मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड (IAS). भाग ९

मला आजही जाणवते. मी तासन्तास तिच्या मांडीवर खेळत बसलेला असे. मोठमायचाही माझ्यात खूप जीव होता, आजही आहे. ती आम्हा सगळ्यांचीच खूप काळजी घ्यायची. अतिपरिश्रमामुळं आईची प्रकृती खालावत असल्याचं बघून मोठमायनेच आईला म्हटलं “तू आते घरमाच थांबत जाय. घरमाच दारू इकत जाय आन् घरनंच काम करत जाय, घर राहीसन राजूवरबी ध्यान ठेवशी आणि दारूना २०-३० तवंय रुपल्लाबी भेटतीन. ह्या पैसाबी तुना जोयंच ठेव. मीबी कामले जासच, मना मजुरीना चालावसूत. ‘आपलं घर लहान आहे, याची जाणीव मोठमायला होती. आता आम्ही भावंडही मोठे होत होतो. त्यामुळे आईला आज ना उद्या माझ्या आईची वेगळी चूल मांडावी लागणार, हे तिला कळत होतं. म्हणूनच तिने या पद्धतीने आईला मदत करण्याचं ठरवलं.

मोठमायच्या घरात गरिबी होती, पण त्याहूनही अधिक वात्सल्य व जिव्हाळा होता. आज मोठमायचं एक छोटंसं कौलारू घर आहे. मात्र तिची दोन्ही मुलं मजुरीवर कामाला जातात व मिळेल ती कामे करतात. पण मोठमायच्या आमच्यावरच्या अधिकच्या मायेमुळे व शिस्तीमुळे आमच्या घरात शिक्षणाचं वारं अधिक वेगानं वाहिलं. भाऊने बारावीनंतर डी. एड्. केलं. मी आज या ठिकाणी आहे. याचं जेवढं श्रेय आईला जातं, तेवढंच ते मोठमायलाही जातं. आमच्या भिलाटीत कोणतीच मुलगी शाळेत जात नसे. एखादी गेली तरी पहिल्या – दुसऱ्या इयत्तेनंतरच तिचं शिक्षण बंद व्हायचं. अशा परिस्थितीतही माझी ताई दहावीपर्यंत शिकू शकली.

मला अजूनही कळत नाही, की आमच्या त्या गरीब भिलाटीत मला असं काय सापडलं, की ज्याने माझी दिशा बदलली ! इतरांवर जे संस्कार झाले तेच माझ्यावरही झाले. इतरांना जे वातावरण मिळालं तेच मलाही मिळालं. तरीही त्या सर्वांमध्ये मीच एवढा नशीबवान का ठरलो? मी जेव्हा – जेव्हा या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा – तेव्हा मला एकच उत्तर सापडतं – माझी आई ! आईला आता मोठमायकडे राहून दोन – तीन वर्षे झाली होती. ती आता आपलं स्वतःचं घर बांधायचा विचार करत होती. तसं तिने मोठमायकडे बोलूनही दाखवलं होतं. सुरवातीला मोठमायने आढेवेढे घेतले, पण आईचं वेगळं घर ही आमची गरज आहे, हे तिलाही कळत होतं. त्यामुळे अनिच्छेने का होईना तिने होकार दिला. आईने काम करून जमा केलेल्या २०० रुपयांतून जवळच एक जागा विकत घेतली. आई व मोठमाय नदीवर जाऊन तेथे स्वतःच विटा पाडू लागल्या. पुरेशा विटा पाडून झाल्यानंतर आईने एका बेलदाराला गाठलं व घर बांधण्यासाठी मजुरी वगैरे मिळून एकूण किती खर्च येईल, याचा अंदाज घेतला.

पण त्याने सांगितलेला आकडा तिच्या आवाक्याबाहेरचा होता. शेवटी तिने बेलदाराला म्हटलं “बिगारी म्हनीसन आम्हूच काम करसूत, तुमी निसती भित उभी करी द्या”. ताई आता नियमित शाळेत जात होती. पण घराचं काम सुरू झाल्यामुळे आईने तिला काही दिवस घरीच थांबायला सांगितलं. विटा बनविण्यासाठी आई नदीवरून माती आणत असे व ताई जवळच्या नाल्यातून पाणी आणून टाकत असे. भाऊ मोठमायकडेच असायचा. ताईला पाणी भरण्यासोबतच माझ्याकडेही लक्ष ठेवावं लागत असे. सकाळी दहाच्या सुमारास बेलदार येई. तो आला की आई मला झोळीत टाकून कामाला लागायची. आठ दहा दिवसांतच दोन खोल्यांचं घर तयार झालं. छपरावर टोकराची मांडणी करून त्यावर उसाची पाचट टाकली गेली. आई व ताईने मिळून घर शेणानं छान सारवून घेतलं. आमचं घर तयार झालं.

https://bit.ly/bspmycityshrigonda

आमच्याकडे पहिल्यांदाच स्वतःचं असं काहीतरी होतं. आई अभिमानाने घराकडे बघत असे. त्या घराच्या प्रत्येक विटांत, मातीच्या एकेक कणात आईचा घाम मिसळला होता. आमच्या घराच्या आजूबाजूला पूर्वी एकही घर नव्हतं. हळूहळू तिथं अनेक घरं उभी राहिली. आईचा स्वभाव मुळातच प्रेमळ होता. इतरांना मदत करण्यात ती कायम पुढे असायची. तिच्या मोकळ्या स्वभावामुळे लवकरच आजूबाजूच्या भिल्ल स्त्रियांचा वावर आमच्या घरात वाढू लागला. आमच्या ओट्यावर कायम कुणी ना कुणी बसलेलं असायचं. जेवण आटोपल्यावर अनेकजण आमच्या ओट्यावर जमायचे व आम्हा भावंडांना चेटकीण, भूत, चुल्लीण, मुंजोबा यांच्या पारंपारिक कथा सांगायचे. बऱ्याचदा आम्ही त्या गोष्टींमधील भीती व उत्सुकता डोळ्यांत घेऊन झोपी जायचो. लहान मुलांचं कल्पनाविश्व समृद्ध करण्यासाठी कथांसारखं दुसरं माध्यम नाही. आमच्या शेजारीच एक बाई राहायची. तिचं नाव होतं गवलाबाई. तिला दोन मुलं होती. गवलाबाईचा माझ्या आईवर फार लोभ होता. तिच्या शेतातून कांदे, लसूण, गहू, वालाच्या शेंगा असं कधी – कधी ती आणून द्यायची, पण आई खूप स्वाभिमानी होती. (I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS). Part 9)

तरी गवलाबाईच्या आग्रहाखातर आई ते स्वीकारायची. मात्र आपण घेतलेली मदत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परत केली गेलीच पाहिजे, याकडे आईचा कटाक्ष असे. त्या दोघींचाही एकमेकींवर खूप जीव होता. आम्ही मुलंही मग एकमेकांच्या घरात रूळू लागलो. आम्हा भावंडांचे गवलाबाईच्या घरी जेवण करणे तर नित्याचेच झाले होते. आई आता नवीन घरात चांगली रूळली होती. पण तरीही आईचा बराच वेळ शेजारीच असलेल्या मोठमायच्या घरीच जात असे. दोन्ही बहिणी एकमेकांना सांभाळत आपापला संसार चालवत होत्या. दोघीही एकमेकांचा आधार होत्या. त्या दोघांनाच नव्हे, तर भिलाटीतील संपूर्ण भिल्ल समाजाला एकमेकांशी बांधून ठेवणारा एकच दुवा होता. दारिद्र् ! सोयी – सुविधा तर दूरच, पण दोनवेळच्या पोटापाण्याचीही अनिश्चितता असलेले भिल्ल एकमेकांच्या आधाराने आयुष्य काढत होते.

क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.!या पुस्तकातुन )

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading