोन लोक दिनांक २२ एप्रिल रोजी व शिक्रापूर येथे कोरोना पॉजीटीव्ह डॉक्टरकडे तपासणीसाठी गेलेली महिला दिनांक २७ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालयाच्या मार्फत घरी सोडण्यात आले. घरी सोडल्यानंतर सदरील सर्व लोक कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येणार नाहीत. यासाठी त्यांना घरातच क्वांरनटाईन करण्याच्या सूचना आरोग्य विभागामार्फत देण्यात आल्या होत्या.मात्र.यातील काहींनी डॉक्टरांच्या त्या सर्व निर्देशांना मूठमाती देत,सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त जनसंपर्कात फिरत आपले उद्योग थाटत असल्याचे निदर्शनास आले आहे.यामुळे वेळीच त्यांना सूचना देऊन होम क्वांरनटाईन करण्यात यावे,अशी मागणी करण्यात येत आहे.आरोग्य अधिकारी नुसत्या सूचना देऊन पुढील प्रक्रियेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
नमूद इसम हे कोरोना निगेटिव्ह जरी असले,तरी, डॉक्टरांनी त्यांना १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.या सूचनांचे पालन न करता खुशाल अश्या पध्दतीने बाहेर पडून सार्वत्रिक लोकांच्या संपर्कात येणे हे धोकादायक ठरू शकते,याचेही भान नमूद इसमासह आरोग्य विभागाने ठेवायला हवे.
