होत्या. माझी जखम बघून मला उपचार देण्याऐवजी उपदेशच देऊ लागल्या. माझ्यावर खूप डाफरल्या व शेवटी मला डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. डॉक्टरांनी टाके घालावे लागतील, असं सांगितलं. पण त्यांच्याकडे त्यावेळी भूलचं इंजेक्शन उपलब्ध नव्हतं. पण नर्स मॅडमनी त्यांना भूल न देताच टाके द्यायला सांगितलं. शेवटी डॉक्टरने जखमेची जागा बधीर न करता जखमेला टाके घातले. पायाला टाके घातल्यानंतर माझे चालणे – फिरणे बंदच झाले. त्या काही दिवसांत विशालने माझी खूप मदत केली. अगदी माझे ताट आणून देण्यापासून ते माझे कपडे धुण्यापर्यंतची सर्व कामे त्याने कोणतीही तक्रार न करता अगदी मनापासून केली.
आम्ही सर्वच मुलं आपापल्या घरापासून दूर होतो. त्यामुळे कुणाला काही झालं, तर आम्हीच एकमेकांची काळजी घेत होतो. पुढे एकदा जालन्याला अकरावीत असताना सुद्धा बास्केटबॉल खेळताना माझ्या हाताला फ्रक्चर झाले होते. त्यावेळी तर मी तब्बल दोन महिने घरीच होतो. त्यावेळी माझा महेंद्र शिंदे नावाचा धुळ्याचा मित्रही माझ्यासोबत शिकत होता. तेव्हा माझा अभ्यास मागे पडू नये म्हणून, माझ्यासाठी काही पुस्तके व नोटस् घेऊन तो सामोड्याला आला होता. आम्ही सर्व एकमेकांची खूप काळजी घेत असू. कोणाचे पालक भेटायला आले, की आमची सर्वांची त्यांच्याशी ओळख होत असे. ‘नवोदय मध्ये’ साधी राहणी व उच्च विचार हे आमचं प्रमुख तत्त्व होतं. शिवाय तिथे आम्ही मुलं कधीच मुलींसोबत बोलत नसू. आमचा मुलींशी बोलण्याचा केवळ एकच दिवस असायचा, तो म्हणजे ‘रक्षाबंधन’. त्या दिवशी होस्टेलच्या मुली आम्हाला राखी बांधायच्या, त्यावेळी त्यांच्याशी एक – दोन शब्द बोलायला मिळत असत.

मी तर बारावीत येईपर्यंत एकाही मुलीशी बोललो नाही. कॉलेजमधे असतानाही माझ्यावर या सर्व गोष्टींचा खूपच प्रभाव होता. त्यामुळे मी कधीही भरकटलो नाही. वाईट संगत मला कधीही आकर्षित करू शकली नाही व माझ्या हातून कोणतंही वाईट कृत्य घडलं नाही. सकाळच्या प्रार्थनेनंतर प्रत्येक हाऊसमधील मुले क्रमाक्रमाने ताज्या घडामोडी, हवामान, सामान्यज्ञान यावर चर्चा करायचे. या सवयीमुळे समाजातच नव्हे; तर जगात काय चालले आहे, याचेही आम्हाला चांगले ज्ञान राहत असे.’ यूपीएससी’च्या अभ्यासावेळी मला या सर्व माहितीचा व सवयीचा खूप फायदा झाला.
आमच्या शाळेत आणखी एक अत्यंत महत्त्वाची योजना राबविली जायची. आमच्या सरांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोपटं लावायला सांगितलं. ते मोठं होईपर्यंत त्याची निगाही राखायला सांगितली. जो मुलगा झाड लावत असे, तो त्या झाडाला पाणी देणे, कुंपण करणे, खत देणे ही सर्व कामे करत असे. आणि वर्षाअखेर ज्याचे झाड सर्वांत सुदृढ असेल त्याला पुरस्कार दिला जात असे. शिवाय पर्यावरणाचे अधिकचे गुणही मिळत असे. या सर्व गोष्टींमुळे लहानपणीच आमच्या मनात पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण झाली होती. I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS), Part 34
‘नवोदय मधे नवव्या वर्गासाठी मायग्रेशनची पद्धत असते. यामधे एका राज्यातील’ नवोदय’ची काही मुलं दुसऱ्या राज्यातील ‘नवोदय’मध्ये एक वर्षासाठी पाठविली जात असत. या पद्धतीमागची मुख्य संकल्पना म्हणजे संस्कृती, भाषा, समाजव्यवस्था यांचं आदान – प्रदान. राजस्थानमधील बारन जिल्ह्यातील अटरू नवोदय विद्यालयात आमच्या शाळेतून सोळा विद्यार्थी पाठविले जाणार होते. निवड झालेल्या मुलांमध्ये माझाही नंबर होता. माझ्यासोबत नीलगिरी हाऊसचे सुशील, विशाल, महेंद्र व इतर हाऊसमधून संदेश, नथ्थू, मधुकर हे सर्व माझे मित्रही होतेच. आठवीच्या सुट्या संपल्यानंतर आम्ही कधी एकदा राजस्थानला जातो, असं झालं होतं. आम्ही सर्वजण प्रचंड उत्साहात होतो. सर्वांनी आपलं सामान वगैरे व्यवस्थित बांधून या प्रवासाची जय्यत तयारी केली होती. आमच्यासोबत सूर्यवंशी सर येणार होते. प्रवासाचा पहिला टप्पा अक्कलकुवा ते इंदूर असा होता. लांबच्या प्रवासाच्या विचारानेच मी खूप उत्साहित झालो होतो.”
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
