मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड..(IAS).भाग २२.

फक्त त्याचे पोट भरेल एवढे मांस हवे आहे. ससाण्याने राजाला त्या पारव्याच्या वजनाएवढेच राजाचे मांस मागितले. शिबीराजाला फार आनंद झाला. आपल्या मांसाच्या बदल्यात त्या पारख्याचा जीव वाचत आहे, हे पाहून त्याने लगेच आपल्या सेवकांकडून एक तराजू मागविला. तराजूच्या एका पारड्यात त्याने पारव्याला ठेवलं व लगेच आपल्याजवळच्या धारदार कट्यारीने आपल्या मांडीचे मांस कापून दुसऱ्या पारड्यात ठेवलं. पण तराजू जराही हलला नाही. राजाला आश्चर्य वाटलं. पारवा तर लहानच होता, पण त्याचं वजन जास्त असल्यासारखं वाटत होतं. राजाने आपल्या दुसऱ्या मांडीचेही मांस कापून तराजूत टाकलं, पण तरीही पारव्याच वजन भरलं नाही. ससाणा उत्सुकतेने शिबीराजाकडे पाहत होता. राजाने आणखी मांस टाकल्यानंतरही जेव्हा पारव्याचे वजन भरलं नाही. तेव्हा शेवटी राजा स्वतःच तराजूत जाऊन बसला. त्याला काहीही करून त्या पारव्याचा जीव वाचवायचा होता. राजा स्वतः तराजूत जाऊन बसल्याबरोबर एक चमत्कार झाला. पारव्याचे व ससाण्याचे रूपांतर देवांमध्ये झाले. खरं तर ससाणा म्हणजे देवांचा राजा इंद्र होता, तर पारवा म्हणजे अग्निदेव होता. त्यांना शिबीराजाची परीक्षा घ्यायची होती, म्हणून त्यांनी ते रूप घेतलं होतं. शिबीराजा देवांसमोर हात जोडून उभा राहिला. देव म्हणाले, हे राजा! आम्ही तुझ्या दयाभावाबद्दल खूप ऐकलं आहे.

जेवढं ऐकलं होतं, त्याहूनही तू खरोखरच अधिक दयाळू आहेस. आम्ही तुला आशीर्वाद देतो, की तुझी थोरवी युगानुयुगे गायली जाईल. तुला कधीच काही कमी पडणार नाही. तुझं कल्याण असो ! असं म्हणून देव अदृश्य झाले. ते अदृश्य होताच राजाची मांडी व शरीरावरच्या जखमा आपोआप भरल्या. त्यानंतर शिबीराजाने अनेक वर्ष सुखाने राज्य केलं. एक आदर्श व दयाळू राजा म्हणून त्याची कीर्ती तिन्ही लोकांत पसरली.”, असं म्हणून बाईंनी गोष्ट संपविली. आम्ही सर्व मुलं गोष्ट ऐकण्यात अगदी गुंग होऊन गेलो होतो. बाई पुढे म्हणाल्या, “तर मुलांनो या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं, की जेवढा आनंद देण्यात आहे, तेवढा इतर कुठल्याच गोष्टीत नाही. एखादी वस्तू घेण्याचा किंवा चमचमीत खाण्याचा आनंद हा काही क्षणांचाच असतो; पण जर आपण आपल्याजवळची अत्यंत आवडती वस्तू जर एखाद्या आपल्यापेक्षा अधिक गरजू व्यक्तीला दिली. तर, त्यातून मिळणारं समाधान आयुष्यभर आपल्यासोबत असतं. आणि देवालाही अशी माणसं खूप खूप आवडतात. तो त्यांना आपला आशीर्वाद देतो. मग मुलांनो, आवडली ना गोष्ट ?” आम्ही सर्व मुलं एका आवाजात ओरडलो, “हो बाई!”

सर्व लहान मुलांप्रमाणे मलाही गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या. एखादी गोष्ट ऐकताना मी एवढा तल्लीन होऊन जात असे, की मी स्वतःलाच त्या गोष्टीतील पात्राच्या भूमिकेत पाहत असे. आपणही त्या कथेतील पात्रांसारखं काहीतरी मोठं काम करावं, असं मनापासून वाटे. मला आता अनेक गोष्टी पाठ झाल्या होत्या. शिवाजी महाराज, भक्त प्रल्हाद, श्रावणबाळ, राम – कृष्ण, गौतम बुद्ध या सर्व प्राचीन व ऐतिहासिक गोष्टी मला खूप आवडायच्या. त्या गोष्टी ऐकताना आपणही त्यांच्यासारखेच काहीतरी भव्य – दिव्य करण्याचा संकल्प मी मनात करत असे. त्या दिवशी बाईंनी सांगितलेल्या शिबीराजाच्या गोष्टीने माझ्या मनावर फार परिणाम केला. संध्याकाळी जेव्हा आमची शाळा सुटली, तेव्हा शाळेबाहेर आल्यावर मी प्रकाशला जवळ बोलावलं व माझं खेळणं पिशवीतून बाहेर काढत मी म्हणालो “प्रकाश, तुला हे माकड खूप आवडलं ना?” प्रकाशने मानेनंच होकार दिला. मग मी माझ्याजवळचं खेळणं त्याला देत म्हणालो’ मग हे खेळणं तू घे. ”असं म्हणून मी माझं ते खेळणं प्रकाशच्या हातात दिलं. प्रकाशनेही आपल्या बालसुलभ प्रवृत्तीनं ते खेळणं घेतलं. मला त्यावेळी ते खेळणं माझ्यापासून दूर गेल्याचं वाईट वाटत होतं, पण आपण आपल्या मित्राला काहीतरी देऊ शकलो, याचा खूप आनंदही होता. (I had a dream! Dr. Rajendra Bharud .. (IAS). Part 22.)

घरी आल्यावर मी आईला शिबीराजाची गोष्ट व त्यानंतर आपलं खेळणं प्रकाशला दिल्याचे सांगितलं. ते ऐकून आईलाही आनंद झाला. तिने मला जवळ घेत माझी नजर काढत सांगितलं, की तू जे केलंस ते खूप छान केलंस, पण गोष्टीचा खरा अर्थ आपण गरीब व गरजू लोकांची मदत केली पाहिजे, असा आहे. जे स्वतःच्या हक्कासाठी लढण्यास अक्षम आहेत. अशांसाठी लढलं पाहिजे, असा आहे. प्रकाश तर खूप श्रीमंत आहे. तो अशी कितीतरी खेळणी विकत घेऊ शकतो. त्याऐवजी तू ते खेळणं एखाद्या गरीब मुलाला दिलं असतं, तर त्याला तू खूप आनंद झाला असता. पण, तू जे केलंस ते खूप छान केलंस. आईच्या चेहऱ्यावर आपला मुलगा एवढ्या लहान वयातही किती समजूतदार आहे, याचं समाधान दिसत होतं. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो तेव्हा प्रकाश माझ्याआधीच शाळेत येऊन मी दिलेल्या माकडाशी खेळत बसला होता. त्याला ते खेळणं खूप आवडलं होतं. मी सुद्धा व्हरांड्यात जाऊन बसलो. मला बघताच प्रकाशने आपल्या बॅगमधून चावीने चालणारी एक चमचमती कार काढली व तिची कळ फिरवून ती माझ्या दिशेनं सोडली. झूमऽऽ आवाज करत ती गाडी माझ्याकडे येत होती. तिच्या छतावर रंगीबिरंगी लाईट चमकत होते. ती कार माझ्या पायाजवळ येऊन थांबली. मी तिला उचललं व पुन्हा कळ फिरवून तिचं तोंड प्रकाशच्या दिशेला केलं. तेव्हा प्रकाश आनंदानं म्हणाला “ती कार तू तुझ्याकडेच ठेव. काल तू मला आपलं खेळणं दिलंस. आता तुझ्याजवळ खेळायला काहीच नसेल ना? काल जेव्हा मी आईला दिलेलं खेळणं दाखवलं तेव्हा ती म्हणाली, की’ तुझ्याकडे तर एवढी सारी खेळणी आहेत आणि राजूकडे जे एक खेळणं होते, तेही त्याने तुला दिलं. आता तूही तुझ्या मित्राला तुझं सर्वात आवडतं खेळणं दिलं पाहिजे. ‘राजू, ही माझी सर्वात आवडती कार आहे. तुला आवडली ना ? “ती कार बघून मी खूप आनंदी झालो. खरं तर, आम्ही दोघंही खूप खूष होतो. आम्हाला दोघांनाही काहीतरी विशेष केल्यासारखं वाटत होतं. आम्हाला दोघांनाही वाटत होतं की, देव आमच्यावर प्रसन्न आहे व आम्हाला आशीर्वाद देत आहे. आम्ही दोघांनाही लहान वयातच एक मोठी गोष्ट शिकायला मिळाली होती. देण्यातलं समाधान काय असतं, याचा अनुभव आम्ही बालवयातच घेतला. आमच्या दोघांमधली ही देवाण – घेवाण पुढेही कायम राहिली. आमच्याकडे काही जास्त असलं की, आम्ही दोघंही बऱ्याचदा इतर गरजू मुलांना ते देऊ लागलो. खरं तर, त्या वस्तू खूपच क्षुल्लक असायच्या, पण त्यातून मिळणारा आनंद मात्र खूप मोठा असायचा.

https://bit.ly/bspmycityshrigonda

पुढे पाचवीनंतर मी’ नवोदय’मध्ये गेल्यानंतरही प्रकाश आणि माझी मैत्री तशीच कायम राहिली. सुट्यांमध्ये मी घरी आलो, की तो नेहमी मला भेटायला येत असे. कधी – कधी तो आग्रहाने मला त्याच्या घरी जेवायला घेऊन जात असे. आज प्रकाश गावातीलच हायस्कूलमध्ये शिक्षक आहे आणि आमची मैत्री आजही तेवढीच घट्ट व निर्मळ आहे. आम्ही दोघं एकत्र येतो तेव्हा न चुकता त्याच्या मळ्यावर जातो व नदीकाठी बसून तासन्तास गप्पा मारत बसतो…

क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading