मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड (IAS), भाग ३७.

निश्चय केला की, आता परीक्षा होईपर्यंत फक्त अभ्यासाची पुस्तकेच वाचायची. अवांतर वाचन तात्पुरते मी बंद केलं आणि मन लावून अभ्यास करू लागलो. मला माझ्या शिक्षकांचा विश्वास सार्थ करायचा होता. त्यावेळी माझं इंग्रजी अगदीच बेताचं होतं. माझं हस्ताक्षरसुद्धा फारसं चांगलं नव्हतं. मी चांगलं अक्षर काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझ्या हस्ताक्षरांत पाहिजे तशी सुधारणा होऊ शकली नाही. माझ्या व सरांच्या प्रयत्नांमुळे माझी पहिल्या सराव परीक्षेतील कामगिरी बरीच सुधारली. त्यामुळे माझा आत्मविश्वासही वाढला होता.

पाहता – पाहता बोर्डाची परीक्षा तोंडावर येऊन ठेपली. माझे सर्व पेपर चांगलेच गेले. पण मला काळजी होती ती माझ्या हस्ताक्षराची. परीक्षा संपवून मी घरी आलो व माझा सुट्ट्यांमधील राजेशाही दिनक्रम पुन्हा सुरू झाला. मित्रांसोबत फिरणे, क्रिकेट खेळणे जोरात सुरू झाले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

अशातच निकालाचा दिवस उजाडला. मला बोर्डाच्या परीक्षेत ८४.२ टक्के गुण मिळाल्याचं कळलं. गणित आणि विज्ञानामध्ये मला चांगले गुण मिळाले होते. पण माझ्या अक्षरांमुळे भाषेत मला कमी गुण पडले होते. ‘नवोदय मध्ये माझा तिसरा नंबर आला होता. याआधी ‘नवोदय’मध्ये कधीच कोणाला ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले नव्हते. ही आमची पहिलीच बॅच होती. पहिल्या येणाऱ्या महेंद्र बोरसेला ८५.२ टक्के तर प्रशांत सोनवणेला ८५ टक्के गुण मिळाले होते. माझे सायन्समधील गुण पाहून शिक्षकांना वाटले की, मी विज्ञानात टॉप करू शकेन. आता माझाही आत्मविश्वास वाढल्याने मी अकरावीला सायन्स घेण्याचं ठरवलं.

अक्कलकुवा ‘नवोदय’मधील मुलं दहावीनंतर अकरावी बारावीसाठी भुसावळ ‘नवोदय ला जायची. पण आमच्या बॅचला जालना जिल्ह्यातील परतूर नवोदय’ला पाठविण्यात आलं. परतूर ‘नवोदय’मध्ये आर्ट व सायन्स अशा दोन्ही शाखा होत्या. येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना ८८-८७ टक्के असे चांगले गुण मिळाले असल्याने ते आमच्याशी थोडे फटकून वागत होते. ही जागा, इथले शिक्षक, इथलं वातावरण आमच्यासाठी नवं होतं. त्यात सुरवातीला आणखी एक समस्या आली. तिथे आम्हाला पूर्णवेळ शिक्षकच नव्हते. आमच्या गणिताच्या शिक्षकांच्या पत्नीने आत्महत्या केल्याने त्यांचा बराचसा वेळ कोर्टातच जात असे. फिजिक्ससाठी जे सर होते, कधी – कधी आम्हालाच त्यांना फिजिक्स समजावून सांगावे लागत असे. आमचे केमिस्ट्रीचे शिक्षकही कायमस्वरूपी नव्हते. आणि बायोलॉजीचे सर शिकवत असताना तर मला वर्गात झोपच येत असे. रट्टा मारायचा मला खूप कंटाळा येत असल्याने जीवशास्त्रातील ते पक्षी, प्राणी, झाडे यांची नावं पाठ व्हायला खूप अडचणी येत. त्यामुळे अकरावीत असताना मी अभ्यासापेक्षा खेळाकडेच अधिक वळलो.

तिथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत असे. दरम्यान अक्कलकुव्याचे माझे मित्र विकास व संदेश यांच्याशी किरकोळ भांडण झालं होतं. त्यामुळे मी आता जालन्याच्या मुलांबरोबर अधिक राहू लागलो. त्यांच्यासोबतच मी बास्केटबॉल वगैरे खेळायला जात असे. एकदा असाच खेळत असताना मी पडलो व माझ्या हाताला पुन्हा एकदा कॅक्चर झाले. त्यावेळी इतर सर्व मित्रांसोबतच संदेश व विकासही माझ्याजवळ धावत आले. आमच्यातील वाद एका क्षणात नाहीसा झाला होता. त्यावेळी त्या सर्वांनी मला खूप मदत केली. तिथल्या नर्स मॅडमने माझ्या हाताला एक कच्चे प्लास्टर गुंडाळले व दुखापत गंभीर असावी म्हणून, मला सोडायला स्वतः धुळ्यापर्यंत आल्या. मी आईला धुळ्यात बोलावून घेतलं होतं. हाताला प्लास्टर बघून आई फारच घाबरली. आमच्या भिलाटीत असं प्लास्टर वगैरे बांधलेलं कोणी दिसत नसल्याने माझ्या हाताला खूपच लागलं असावं, असं तिला वाटत होतं. तिच्या आग्रहामुळे आम्ही धुळ्याच्या सैंदाणे डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी मला तपासलं व सर्व खर्च १२००० रुपये येईल, असं सांगितलं. आईकडे एवढे पैसे नसल्याने एका ओळखीच्या व्यक्तीकडून आम्ही धुळ्याच्याच जवाहर मेडिकल फाऊंडेशनचा पत्ता घेतला. तिथे केवळ २००० रुपयांत माझा सर्व उपचार झाला. त्यानंतरचे दोन महिने मी घरीच होतो.

बारावीत मी अगदी पहिल्या दिवसापासूनच खूप अभ्यास करायचा निश्चय केला. मी मनोमन ठरवलं, की खूप मेहनत घ्यायची आणि अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. अकरावीत असलेली शिक्षकांची समस्या बारावीतही तशीच होती, त्यामुळे स्वअध्ययन पद्धतीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि खरं तर मला त्याचीच जास्त सवय होती. मी कधीच कुठला क्लास लावला नव्हता. स्वतःच जीव लावून अभ्यास केला. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या विषयांत तर मी खूपच चांगला होतो. या विषयांचा माझा अभ्यास इतका चांगला झाला होता, की क्वचितच काही अडचण येत असे. याउलट कोणाला काही अडचण आली, तर ते माझ्याकडे विचारायला येत. आम्ही सर्व मित्र एकमेकांना कुठे अडचण आली, तर एकमेकांना विचारूनच ती सोडवत असू. I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS), Part 37

परतूरला आम्हाला आमच्या शिक्षकांची काहीच मदत झाली नाही. बारावीत असताना मी लातूरला एका स्पर्धेसाठी मॅथेमॅटिक्स मॉडेल घेऊन गेलो होतो. तिथे त्याची बरीच प्रशंसा झाली. अशाच पद्धतीने स्वतःच स्वतःला शिकवत आमचा अभ्यास सुरू होता. आणि याच परिस्थितीत आमची बारावीची परीक्षा आटोपली. निकाल लागला तेव्हा मला कळलं, की मी ८३.८ टक्के गुण मिळवून प्रथम आलो. यावेळीही मी इंग्रजी वगळता इतर सर्व विषयांतर टॉपर होतो. गणितात तर मला ९३ टक्के गुण होते. अक्षरामुळे भाषेत पुन्हा एकदा कमी गुण मिळाले होते. माझा मित्र प्रशांत सोनवणे ७७ टक्के गुण मिळवून दुसरा आला होता. पहिल्या पाच विद्यार्थ्यांमधे आम्ही सगळे अक्कलकुव्याचेच विद्यार्थी होतो. माझ्या इतर मित्रांपैकीही बहुतेकांना फर्स्ट क्लास मिळाला होता. आमच्या या यशामुळे सर्वजण आमचं कौतुक करत होते. हे यश आम्ही स्वतः अभ्यास करून मिळविलं असल्यामुळे त्याला आत्मविश्वासाची एक चमक लाभली होती. सुरवातील आमच्याशी गर्वाने वागणाऱ्या जालन्याच्या मुलांना आम्ही दाखवून दिलं, की लहान – लहान खेड्यांमधील मुलांमध्येही प्रचंड गुणवत्ता असते. गरज असते ती परिश्रमाची, अभ्यासाची.”…

क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading