मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ. राजेंद्र भारुड (IAS) भाग ५५.

सोहळा होत असे. या सर्वांगसुंदर समारंभाची सगळे विद्यार्थी वर्षभर आतुरतेने वाट बघत असत. याच कार्यक्रमात ‘बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ हा पुरस्कार दिला जात असे. विद्यार्थ्याची साडेचार वर्षातील शैक्षणिक प्रगती, विविध सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमातील सहभाग, वर्तणूक, शिस्त आदी निकषांवर कॉलेजचा ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थी मुलाखतीद्वारे निवडला जायचा. ‘एस. व्ही. देशपांडे शिष्यवृत्ती’ आणि ‘पदचिन्ह देऊन संबंधित विद्यार्थ्याला सन्मानित केलं जायचं. त्यामुळं हा पुरस्कार आपल्याला मिळावा, अशी प्रत्येक विद्यार्थ्यांची सुप्त इच्छा असायची.

यावर्षीच्या ‘बेस्ट स्टुडंट अॅवॉर्ड’च्या मुलाखतीसाठी ६ विद्यार्थ्यांमध्ये माझीही निवड झाली असल्याचं फार्मसीच्या एका प्राध्यापकांनी मला सांगितलं. पुरस्कार वितरणाच्या आठवडाभर आधीच आमच्या मुलाखती झाल्या. त्यासाठी मायक्रोबायोलॉजी आणि फार्मसीच्या प्राध्यापकांचं एक पॅनल तयार करण्यात आलं होतं. मला सर्वांत आधी बोलवण्यात आलं. मी पॅनलपुढे बसलो, तेव्हा त्यांनी मला विचारलं “भविष्यात तुला काय व्हायचंय? “मी उत्तर दिलं, मला गरीब आणि तळागाळातील लोकांसाठी जी काही चांगली कामं करता येतील तेवढी कामं करायची आहेत, त्यासाठी मी युपीएससी परीक्षा देवून आयएएस अधिकारी होऊ इच्छितो “खरं तर माझ्या या उत्तराने त्यांना फार आश्चर्य वाटलं. त्यांनी मला विचारलं, “मग तू डॉक्टरी पेशा सोडणार आहेस का ?” ” मॅडम, खरं तर मी प्रशासकीय सेवेमध्ये गेल्यानंतर वैद्यकीय व्यवसायात काम करत असलेल्या अनेकांना जास्त मदत करू शकेन. कारण त्यावेळी माझ्या हातात अधिकार असतील. आपल्या कॉलेजसारख्या वैद्यकीय संस्थांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा अधिक विकास आणि विस्तार करू शकेन. त्यामुळे माझी ही भूमिका एकादृष्टीने वैद्यकीय क्षेत्रासाठी फार उपयुक्त ठरू शकेल.’ त्यांनी मला आणखी दोन – तीन प्रश्न विचारले आणि माझी मुलाखत संपली. मला बाहेर प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले. अन्य पाच जणांना क्रमाक्रमाने मुलाखतीसाठी बोलाविण्यात आलं. उरलेले पाचही विद्यार्थी मुंबईचे होते. सर्वांच्या लवकरच मुलाखती संपल्या.

पॅनलमध्ये ज्या मॅडम होत्या, त्या काही वेळाने बाहेर आल्या. आम्ही सर्वजण उत्सुकतेने त्या काय सांगतात, याकडे कान टवकारून लक्ष दिलं. मॅडम म्हणाल्या – “राजेंद्र भारुड, तुझी ‘एस. व्ही. देशपांडे पुरस्कार व शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे. माझे कान तृप्त झाले. मला खूप आनंद झाला. पाच वर्षांपूर्वी भेदरलेल्या नजरेनेच मी या कॉलेजमध्ये आलो होतो. सामोड्यासारख्या छोट्या गावातून येतांना चांगला माणूस बनण्याचं स्वप्न घेऊन मी मुंबई नगरीत पाऊल ठेवलं होतं. आज ते स्वप्न पूर्णत्वाकडे जातांना दिसत होतं.

https://bit.ly/bspmycityshrigonda

मी अत्यानंदाने घरी सामोड्याला फोन केला. अपेक्षेप्रमाणे त्यांना या पुरस्काराचंही फार काही वाटलं नाही. मग मी दोंडाईच्याला मंडाले मावशीना फोन केला. त्यांना खूप आनंद झाला. आठ दिवसांनी मला सन्मानपूर्वक सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याचा पुरस्कार देण्यात आला. माझी इंटर्नशिप काही दिवसातच संपणार होती. ३ मार्च २०१२ ही पदवीदान समारंभाची तारीख ठरली. मित्रांचा पद्व्युत्तर प्रवेश परिक्षेचा निकालही तोपर्यंत जाहीर झाला होता. फारच थोड्या विद्यार्थ्यांना त्या परिक्षेत यश मिळालं होतं. विशेष म्हणजे, मी स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना मला चिडवणाऱ्यांचं तर पूर्ण गणगोत साफ आपटलं होतं. त्यांचा निकाल समाधानकारक न लागल्यानं पदवीदान समारंभाविषयी ते फारच निरुत्साही होते. पण मी, प्रदीप, निखिल थत्ते, ऋचा, सिद्धार्थ आम्ही चारपाच जणांनी पुढाकार घेतल्यावर सर्वांचा उत्साह वाढवायला सुरवात केली. हळूहळू सर्वजण त्यात सहभागी झाले. एकूणच कार्यक्रम सुंदर होणार, याची आम्हाला खात्री वाटायला लागली.

अद्याप माझा युपीएससी मुख्य परिक्षेचा निकाल लागलेला नव्हता. साधारणत: मार्चच्या पहिल्या आठवड्यात तो लागू शकतो, असं मला चंद्रशेखर यांनी सांगितलं. आम्ही सर्वजण कार्यक्रमाच्या तयारीला लागलो. सर्वांनी निमंत्रण पत्रिका, हॉल सजावट, स्लॅमबुक प्रकाशन, फोटोग्राफी, व्हिडीओ शुटींग अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. माझ्याकडे मंडप व्यवस्था, जेवण व येणाऱ्या अतिर्थीच्या स्वागत व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली.” माझ्याकडे जेवणाची व्यवस्था सोपवणार असाल, तर माझी एक अट आहे. समारंभाचं जेवण हे कांदे, लसूण न वापरता सात्विक पद्धतीने बनवलं जाईल. “मी मित्रांना सांगितलं. माझी अट ऐकून मित्र चक्रावले. “तू उगाच काहीतरी हट्ट करु नकोस. “मित्रांनी मला नकार दिला. पण मी माझा अटीवर ठाम होता. “जर जेवणाची व्यवस्था मला बघावी लागणार असेल, तर स्वयंपाक मी म्हणतो त्याच पद्धतीने तयार होईल.” ‘इस्कॉन’ मधून या पद्धतीने बनवलेलं जेवण चवीचा नमूना म्हणून मी आणलं आणि त्यांना चाखायला दिलं. खाऊन बघितल्यावर मात्र सर्वांनी मला एका सुरात होकार दिला आणि विना कांदा लसणाच्या जेवणाचा बेत निश्चित झाला.

पदवीदान समारंभाच्या एक दिवस आधी म्हणजे संध्याकाळी मार्चला माझा युपीएससी मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर झाला. केवळ तीन महिन्यांच्या अभ्यासावर मी मुख्य परीक्षाही पास झालो. मुलाखतीसाठी माझी निवड झाली होती. माझा आनंद गगनात मावेना. आई त्यावेळी पदवीदान समारंभाला येण्यासाठी चंदुनानांसोबत मुंबईकडे निघाली होती. तिला नेहमीप्रमाणे फार विशेष असं काही वाटलं नाही, कारण या परिक्षेबद्दल मी तिच्याजवळ फारसं काही बोललोही नव्हतो. तिला वाटलं की, कुठली तरी डॉक्टरकीचीच परीक्षा असेल. मी मंडाले मावशींना फोन करून बातमी कळवली. ते सुद्धा कार्यक्रमासाठी दोंडाईचावरून येत होते. काका आणि मावशीना खूप आनंद झाला. त्यांनी तोंडभरून माझं कौतुक केलं. दरम्यान कॉलेजमध्ये ही बातमी पसरली होती. माझ्या सर्व मित्रांना खूप खूप आनंद झाला होता. या परिक्षेच्या यशात माझ्या मित्रांचाही वाटा होता. त्यांनी माझं इंटर्नशिपचं काम सांभाळून घेतलं म्हणूनच तर मी अभ्यास करू शकलो. एकीकडे ज्यांनी माझं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी मी युपीएससी मुख्य परीक्षा पास झालो, हे ऐकून तोंडात बोटं घातली. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-55

आता मात्र त्यांनीही माझं कौतुक करायला सुरवात केली. खरंच, ज्या माणसाने मनापासून कष्ट केले, त्या माणसाच्या नशिबात यश नक्की लिहीलेलं असतं. त्याला ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने येऊन भेटतंच. पदवीदान समारंभाचा दिवस उजाडला. भक्तिवेदांत हॉस्पिटलचे चेअरमन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. ठरल्याप्रमाणे आई चंदूनानांसोबत आली. मुंबईसारख्या शहरात चुकामूक होऊ नये म्हणून मीच त्यांना विनंती केली होती. काका व मावशीही मुंबईला आले. कार्यक्रमाच्या दिवशी मी सकाळपासूनच खूप व्यस्त होतो, त्यामुळे मला घरच्या कोणालाही घ्यायला…

क्रमशः
स्रोत:(मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड,IAS यांच्या पुस्तकातून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading