निकालाचा रोमांचकारी दिवस …
४ मे २०१२ माझ्या युपीएससी परिक्षेच्या निकालाचा दिवस. सकाळपासून मन कुठल्याच गोष्टीत लागत नव्हतं. मोबाईल हातात घेऊन इंटरनेटवर काही आलंय का, हे मी वारंवार बघत होतो. खरं तर निकाल संध्याकाळी प्रसिद्ध होईल, असं आधीच जाहीर झालं होतं. आणि आता तर रणरणती दुपार होती. त्यामुळं इंटरनेटवर एवढ्यातच काही दिसणार नाही, हे मला कळत होतं; पण प्रचंड हुरहुर असल्यानं माझी उत्कंठा क्षणाक्षणाला वाढतच होती. मनाची अस्वस्थता काही केल्या जात नव्हती. पक्षांचे थवेच्या थवे झाडावर यावेत तसे अनेक विचार डोक्यात येत होते. निकाल पहिल्याशिवाय मन स्थिर होईल, असं वाटत नव्हतं. अखेर वैतागून मी एका खाटेवर बसलो. सहज म्हणून डोळे मिटले व हळूहळू विचारांच्या गर्दीत हरवून गेलो.
स्वप्नं बघायचं धाडस माझ्या अंगी कुठून आलं, ते मलाच ठाऊक नाही. मी ज्या वातावरणात वाढलो तिथे खरं तर स्वप्नांसाठी जागाच नव्हती. येणारा प्रत्येक दिवस पुढे ढकलत मरण येईपर्यंत जगत रहायचं, अशी परिस्थिती अवतीभवती – सभोवती असतांनाही मी स्वप्न बघू शकलो. माणुसकी गोठवणारे वास्तव समोर असतानाही स्वप्नांना प्रयत्नांची ऊब देऊ शकलो. मी स्वप्न पाहू शकलो. होय, मी एक स्वप्न पाहिलं! धुळे जिल्हयातील सामोडे गावच्या भिलाटीत एका अत्यंत गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. मी आईच्या पोटात असतानाच बाप देवाघरी गेला. त्यामुळं बाप नावाचा आधार माझ्या पाठीशी जन्मापासूनच नव्हता. आमच्या घरात कर्ता पुरुष कोणीही नाही. फक्त दोन खमक्या बाया, माझी आई व माझी मावशी. सोबत एक भाऊ, एक बहीण आणि गोठ्यात बांधलेली एक म्हैस. आमच्या कुटुंबात कोणीही शिकलेलं नव्हतं. इतकंच काय तर शिक्षणाच्या बाबतीत आमच्या भिलाटीची पाटी जवळपास कोरीच होती. कधीतरी एखादा मुलगा फाटका सदरा व ठिगळ लावलेली चड्डी घालून मधेच कळपातून वाट चुकलेल्या वासरासारखा खांद्याला पिशवी लटकवून शाळेत जाताना दिसे. त्या अडाणी व दरिद्री वातावरणात मी केवळ अभ्यासात हुशार होतो म्हणून इतरांपेक्षा वेगळा नव्हतो. लहानपणी माझे अनेक मित्र माझ्यापेक्षा कितीतरी हुशार होते. पण तरीही यशाच्या समाजमान्य व्याख्येनुसार मी आज त्यांच्या कितीतरी पुढे निघून आलो. मी वेगळा होतो कारण मी माझे स्वप्न जपू शकलो.

स्वप्नांचं एक असतं. तुम्ही त्यांचा सांभाळ केला की, तीच स्वप्नं आपल्याला आणखी नवीन स्वप्नं देतात आणि हा प्रवास असाच निरंतर सुरू राहतो. स्वप्नपूर्तीची हूरहूर प्रत्येक वेळी तेवढीच तीव्र असते. प्रत्येक वेळी तीच भीती, प्रत्येकवेळी तीच उत्कंठा. मी यालाच जगणे म्हणतो. माझ्या स्वप्नांचं पहिलं टोक सापडलं, तर कदाचित त्यावर सरकारी नोकरीची खूणगाठ सापडेल. पण एमबीबीस झालो. व्यवसायाने नसलो तरी पदवीने डॉक्टर झालो. परंतु आज, आज माझं स्वप्न त्याहून खूप वेगळं होतं. आय.ए.एस., भारतीय प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पदवींपैकी एक. वैचारिक संक्रमणाच्या कुठल्यातरी अवस्थेत ते स्वप्न माझ्या डोळ्यांत उतरलं आणि त्यानंतर अन्य कोणताही ध्यास उरला नाही. माझ्या अंगी असलेल्या पूर्ण क्षमतांचा व उपलब्ध असलेल्या साधनांचा पूरेपूर वापर करत हे नवं स्वप्नही मी जीवापाड जपलं. जीव ओतून अभ्यास केला. त्या अभ्यासाने मला ज्ञानच दिलं, असं नाही, तर माझ्या जाणीवाही विकसित केल्या. समाजाशी असलेली माझी बांधिलकी आणखी स्पष्ट केली. माझ्या स्वप्नांना योग्य दिशा दिली.
पण स्वप्नांचा हा प्रवास सोपा निश्चितच नव्हता. तो सोपा कधीच नसतो. प्रयत्नांचा आधार नसलेली कितीतरी स्वप्नं डोळयांतच विरताना आपण रोज बघतो. या प्रवासात मी सुद्धा अनेकदा खचलो, पडलो, रडलो. पण थोडासा आधार मिळताच तेवढ्याच ताकदीने उठून उभाही राहिलो. हतबलतेच्या अशा अनेक क्षणांमधे मला माझी आई, मावशी, भाऊ, ताई यांचा खूप आधार मिळाला. ते शिक्षित नव्हते, पण समजूतदार होते. माझ्या स्वप्नांचे ओझे त्यांनी निरपेक्षपणे वाहिले. मला माझ्या जबाबदारीचे भान होते. मात्र त्यांनी त्याचे दडपण माझ्यावर कधीच पडू दिले नाही. माझ्या मते यश हे एकट्याचे कधीच स्वतःला सांगत असतो. माझ्यासाठी एवढे कष्ट वेचणाऱ्या माझ्या घरच्यांना आजपर्यंत कधीही न मिळालेलं सुख कसं देता येईल ? याचा मी रोज विचार करत असतो. पण आज मात्र मीच माझ्या विचारांच्या चकव्यात भरकटत जात होतो. विचारांच्या तंद्रीतच मी ताईकडे पोहचलो. वर उन्हाचा तडाखा वाढला होता. अंग घामाने डबडबलं होतं. सभोवतालच्या वातावरणाची जाणीव माझ्या शरीराला असली, तरी मन मात्र बधीर झालं होतं. सद्या रोजंदारीचं काम बंद असल्यामुळं ताई घरीच होती. तिला बघून थोडं हायसं वाटलं.
I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS)
तिच्या लग्नानंतर आमच्या घरातली प्रसन्नताच निघून गेली. ती गावातच रहात असल्यामुळं मी वारंवार तिच्याकडे जात असतो. माझी आई घराचा रहाटगाडा चालविण्यात व्यस्त असताना ताईनेच आई बनून माझ्यावर जीव लावला. माझा लाड केला. “राजू, कितला घाम येलशेतुले ? ऊन मन मन तसं तयी राह्यनं, इतला उनमा कसाले फिरस ? “थंडगार पाण्याचा तांब्या माझ्या हातात देत ताई बोलली. मी काहीच बोललो नाही. पण मनातली अस्वस्थता चेहऱ्यावर लख्ख दिसत होती. माझ्या चेहऱ्यावरून तिने काय ओळखायचं ते ओळखलं. “राजू, कितली कायजी करसंरे भो तू ? पहिलेच तू डाक्टर व्हयल शे… आनी आखो आते कलेक्टर बी व्हशी” अंगणात मांडवाखाली खाट टाकून त्यावर चटई अंथरत ताई बोलली. तिच्या शब्दांनी थोडा धीर आला. सुसाट पळणारं मन दिशांचा अंदाज घेऊ लागलं. थोडं हायसं वाटून मी चटईवर अंग टाकलं.
सकाळपासून विचार करून मन एवढं थकलं होतं की लगेच डोळा लागला. एक – दीड तास झाला असेल. एक ओळखीचा आवाज वारंवार माझ्या कानावर पडत असल्याचा भास होत होता. मी खडबडून जागा झालो. शेजारीच मोबाइल वाजत होता. स्क्रीनवर एका मित्राचा नंबर ब्लिंक होत होता. मित्र काय सांगणार याविषयी मला कसलीही शंका नव्हती. विचारांची एक लाट मनात उसळली. क्षणभरासाठी माझं संपूर्ण आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर चमकून गेलं. एका क्षणासाठी गुदमरल्यासारखं झालं. ज्या क्षणाची मी एवढ्या अस्वस्थपणे वाट बघत होतो, तोच क्षण माझ्या पुढे उभा होता. मी लगबगीने फोन उचलला – “अरे ऐकतोयस ना ? निकाल लागलाय आपला. ‘मित्रफोनवर बोलत होता.
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं या पुस्तकातुन)
