अहिल्यानगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान; शहरात तणाव, ऑल इंडिया पँथर सेनेचा तीव्र निषेध..

दिनांक ७ ऑक्टोबर २०२५,अहिल्यानगर:

अहिल्यानगर शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारी अत्यंत निंदनीय घटना समोर आली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही अज्ञात व्यक्तींनी एका वहीच्या पानावर महामानवांविषयी अश्लील शिवीगाळ, जातीवाचक अपशब्द आणि द्वेषपूर्ण मजकूर लिहून ते फेकले.

या पानावर स्थानिक आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचाही उल्लेख आढळल्यामुळे शहरात संतापाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे.

या धक्कादायक घटनेनंतर ऑल इंडिया पँथर सेनेने तीव्र निषेध नोंदवला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश थोरात तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या वेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार म्हणाले, “राज्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आणि जातीय दंगली घडवण्यासाठी हे नियोजनबद्ध कटकारस्थान आहे. पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फूटेज तपासून आरोपी व त्यांच्या संघटनेला ताब्यात घ्यावे.”

ऑल इंडिया पँथर सेनेने राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. “गृहमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महामानवांविषयी विटंबना वाढत आहेत,” असा आरोपही यावेळी करण्यात आला.

देशभरात दंगल घडवण्याचा कट?
अहिल्यानगरमधील या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच दिल्लीमध्ये सनातनी प्रवृत्तीच्या व्यक्तीने न्यायमूर्ती गवई यांच्या दिशेने बूट फेकल्याची घटना घडली होती, तर ग्वाल्हेर येथेही एका मिश्रा नावाच्या व्यक्तीने महामानवांविषयी शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

या घटनांचा धागा जोडून पाहता, देशभरात दंगली घडवण्याचा मोठा कट असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत ऑल इंडिया पँथर सेनेने व्यक्त केले आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading