आदिवासी युवकाला गटार साफ करण्यासाठी उतरवले चेंबरमध्ये…
डोक्यावरून मैला किंवा मानवी विष्ठा वाहने तसेच दुर्गंधीयुक्त गटारांमध्ये स्वच्छतेसाठी मानवास उतरवणे मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचे अभ्यासकांचे मत..
दिनांक १८ जून,श्रीगोंदा:
शहरातील विविध सफाईचे कामे करण्यासाठी श्रीगोंदा नगरपालिकेने स्वतंत्र कामाचा ठेका दिला आहे. यांच्या मार्फत कंत्राटी पद्धतीने स्थानिक कामगार काम करीत आहेत. काम करणार्या कामगारांकडून अमानवीय किंवा मानवाधिकाराचे उल्लंघन होईल अशा पद्धतीने काम करून घेतले जात असल्याचा प्रकार आज रोजी काष्टी – नगर बायपास रोड जवळ घडला आहे.
एका आदिवासी तरुणाला जो नगरपालिकेच्या ठेकेदाराकडे कंत्राटी कामगार आहे. त्याच्याकडून गटारांची सफाई करण्यात आली आहे. भरलेल्या गटारीत त्या युवकास उतरवून, गटारीचे कचरा जाऊन बंद पडलेल्या नळ्या मोकळ्या करण्यासाठी (चोकप काढण्याचा) त्याला गटारीत अर्ध नागडा करून उतरवल्याचा प्रकार समोर आला आहे.
अशा पद्धतीने काम करणे गैरसंविधानिक किंवा चुकीचे असल्याने,श्रीगोंदा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना याविषयी माहिती विचारली असता,त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिले आहेत. नगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत काम करणाऱ्या कंत्राटी युवकांची कामा विषयी जरी हरकत नसली. तरी, अशा पद्धतीने धोकादायक काम करण्यास भाग पाडने. तसेच, कोरोना प्रादुर्भाव असलेल्या कालखंडात अतिशय घाण असलेल्या चेंबरमध्ये उतरून कोणत्याही प्रकारचे सुरक्षा किट किंवा जोखीम न स्वीकारता त्यांच्याकडून या घाणीत काम करून घेणाऱ्या नगरपालिकेचा अमानवीय चेहरा या उदाहरणाने समोर आला आहे.
उपजिविकेसाठी पर्याय नसलेल्या या युवकांमध्ये विशेषतः दलित आणि आदिवासी समुदायांचे युवक जास्त कार्यरत असल्याचे निदर्शनास येत आहे. मानवी अधिकारांचे उल्लंघन करणारी कामे जर नगरपालिके मार्फत दिलेल्या ठेक्यांतुन चालत असतील. तर, अश्या निषेधार्य बाबींकडे नगराध्यक्षा सह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
