मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड(IAS). भाग ६.

एकटीच कामाला जात असे. सकाळीच स्वयंपाक वगैरे करून आई कामाला निघून जायची. दिवसभर काम करून संध्याकाळी घरी परत आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक, सर्वांचं जेवण, धुणीभांडी यातून तिला जराशी उसंत मिळत नसे. वडील मात्र घरात रिकामे बसून राहायचे किंवा मग आजूबाजूच्या रिकामटेकड्या लोकांसोबत पत्ते कुटत बसत.

एके दिवशी आई कामावर गेली असताना एक बाई धापा टाकत तिच्याकडे आली व वडिलांना पुन्हा मिरगी आल्याचं सांगितलं. आई घरी पोहचली तोवर सर्व नातेवाईक अंगणात जमले होते. जीवाच्या आकांताने आई वडिलांकडे धावली. पण तोवर त्यांच्या शरीरात कसलीही हालचाल उरलेली नव्हती. ती वडिलांच्या निर्जीव देहावर पडून धाय मोकलून रडू लागली. कधी चिमुकल्या द्रौपदीकडे, तर कधी मावशीच्या खांद्यावर असलेल्या दीपककडे बघून रडणाऱ्या आईच्या दुःखाला अंत नव्हता. मावशी तिला धीर देत होती. संध्याकाळी जेव्हा भिलाटीतले लोक कामावरून परत आले, तेव्हा सर्वांनी मिळून अंत्ययात्रेची तयारी केली. आई धायमोकलून रडतच होती. अन्य बाया, माणसं दारू पिऊन आईच्या रडण्याच्या आवाजात आपला आवाज मिसळीत होती. काकांनी व जमलेल्या काही माणसांनी मिळून तिरडी उचलली. सर्वजण मसनवटीकडे निघाले. भिल्लांमध्ये माणसाला मेल्यानंतर जाळत नाहीत, तर जमिनीत पूरतात. वरच्या स्वर्गापेक्षा जमिनीशी असलेली बांधिलकी मेल्यानंतरही कायम राहते, अशी एक समजूत आहे. सर्वानी मिळून त्यांना माती दिली व आपापल्या घरी परतले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

माझा बाप गेला, तेव्हा मी आईच्या गर्भात होतो. त्यावेळी केवळ आमचीच नव्हे, तर संपूर्ण भिल्ल समाजाचीच अवस्था इतकी दरिद्री होती की, मेलेल्या माणसाची आठवण म्हणून एक फोटो काढणंसुद्धा शक्य नव्हतं. दुसरं म्हणजे त्यांच्यासाठी ते तितकं महत्त्वाचंही नसायचं. माणूस मेला म्हणजे सर्वकाही संपलं ! त्यामुळं माझा बाप दिसायला कसा होता ? हे मला कधीच समजू शकलं नाही. क्षणभरासाठीही जन्मदात्या बापाचा चेहरा माझ्या डोळ्यापुढे येऊ शकत नाही.

मला कळायला लागल्यावर जेव्हा मी इतर मुलांना त्यांच्या वडिलांसोबत बघायचो, तेव्हा प्रत्येकवेळी मी विचार करत असे की, माझे वडील कसे दिसत असतील? त्यांच्याकडे बघून वडिलांचं मुलांच्या जीवनात काय स्थान असतं, हे मला कळू शकत होतं. मला कधी कोणी मी ‘कोणाचा मुलगा आहे?’, असं विचारलं, तर माझ्या तोंडून आईचंच नाव निघत असे. माझ्यासाठी माझ्या वडिलांचं अस्तित्व हे केवळ ‘वडील’ या संबोधनापलीकडे काहीच नव्हतं. माझे मित्र जेव्हा स्वत:च्या वडिलांबद्दल बोलत, तेव्हा प्रत्येकवेळी मला असंच वाटत राहायचं की, माझ्या जीवनात काहीतरी खूप मोठी कमतरता आहे. आमचे नातेवाईक बोलतांना म्हणत की, तुझे अप्पा तुझ्या भावासारखे दिसायचे. तेव्हा नकळत भाऊच्या चेहऱ्यातच मी कधीही न पाहिलेल्या माझ्या बापाचा शोध घेत असे.

पण तरीही माझ्या मनाची एक भिंत बापाच्या चेहऱ्याशिवाय आयुष्याच्या अखेरीपर्यंत अशीच रिकामी राहणार होती. विधात्याने केलेली माझी ही क्रूर विटंबना आहे. ज्या भिल्लाच्या पोराने आज प्रशासकीय सेवेत लाखों प्रतिस्पर्थ्यांना मागे सारत यश संपादन केलं. ज्यासाठी त्याचं सर्वत्र खूप कौतुक झालं, त्या पोराला आपल्या जन्मदात्या बापाचा चेहरा आकाशातल्या लाखों ताऱ्यांमध्ये शोधावा लागतोय. सूर्यपुत्र कर्णालासुद्धा जोपर्यंत सत्य ज्ञात नव्हतं, निदान तोपर्यंत तरी अधिरथाच्या माध्यमातून वडिलांचं प्रेम, आपुलकी अनुभवता आली. पुत्रप्रेमानं व्याकूळ होणारी बापाची नजर न्याहाळता आली. पण माझ्या जीवनात यापैकी काहीच का वाट्याला येऊ नये? नियतीने माझ्या जन्मदात्याचं मला जन्मत: दर्शन तर घेऊ दिलंच नाही, पण निदान त्यानंतर चित्ररुपी छबीही ठेवली नाही, जी मी माझ्या हृदयात नेहमी जपून ठेऊ शकलो असतो? (I had a dream! (IAS Dr. Rajendra Bharud)

जगात प्रत्येक मनुष्य आपल्या हृदयात आई – वडिलांची, बहीण – भावाची एक कधीही लोप न पावणारी प्रतिमा जपत असतो. मात्र माझ्या मनात एका प्रतिमेची जागा कायम काळोखाने घेतलेली असणार आहे. एक असा काळोख, ज्यामध्ये मी एका व्यक्तीच्या स्पर्शासाठी नव्हे, तर नुसत्या अनुभूतीसाठी आयुष्यभर चाचपडत असेन. ज्या बापामुळे मी हे जग पाहिलं, तो बाप मला कधी कधी कळलाच नाही. आणि कळण्यासाठी कधी दिसलाच नाही. म्हणूनच माझ्यासाठी ‘बाप’ हे न उलगडलेलं कोडंच आहे.”

क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.!या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading