दिवस मजेत जात होते. काही दिवसांनी दिवाळी आली. दिवाळीच्या सुट्ट्यांची कुणकुण लागताच घराची ओढही वाटू लागली. सुट्ट्या सुरू झाल्या त्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व मुलांचे पालक शाळेत हजर होते. माझ्या घरून मात्र अद्याप कोणीच आलेलं नव्हतं. आई मला घ्यायला येणार होती, पण आमच्या गावावरून अक्कलकुव्याला येणारी बसच मुळात साडेनऊ वाजता सुटत असे. त्या दिवशी माझे बहुतेक मित्र आपापल्या आई – वडिलांसोबत आपापल्या गावाला निघून गेले होते. पण दुपारचे दोन वाजले तरीही आई आली नाही. तेव्हा मात्र, मी रडकुंडीला आलो. माझ्या मनात हजार प्रश्न दाटले होते. आईला एवढा उशीर का बरं होत असेल ? आईची बस तर चुकली नसेल ना ? ती येऊ शकली नाही तर ? मी या विचारात असतानाच मला शाळेच्या दरवाज्यात आई दिसली. आईला बघून माझा जीव भांड्यात पडला. मी धावतच तिला जाऊन बिलगलो. आईने मला छातीशी धरून माझा मुका घेतला.
घरी आल्यापासून नवोदय’मधील कडक शिस्तीचा नियम मागे पडून मी आरामात दिवस घालवू लागलो. नवोदयमध्ये आम्हाला रोज सकाळी लवकर उठणे, नंतर पीटी, योगासने त्यानंतर जेवणासाठी रांगा असायच्या. घरी मात्र मी राजासारखा आरामात उठत असे. आई माझ्या पुढ्यात आणून ताट ठेवत असे. मित्रांसोबत मनसोक्त हिंडणे, नदीवर मासे पकडायला जाणे, पक्षी मारत जाणे, मध गोळा करणे यामध्ये दिवस भुर्रकन कसे उडून गेले, ते मलाच कळलं नाही.

दिवाळीनंतर मी माझ्या सातपुडा हाऊसमधे परत आलो. माझे सर्व मित्र व इतर सर्व मुलेही परत आली होती. आम्ही सर्व मित्र एकत्र आलो तेव्हा सर्वांनी आपापल्या घरून आणलेला खाऊ बाहेर काढला. काही मुलांजवळ लाडू, चकल्या, शंकरपाळे यासारखे विविध पदार्थ होते. पण माझ्याजवळ मात्र साधा मुरमुऱ्याचा चिवडा होता. तिथे मला तो बाहेर काढताना खूप संकोच वाटत होता. पण सर्व मुलांनी एकमेकांचा खाऊ एकत्र मिसळून टाकल्यामुळे कोणता खाऊ कोणाचा, हे काही कळलंच नाही. माझा संकोचही त्याने थोडा कमी झाला.
‘नवोदय मध्ये एक छानसं ग्रंथालय होतं. तिथं वेगवेगळ्या विषयांवरची व नामवंत लेखकांची शेकडो पुस्तके होती. मला वाचनाचा छंदच जडला होता. आम्हा विद्यार्थ्यांना एका आठवड्यात केवळ एकच पुस्तक मिळत असे. मी कोणतंही नवीन पुस्तक अधाशासारखं पहिल्याच दिवशी वाचून संपवत असे. मग मी मित्रांनी ग्रंथालयातून आणलेली पुस्तके वाचून काढत असे. अशा पद्धतीने एका आठवड्यात मी अनेक पुस्तके सहज वाचत असे. मला वाचनाची केवळ आवडच नव्हती, तर वाचनाचं वेड होतं. माझा बहुतेक वेळ हा काही ना काही वाचण्यातच जात असे. सुरवातीला मी छोटी – छोटी मनोरंजक पुस्तकं वाचत होतो. त्यात चंपक, फँटम्, नागराज, चाचा चौधरी, पंचतत्र, अलिफ लैला अशा पुस्तकांचा व कॉमिक्सचा समावेश असे. नंतर मी माझा मोर्चा कादंबऱ्यांकडे वळवला. शिवाजी सावंत यांची शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरची ‘श्रीमान योगी’ ही कादंबरी मला खूप आवडली.
‘नवोदय’मध्ये टीव्हीसारखी मनोरंजनाची आधुनिक साधनं नसल्यामुळे आमचा बराच वेळ एकतर मैदानी खेळ खेळण्यात किंवा पुस्तके वाचण्यात जायचा.’ नवोदय’मध्ये आम्हाला इतिहास विषयासोबत सहावीत’ रामायण’, सातवीत ‘महाभारत’, आठवीत ‘ बुद्धचरितमानस’ आणि नववीत ‘श्यामची आई, ही पुस्तके अभ्यासक्रमाला होती. मुख्य विषयासोबतच मला ही पुस्तकेदेखील खूप आवडायची. मी काहीही चांगले वाचले, की माझ्या मनावर त्याचा लगेच परिणाम होत असे. बराच वेळ मी वाचलेल्या पुस्तकांवर चिंतन करत बसत असे.
माझी वाचनाची आवड पुढे एम.बी.बी.एस. करताना खूप कामी आली. मेडिकलचा अभ्यास करताना तासन्तास अभ्यास करणे मला या वाचनाच्या सवयीने सहज शक्य झाले. मी आजकालच्या मुलांकडे बघतो, तर ती नेहमी टीव्ही, व्हिडिओगेम, कॉम्प्युटर हेच खेळ खेळताना दिसतात. त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागतच नाही. शिवाय मैदानी खेळातही विशेष आवड दिसत नाही. यामुळे त्यांचा शारीरिक विकास तर खुंटतोच, पण मानसिक विकासही व्यवस्थित होत नाही. अशी मुले मग छोट्या छोट्या तणावाला सहज बळी पडतात. परीक्षेतील अपयश आणि त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या मानसिक तणाव सहन न झाल्यानेच घडतात. मैदानी खेळ आपल्या शरीराला काटक बनवितात, तर पुस्तके मानसिक विकास घडवत आपल्याला नवी दृष्टी देतात. म्हणूनच ‘वाचाल तर वाचाल’ असं म्हटलं जातं, ते खरंच आहे. I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS), Part 33.
शाळेच्या मैदानात आम्ही रोज सायंकाळी क्रिकेट खेळत असू. एकदा क्षेत्ररक्षण करताना चेंडू अडविण्याच्या नादात मी जोरात पडलो. माझ्या पायाला एक दगड लागला व पायातून घळघळ रक्त वाहू लागले. जखम बरीच खोल होती. माझा विशाल सदारात नावाचा मित्रही आमच्यासोबत क्रिकेट खेळत होता. त्यानेच मला आधार देऊन नर्स मॅडमकडे नेलं. नर्स मॅडम खूप तापट स्वभावाच्या…
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
