दिनांक ३१ मार्च,श्रीगोंदा:
Sc, st, vjnt प्रवर्गातील भूमिहीनांना राहत असलेली शासकीय जमीन कायम करण्यासाठी बसपाने काल केलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्यांसह तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील पीडित समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले.
अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त समाजातील बहुतांश कुटुंब स्वतःच्या घरासाठी संघर्ष करीत आहेत. अनेक कालखंडापासून संघर्ष करत असलेल्या या वंचित घटकातील पीडित बांधवांना त्यांच्या हक्काचे घर व जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सदर आंदोलन बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आले.

या विषयाबाबत शासन दरबारी वेगवेगळे निकष असून, सदरील समाज बांधवांना त्यांच्या स्वतःचे घर व जागा मिळण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या भूमिहीन समाजबांधवांना स्वतःच्या हक्काची जागा उपलब्ध नसल्याने, स्थानिक प्रशासनाच्या ग्रामपंचायत, महसूल व वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून ते राहतात. अशा कुटुंबांना स्वतःची जागा नावावर नाही. त्यांना स्वतःच्या हक्काची घरं मिळवून राहत्या जागेचा उतारा मिळावा यासाठी काल दिनांक ३० मार्च रोजी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांनी श्रीगोंदा तहसीलदार व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केल्याप्रमाणे आंदोलन केले.
यादरम्यान आंदोलनामध्ये गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन देत आंदोलन थांबण्याची विनंती केली. याबाबत शासनाच्या निकषानुसार कारवाई सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. (Shrigonda..BSP’s agitation back after written assurance.. BDO’s order to settle pending case ..)
घर आणि जागे पासून वंचित असलेल्या एससी, एसटी आणि व्हीजे एनटी प्रवर्गातील बांधवांनी ते राहत असलल्या ठिकाणचे पुरावे सादर करावेत. त्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असे बीडीओ प्रशांत काळे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. मतदान ओळखपत्र व त्या कार्यक्षेत्रातील प्रभाग यादीत नाव व इतर शासकीय ओळखीचे पुरावे सादर करावेत, त्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येईल असेही सांगितले.
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात प्रलंबित असलेल्या प्रकरनांना निकाली काढून तात्काळ कारवाई करीत पुढील अहवाल कार्यालयास सादर करावा, नमूद कार्यक्षेत्रात मागणी संदर्भातील प्रकरणे निरंक असल्यास तसेही कळवावे. असे लेखी पत्र यावेळी बी. डी. ओ. काळे यांनी ग्रामसेवकांना दिले. त्याची एक प्रत आंदोलकांना देण्यात आली. या लेखी आश्वासनानंतर आंदोलन थांबवण्यात आले.
या धरणे आंदोलनात बहुजन समाज पार्टीची जिल्हा प्रभारी सुनिल ओहोळ, स्वप्निल पवार, जिवाजी घोडके, रामा घोडके, कचरु लष्करे, राजेंद्र राऊत, विठ्ठल मस्के, मोहन काळे, अनिकेत सोनवणे, त्रिंबक साळवे, ज्ञानदेव शिरवाळे, आकाश सुडगे, अंबादास घोडके, मंगेश घोडके, बाबासाहेब ओहोळ सह तालुक्यातील फुले, आंबेडकरी विचारधारेतील कार्यकर्ते, पीडित समाज बांधव व बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत:(bdo चे लेखी पत्र)
