दिनांक ३१ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा
केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या गेल्या तर आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला मोठे यश मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे यांनी केले आहे. श्रीगोंदा येथे भाजपाच्या श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
नामदार खडसे म्हणाल्या, “राज्यात पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर आपण केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रभावी पाठपुरावा केला पाहिजे. श्रीगोंदा मतदार संघात आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली संघटना मजबूत आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासात अडकून न राहता अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.”
या बैठकीत आमदार बबनराव पाचपुते यांनी आपल्या मतदार संघातील विकासकामांवर भर दिला. त्यांनी सांगितले की, “पाण्याच्या प्रश्नासह अनेक सामाजिक बांधिलकीतून कामे करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीत परिस्थिती वेगळी होती, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार पुन्हा संधी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”
विक्रम पाचपुते यांनी प्रास्ताविक करताना केलेल्या कामांचा आढावा दिला. कार्यकर्त्यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत पुरेशी मेहनत घेतली नसल्याचे निदर्शनास आणले. यावर नामदार खडसे यांनी या बाबत अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे सांगितले.
या बैठकीत श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगरसेवक शब्बीरभाई बेपारी व विविध गावातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. पत्रकारांशी बोलताना नामदार खडसे यांनी सांगितले की, “नगर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदार संघाची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आली आहे. श्रीगोंदा मतदार संघात आमदार पाचपुते यांच्या नेतृत्वामुळे संघटन मजबूत आहे. त्यांच्या दूरदृष्टीने अनेक विकासकामे मार्गी लागली असून आगामी निवडणुकीत पक्षाला नक्कीच यश मिळेल.”
बैठकीत जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्रतिभाताई पाचपुते, दिनूकाका पंधरकर, गणपत दादा काकडे, पोपटराव खेतमाळीस, प्रतापसिंह पाचपुते, बाळासाहेब महाडिक, संदीप नागवडे, बापू तात्या गोरे, पुरुषोत्तम भैया लगड, मिलिंद दरेकर, धनराज कोथिंबिरे, मंगेश घोडके, शुभांगीताई सप्रे, देवयानी शिंदे, सुजाता खेडकर, विद्या शिंदे, उषाताई कर्डिले तसेच सर्व माजी नगरसेवक, भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाने आपल्याला सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत की नाही, पक्षीय संघटन कसे आहे, आणि निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे याचा आढावा घेण्यासाठी पाठवले असल्याचे नामदार खडसे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी आस्थेच्या बाबतीत राजकारण आणू नये, सरकार याबाबत गांभीर्याने चौकशी करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






