मी एक स्वप्न पाहिलं.!डॉ.राजेंद्र भारुड (IAS)..भाग ५

बरंच लांब होतं. तेवढ्या भर उन्हातही वडिलांनी तिथे पायीपायी जायचं ठरवलं. आई मात्र कडक उन्हामुळं दोन पोरांकडे बघून धास्तावली होती. तिनं वडिलांकडे रिक्षाने जायचा हट्ट धरला. “काहीच नही होवावू पोरंसले. मी द्रौपदीले धरस, तू दीपकले धर. नवस करा तं तरास सोसनाच पडी, नहीं तं देव रागे भरी. ”असं म्हणत वडिलांनी आईला दरडावलं. खरं तर, त्यांना देवीच्या कोपापेक्षा संध्याकाळच्या दारूसाठी पैसे उरणार की नाही, याची जास्त चिंता असावी. आई मात्र ‘कमसे कम पोरंसना तं इचार करा’, असं म्हणत वडिलांना समजविण्याचा प्रयत्न करत होती.

https://bit.ly/bspmycityshrigonda

आई ऐकत नाही, हे पाहून वडिलांनी दुपारच्या त्या भर उन्हात जोराने आईच्या कानशिलात भडकवली आणि गप्पगुमान राहायला सांगून ते पुढे चालू लागले. आई निमूटपणे त्यांच्यामागून चालू लागली. वडिलांनी द्रौपदीला खांद्यावर उचलून घेतले होते. आईकडे दीपक, कपड्यांची पिशवी व इतर सामान होते. ऊन वाढतच चाललं होतं. आईच्या पोटात सकाळपासून अन्नाचा कणही नव्हता. तिच्याकडून जेमतेम पावलं उचलली जात होती. शेवटी न राहवून ती एका झाडाखाली विसाव्याला बसली. वडील मात्र पुढे निघून गेले. पाच दहा मिनिटं झाडाखाली बसल्यानंतर आईला थोडी तरतरी आली. ती पुन्हा गडाकडे चालू लागली.

थोडं अंतर पुढे गेल्यानंतर तिला रस्त्यात लोकांची गर्दी जमलेली दिसली. ती जसजशी गर्दीच्या जवळ जात होती, तशी तिची धडधड वाढत होती. आईने गर्दीतून डोकाऊन पाहिलं आणि मोठ्यानं टाहो फोडला. वडील जमिनीवर पडून जोरजोराने हातपाय झटकत होते. त्यांच्याशेजारी द्रौपदी मोठमोठ्यानं रडत बसलेली होती. वडिलांची दारू, कडक ऊन व मिरगीने डाव साधला होता. आईचा संपूर्ण धीर खचला. काय करावं, हे तिला सूचत नव्हतं. ती रडत होती. जोराजोराने वडिलांचे पाय चोळत होती. आजूबाजूला एवढे लोक होते, पण त्या गरीबबाईची मदत करायला कुणीच पुढे आलं नाही. शेवटी एका भल्या माणसाला तिची दया आली. त्याने व आईने मिळून वडिलांना उचलून एका झाडाच्या सावलीत ठेवलं. त्या माणसानेच मग जवळच्या पिशवीतून कांदा काढला व दगडावर फोडून तो वडिलांच्या नाकाजवळ धरला. थोड्यावेळाने वडील शुद्धीवर आले. आणि आईच्या जीवात जीव आला. तिने जवळच्या कळशीतलं थोडंसं पाणी त्यांना दिलं.

“इतल्या उनमा पोरंसले ली सन कोणी गडवर येस का? वरताईन तुले किट ना आजार. मावलीनी पुण्याई शेतू वाचना. “आईला मदत करणाऱ्या त्या माणसाने काही वेळाने वडिलांना रागावत म्हटलं, थोडावेळ आईशी बोलून तो पुढे निघून गेला . एवढं झाल्यानंतरही वडिलांची बडबड व आईला शिवीगाळ करणं सुरूच होतं. त्यांच्या मते गडावर चढताना आईने टोकल्यामुळेच हा प्रसंग उद्भवला होता. आई मात्र नवरा वाचला म्हणून मनातल्या मनात देवीचे आभार मानत होती. थोड्या वेळाने दोघांनीही परत गड चढायला सुरूवात केली. गडावर पोहचल्यावर देवीचं दर्शन घेतलं, नारळ फोडला व नवसाचं कोंबडं कापून संध्याकाळच्या गाडीने सामोड्याला परत आले. (I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS).. Part 5)

मावशीचं घर आमच्या घरापासून काही अंतरावरच होतं. तिलाही आता दोन मुलं होती. माझा मामा आपल्या कुटुंबाला घेऊन गुजरातमधे ऊस तोडायला जायचा . मामाची स्वतःची झोपडीही नव्हती. तो सहा महिने गुजरातमध्ये मजुरी करायचा व उरलेले सहा महिने मावशीकडे राहायचा. आजी – आजोबासुद्धा मावशीकडेच राहायचे. माझ्या आजीला सर्वजण ‘बया’ नावाने हाक मारायचे व आजोबांना सर्वजण’ बाबा ‘म्हणत. माझी मावशी जेवढी धाडसी होती , तेवढीच ती प्रेमळही होती. आई व मावशी बऱ्याचदा मिळुनच कामाला जात. आई नेहमी मावशीकडे आपलं मन मोकळं करत असे. कारण आईच्या शब्दांना घरात फारशी किंमत नसायची. बाबा अजुनही सालदार म्हणूनच काम करायचे व बया घरातच दारू काढून विकत असे. तिला दारू विकायला फार कष्ट करावे लागत नसत. कारण तिची बरीचशी दारू बाबा व मामाच संपवून टाकायचे. भिलाटीत आता द्रौपदी व दीपक मोठे होऊ लागले.

काळ बदलत होता, पण भिलाटीची अवस्था होती तशीच होती. वडील व त्यांचे दोन भाऊ पहिलवान होते. गावातल्या जत्रेत कुस्त्या खेळणं हा त्यांचा आवडता छंद होता. गावातही सर्वजण आमच्या घराला पहिलवानांचे घर म्हणूनच ओळखत. वडिलांनी व त्यांच्या भावांनी अंगात रग असताना बऱ्याच कुस्त्या जिंकल्या होत्या. पण आता मात्र त्या तिन्ही भावंडाचे शरीर दारूने पोखरले होते. लग्नानंतर सर्वांनी आपापला वेगवेगळा संसार थाटला. आमच्या घरचे सर्वजण मजूर म्हणून कामाला जात. मात्र वडिलांच्या दोन्ही भावांनी आपापल्या घरी दारू पाडण्याचं काम सुरू केलं होतं. याच काळात माझ्या वडिलांचा आजार वाढतच चालला होता. तशातच आई पुन्हा एकदा गरोदर होती . वडिलांचा मिरगीचा आजार केव्हा उचल खाईल, याचा विश्वास नसल्याने त्यांना पूर्णवेळ आराम करायला सांगून आई आता…

क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.!या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading