मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ. राजेंद्र भारुड (IAS), भाग ५७.

“मी ८ एप्रिलला आईला फोन करून दिल्लीला जाण्यासाठी पैसे मागितले “मा माले दिल्लीले इंटरव्यू देवाले जानं शे, त्याकरता तू माले चार हजार रुप्या धाडी दे.” माझी ही मागणी ऐकून आईने शक्य असेल, तर मुंबईलाच इंटरव्यू देण्याबाबत सूचवलं. कारण इंटरव्ह्यू ही काय भानगड आहे, हे कळण्याइतपत माहीतीही तिच्याकडे नव्हती. मी आईला समजावण्याच्या सुरात सांगितलं “युपीएससी नी मुलाखत फक्त दिल्लीलेच व्हस” त्यावर आईचं उत्तर होतं की, “तुले अशा नवा नवा धंदा कसाले सुचतंस. आपला डॉक्टरकीना अभ्यास करता येतस नही का? हाई कोनती नवी परीक्षा काढी आखो.” मग मी पुन्हा आईला समजावून सांगितलं “हाई परीक्षा दिनी की आयएएस किंवा आयपीएस व्हउशकस’ पण आईला आयएएस किंवा आईपीएस काय असतं ते दूरदूरपर्यंत माहीत नव्हतं. मग शेवटी मी आईला सांगितल की मा मी कलेक्टरनी परीक्षा देवाले चालनू, त्याना करता तू चार हजार रुपये धाडी दे. रुपयांची जुळवाजुळव करणं तिला अगदीच अशक्य होतं, असं नाही. पण मी तिला नेमकं कशासाठी जातोय हेच लक्षात येत नव्हतं. त्यात ती मला एकट्याला दिल्लीला पाठवायला तयार नव्हती.

https://bit.ly/bspmycityshrigonda

मी बाहेरगावी जेव्हाही प्रवासाला निघायचो, तेव्हा आईला फार चिंता वाटत असे. आता तर चक्क ५ ते ६ दिवसांसाठी, तेही दिल्लीला जाणार होतो. त्यामुळे तिचा विरोध अधिकच तीव्र झाला. याच जागी जर एखादे सुशिक्षित पालक असते, आणि जर त्यांना कळलं असतं की, आपला मुलगा युपीएससी मुख्य परीक्षा पास झालाय आणि मुलाखतीसाठी दिल्लीला जातोय, तर त्यांनी किती प्रोत्साहन दिलं असतं. मात्र माझी अशिक्षित आई मला विरोध करत होती कारण मी नेमकं कशासाठी जातोय, हे तिला समजायला कठीण जात होतं. शेवटी मी तिची हरप्रकारे समजूत घातल्यावर ती पैसे पाठवायला तयार झाली आणि मी दिल्लीला जायला मोकळा झालो.

दिल्लीला गेल्यावर मी आमचे सिनियर डॉ. दुर्गेश यांना भेटलो. ते माझे जवळचे मित्र होते. पहाडगंज भागात बालरोग तज्ज्ञाचं प्रशिक्षण घेत होते. ते पण स्वत: ही ‘इस्कॉन’ अनुसरणारे असल्याने जेवणात कांदे – लसूण खात नसत. त्यांनीच माझ्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. मुलाखतीच्या आदल्या दिवशी मला शुभेच्छा देण्यासाठी दोंडाईचावरून मावशींचा व इस्कॉनमधून गुरुजींचा फोन आला होता. मला जरा बरं वाटलं.

१९ एप्रिल २०१२ मुलाखतीच्या आधी मी खूप उत्साहात होतो, मनावर थोडं दडपणही होतं. मी वेळेच्या अगोदर मुलाखतीच्या ठिकाणी पोहचलो. मुलाखतीसाठी देशभरातून आलेल्या अनेकांशी मी चर्चा केली. आमच्या ग्रुपमध्ये आंध्रप्रदेशचे एक ३४ वर्षीय प्राध्यापक, दोन महसूल सेवेत कार्यरत असलेले अधिकारी आणि एक मुलगी होती, जिचा हा तिसरा प्रयत्न होता. मुलाखतीसाठी माझा पाचवा नंबर असल्याचं मला कळलं. मी त्यांना मुलाखतीच्या पॅनलबद्दल विचारलं. आमच्या पॅनलचे चेअरमन विजयसिंग हे होते. ते भारताचे माजी आरोग्य सचिव आणि सांस्कृतिक घडामोडी संचालक मी प्रथमच इंटरव्ह्यू देत असल्याने मला चारही जणांनी उपदेश करण्याचा सपाटाच लावला.

ते बघून मी माझ्याकडील नोट्स काढल्या आणि माझ्या धुळे जिल्ह्याविषयीची विस्तृत माहिती वाचायला सुरवात केली. तेवढ्यात तिथे एक शिपाई आला आणि त्याने इंटरव्ह्यूसाठी तयार रहायला सांगितलं. मी माझ्या खुर्चीतून उठलो आणि टोमॅटो सूप पिऊ लागलो. ते बघून तो शिपाई चकीत झाला. त्याने मला विचारलं, ‘अब पाच मिनीट में आपके जीवन का सबसे बडा इंटरव्ह्यू है, और आप सूपपी रहे हो?” मी त्या शिपायाकडे पाहून स्मीत केलं आणि सुपाचे घोट घेता घेता त्याच्याशी गप्पाही केल्या. माझा बराच ताण हलका झाला होता. तेवढ्यात बेल वाजली. त्या शिपायाने पुन्हा मला शुभेच्छा दिल्या “जाईए सर, अच्छा करिएगा! “मी त्याला वेळ विचारली. सकाळचे ११:४५ वाजले होते. माझं घड्याळ वगैरे साहित्य सुरक्षा विभागाने आधीच काढून घेतलं होतं. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-57

मी आत डोकावून पाहिलं. तो मोठा प्रशस्त हॉल होता. पांढऱ्याशुभ्र संगमरवरावर एक मोठा तपकिरी रंगाचा सोफा होता. बाजुला ताजी गुलाबाची फुलं ठेवली होती. मला प्रसन्न वाटलं. हॉलच्या एका कोपऱ्यात पॅनल बसलेलं होतं. एका मॅडमसह साठी ओलांडलेले ५ लोक चक्रव्युहाच्या रचनेत बसले होते. समोर एक लांब टेबल होता. पलीकडे माझ्या अगदी समोर चेअरमन सर बसले…

क्रमशः
स्रोत:(मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड,IAS यांच्या पुस्तकातून

Leave a Reply