तिथल्या मेसचं जेवण मोठ्या कष्टाने आमच्या गळ्याखाली उतरत असे. एकतर। तिथं आम्हाला जेवण सोडून अन्य कोणत्याही गोष्टीचा त्रास झाला नाही. रोज काही तरी नवा व विचित्र पदार्थ बघायला मिळायचा. शिवाय भाजीत कि सापडणं तर अगदीच सामान्य गोष्ट होती. पोळ्याही कच्च्याच असायच्या. मात्र मिळेल ते खाण्यावाचून गत्यंतर नसे. त्या अनुभवांतून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं, हे मात्र खरं. अटरूच्या आमच्या ‘नवोदय’मधे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. आम्ही मराठी मुलं त्यात उत्साहाने भाग घेत असू. तिथल्या गणेशोत्सवाची संपूर्ण जबाबदारी तर आमच्यावरच असे. मूर्ती आणण्यापासून ते स्थापना करून रोज पूजा करण्याची सर्व कामे आम्हाला खूप आवडायची. गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या विविध स्पर्धांचीही जबाबदारी आमच्यावरच असायची. आम्ही मग फॅन्सी ड्रेस, मिमिक्री असे अनेक रंगतदार कार्यक्रमाचं आयोजन करत असू.

आठ मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्तानं उत्स्फूर्त भाषण स्पर्धा घेण्यात आली. एका छोट्या खोक्यात बऱ्याच चिठ्या ठेवलेल्या होत्या. ज्या राष्ट्रपुरुषांच्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाची चिठ्ठी निघाली, की त्यांच्याविषयी भाषणात बोलायचं, असं स्पर्धेचं स्वरूप होतं. कुठलीही तयारी न करता भाषण देण्याची ही संकल्पना आमच्यासाठी पूर्णत: नवीन होती. मॅडमच्या आग्रहामुळे आम्ही स्पर्धेत भाग घेतला. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी रीना मीना नावाच्या मुलीकडे होती. तिने ‘झाशीची राणी’ या विषयावर बोलण्याची पूर्ण। तयारी केली होती. ‘झाशीची राणी’ नावाची एक वेगळी चिट्ठी तिने बनवून घेतली. स्पर्धा सुरू झाली. सर्वांत पहिला नंबर आमच्या विशाल सदारावचा लागला. तो देवाचं नाव घेत – घेतच व्यासपिठावर चढला. त्याने चिठ्ठी काढली. त्याच्या वाट्याला आलेला विषय होता- ‘ऐश्वर्या राय’. तो कधी चिठ्ठीकडे , तर कधी आमच्याकडे बघत होता. तरीही तिच्याविषयी थोडी माहिती असल्याने तो हिंमत करून बोलू लागला.” ऐश्वर्या राय एक अच्छी अभिनेत्री है। उन्होने सन १९८३ में विश्वसुंदरी का खिताब भी जीता है” ‘१९८३ हे वर्ष ऐकताच सर्वजण मोठमोठ्याने हसू लागले. त्या वर्षी तर चिमुकली ऐश्वर्या राय तिच्या शाळेतील फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेत असावी. तिला तो किताब ९४ साली मिळाला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या मुलाला ‘सरोजिनी नायडू हा विषय मिळाला. पण त्याला ‘सरोजिनी नायडू’ या भारताच्या कोकिळा होत्या, यापलीकडे काहीच आठवत नव्हतं. अशाच गमतीदार पद्धतीने स्पर्धा पुढे सरकत होती. शेवटचे दोन स्पर्धक उरले होते. एक मी व दुसरी सूत्रसंचालन करणारी रीना मीना. तिने माझं नाव पुकारलं आणि धडधडत्या हृदयाने मी स्टेजवर चढलो व मनातल्या मनात आठवतील त्या सर्व देवांचा धावा करत चिठ्ठी उचलली. मला आलेला विषय होता- ‘माँ’. मी क्षणभरासाठी डोळे बंद केले. आईचा हसरा चेहरा माझ्या नजरेत उमटला आणि मी उत्स्फूर्तपणे बोलू लागलो, “माँ शब्द में कितनी मिठास है। वो हमे कठिनाई से लडकर बडा करती है, पढाती है। अपने पैरो पे खडा होने के काबील बनाती है। और एक हम होते है जो शादी होते ही अपनी बिवी के इशारों पर नाचने लगते है। “माझे भाषण हळूहळू रंगत होते. माझी हिंदी तशी जेमतेमच होती, पण मी आईचा चेहरा डोळ्यांसमोर आणून सुचेल ते बोलत होतो. शेवटी मी म्हटलं, “मॉ भगवान का दिया हुआ अनमोल तोहफा है। माँ अपने बच्चो का खयाल रखने के लिये कुछ भी करने को तैयार हो जाती है। और हमारा फर्ज बस इतना है कि हम अपनी माँ के उस प्यार के काबील बनकर दिखाए। “एवढे बोलून मी सर्वांना नमस्कार करून व्यासपीठावरून खाली उतरू लागलो. सर्व सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता. त्यानंतर शेवटी रीना मीनाचा नंबर आला व अपेक्षेप्रमाणे तिला ‘झाँसी की रानी’ हाच विषय आला. तिने पाच मिनिटांचं उत्कृष्ट भाषण दिलं. आता निकालाची वेळ होती. तिसरं बक्षीस एका राजस्थानी मुलाला मिळालं. मला तिसऱ्याच बक्षिसाची अपेक्षा असल्याने माझ्या सर्व अपेक्षांवर पाणी फिरलं. मी तसाच हिरमुसला होऊन बसून होतो. दुसरं बक्षीस रीना मीनाला जाहीर झालं. त्यानंतर प्रथम क्रमांकाच्या बक्षिसासाठी व्यासपिठावरून घोषणा झाली, “और प्रथम क्रमांक जाता है कुमार राजेंद्र भारूड को। ”माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. सर्व सभागृह पुन्हा एकदा टाळ्यांनी कडाडले होते. त्यावेळी मला जो आनंद झाला तो केवळ अवर्णनीय होता.
कधी खेळत, कधी अभ्यास करत आमचा वेळ जात होता व शेवटी आमच्या परीक्षेचे दिवस आले. आम्ही सर्व कामे सोडून जोमाने अभ्यासाला लागलो. आमचा निकाल जाहीर झाला तेव्हा कळलं, की नथ्थू कुंभार पहिल्या, मगन वळवी दुसऱ्या व मी तिसऱ्या क्रमांकाने पास झालो होतो. वार्षिक परीक्षेतही महाराष्ट्रातीलच मुलांनी बाजी मारली होती. आम्हा सर्वांचं खूप कौतुक झालं. आम्ही केवळ परीक्षेतच नव्हे, तर सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ या सर्व विषयांत अव्वल आलो होतो. खेळ व अभ्यास या दोन्हींमधे मिळालेल्या या यशामुळे आमचे अक्कलकुवा व अटरू या दोन्ही ‘नवोदय मधील शिक्षकांनी खूप कौतुक केले. आम्हाला सर्वांना शाबासकी दिली. अटरू ‘नवोदय’मध्ये तर सर्व शिक्षकांच्या तोंडी एक वाक्य होतं, “महाराष्ट्र से ऐसी बॅच ना कभी आई थी और ना कभी आएगी।
“शेवटी आमचा अक्कलकुव्याला परतण्याचा दिवस उजाडला. आम्ही सर्व मित्रांच्या व शिक्षकांच्या भेटी घेतल्या. त्यांना सोडून जाताना मन दाटून आले. काही जण तर रडतही होते. आयुष्यात आपल्याला विचित्र गोष्टी अनुभवायला मिळतात. आम्ही आलो तेव्हाही रडत होतो आणि आता परत चाललो तेव्हाही आम्ही रडतच होतो. पण दोन्ही वेळच्या रडण्याचं कारण खूप वेगळं होतं. तिथून परतावं, असं कुणालाच वाटत नव्हतं. आम्हाला तर आम्ही खूप मोठं काहीतरी सोडून चाललो, असंच वाटत होतं. हातातून काहीतरी निसटल्याचा भास होत होता. जड अंतःकरणाने आम्ही अक्कलकुव्याचा परतीचा प्रवास सुरू केला. मला नेहमी वाटतं, की आपल्या प्रवासाची दिशा आपल्या हातात असते, पण त्या प्रवासात तुम्हाला कोणते व कसे सोबती मिळतील, हे सर्वस्वी नियतीवर अवलंबून असतं. कधी – कधी आयुष्यात प्रवास पुढे चालू ठेवण्यासाठी अनेक चांगल्या मित्रांना, व्यक्तींना व ठिकाणांना सोडून पुढे जावं लागतं. पण हेच तर आयुष्य आहे. काहीजण त्यालाच प्रारब्ध म्हणतात. अटरू नवोदय मधून निघताना वाईट तर वाटतच होतं, पण एका नव्या प्रवासाची ओढही लागली होती. I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS), part 36.
आता आमचं दहावीचं वर्ष होतं. शिक्षकही आता आमच्या अभ्यासावर अधिक लक्ष ठेवून असायचे. काही दक्ष पालक पुन: पुन्हा आपल्या मुलांना भेटायला येत, त्यांना चांगला अभ्यास करायला सांगत. आई मला अभ्यास कर म्हणून सांगायला कधीही आली नाही. मात्र मी घरी गेलो, की ती प्रत्येक वेळी आवर्जून म्हणायची, “चांगला पास व्हयीस भाऊ. अभ्यासावर ध्यान दिस. ‘मी अभ्यास तर करतच होतो, पण माझी जुनी अवांतर वाचनाची सवयही तशीच होती. मला पहिला किंवा दुसरा नंबर मिळविण्यात विशेष रस नसल्याने मी अभ्यासासोबतच माझी आवडही जपत होतो. मात्र आमच्या गणिताच्या सरांच आमच्यावर बारीक लक्ष असायचं. एकदा तर त्यांनी मला स्टडी रूममध्ये असं अवांतर वाचन करताना बघून खूप रागावलं. माझे सर्व मित्रही आश्चर्यान माझ्याकडे पाहत होते. सरांनी व मित्रांनी मला खूप समजावलं. तेव्हा मात्र…
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
