रूप काढायला सांगितले. सर्व मुलांनी भराभर पाटी – पेन्सील काढून गणित सोडवायला सुरवात केली. मी सर्वांच्या आधी माझ्या पाटीवर ०.०००१ हे उत्तर लिहून त्यांना दाखविले. त्यांनी माझे उत्तर पाहिले व माझ्या पाटीवर चूक ची फुली मारली. ते पाहून मी गोंधळातच पडलो. कारण माझे उत्तर चुकले आहे, असे मला वाटत नव्हते. शेवटी न राहवून मी आत्मविश्वासाने त्यांना म्हटलं की ‘नाही गुरुजी, माझे उत्तर अगदी बरोबर आहे. केंद्रप्रमुखांना खूप आश्चर्य वाटलं. तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलाचा आत्मविश्वास पाहून ते चकीत झाले. माझ्याकडे हसून पाहत त्यांनी फळ्यावर ०.००००१ हा आकडा लिहिला व म्हणाले, की वर उणे चार असल्यामुळे योग्य उत्तरासाठी चार शून्य लिहावे लागतील आणि म्हणून तुझे उत्तर चुकीचे आहे. मी आश्चर्याने माझ्या वर्गशिक्षकांकडे पाहिले. त्यांनी इशाऱ्याने मला माझे उत्तर केंद्रप्रमुखांना समजावून सांगण्यास सांगितले. मी पुन्हा उठून उभा राहिलो व केंद्रप्रमुखांना म्हणालो, “गुरुजी, आमच्या वर्गशिक्षकांनी आम्हाला सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे माझे उत्तरच बरोबर आहे.

नंतर मी त्यांना आमच्या वर्गशिक्षकांनी शिकविलेल्या पद्धतीप्रमाणे उत्तर काढून दाखविले. त्यांनी मुद्दामच आम्हाला चुकीचे उत्तर सांगितले होते. त्यांना तपासायचे होते, की आम्ही जे शिकतो त्यावर आम्हाला विश्वास आहे अथवा नाही. माझे उत्तर बघून त्यांनी मला जवळ घेऊन पाठीवर शाबासकी दिली व आपल्या खिशातून पेन काढून मला बक्षीस म्हणून दिला. पेन बक्षीस मिळाला यापेक्षा मला तो केंद्रप्रमुखांनी दिला याचाच खूप आनंद होत होता. माझे वर्गशिक्षकही माझ्याकडे अभिमानाने पाहत होते. मला तर कधी एकदा घरी जातो आणि आईला ही गोष्ट सांगतो असं झालं. शाळेत त्या दिवशी सर्वत्र माझीच चर्चा होती. सर्व शिक्षक माझं कौतुक करत होते. शाळा सुटल्याबरोबर मी अगदी उड्या मारत घरी गेलो.
आई घरी नव्हती. मी तसाच नदीकडे पळत गेलो. आई तिथेच होती. मी तिच्या जवळ जाऊन मला बक्षीस म्हणून मिळालेला पेन तिला दाखविला व शाळेत काय – काय झालं, तेही सांगितलं. तिने मला जवळ घेत माझा मुका घेतला माझ्या हातावर चार आणे ठेवले व म्हणाली, की “जाय, काहीतरी खाईले जो “मला बक्षीस कशासाठी मिळालं, ते आईला कळत नव्हतं, पण मी काहीतरी मोठं काम केलं आहे, असंच तिला वाटत होतं. त्यानंतरही शाळेत असे अनेक प्रसंग घडले, ज्यांनी माझ्या आयुष्याला दिशा दिली, माझा आत्मविश्वास वाढवला. त्यातलाच एक किस्सा आहे. चौथ्या वर्गात असताना म.गांधी जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा होती. आमच्या नवीन वर्गशिक्षिका भारतीबाईंनी मला ‘मी गांधी बोलतोय ‘हे दोन पानांचं भाषण लिहून दिलं व मला पाठ करायला सांगितलं. बाईंची भाषा फारच शुद्ध होती. तरीही कसंबसं मी ते भाषण पाठ केलं. ऑक्टोबर असल्यामुळे गारवा वाढला होता. I had a dream! Dr. Rajendra Bharud, (IAS) .. Part (16).
भाषण स्पर्धा सकाळीच असल्यामुळे बहुतेक विद्यार्थी स्वेटर, टोपी व बूट घालून आले होते . माझा अवतार नेहमीप्रमाणेच होता. माझ्या अंगात स्वेटर तर सोडा पण पायात चप्पलही नव्हती. गांधीजींच्या फोटोला हार घालून आरती करण्यात आली. आधी हेडमास्तर व इतर शिक्षकांची भाषणे झाली. जवळपास आठच्या सुमारास मला भाषण देण्यासाठी स्टेजवर बोलाविण्यात आले. थंडी बरीच होती. मी उठून स्टेजवर गेलो. बाईंनी सांगितल्याप्रमाणे आधी गांधीजींच्या फोटोला नमस्कार केला व माईकजवळ जाऊन भाषण सुरू केलं. माझं पाठांतर खूप छान झालं होतं. त्यामुळे भाषण उत्तम झालं. पण फरशी गार असल्याने व माझ्या पायात चप्पल नसल्यामुळे शेवटी – शेवटी माझे पाय थंडीने थरथर कापू लागले. थोड्या वेळाने माझे सर्वांग थरथर कापूलागलं. कसंबसं भाषण संपवून मी खाली उतरलो. भाषण छान झालं होतं. सर्वांनी टाळ्या वाजवून मला प्रोत्साहित केलं. सर्व शिक्षकांनी माझं खूप कौतुक केलं. कार्यक्रम संपल्यावर हेडमास्तरांनी मला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून मी स्वेटर, चप्पल वगैरे का घातले नाहीत,
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
