श्रीगोंद्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह: महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या भूमिकेबद्दल पालकांमध्ये संताप..?

दिनांक ७ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरात मागील महिन्यांपासून अल्पवयीन मुलींवरील आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये १० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

या गंभीर परिस्थितीत, शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही, त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त पालकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पालकांचे आश्वासन भंग…
मागील महिन्यात एका अल्पवयीन कॉलेज तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिक आणि सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे फसला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालक आणि पत्रकारांनी तात्काळ महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याशी चर्चा केली होती.

त्यावेळी, प्राचार्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या जयंतीनंतर पोलीस प्रशासन, कॉलेज व्यवस्थापन, पालक आणि पत्रकार यांची संयुक्त बैठक घेऊन सुरक्षा आणि जन जागृतीबाबत चर्चासत्र आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते.

माजी विद्यार्थी मेळावा, सुरक्षेचा मुद्दा गुलदस्त्यात..!
पालकांना आश्वस्त करूनही प्राचार्यांनी अपेक्षित पालक मेळाव्याऐवजी नुकताच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. धक्कादायक बाब म्हणजे, शहरात अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा अति महत्त्वाचा विषय त्यांनी या मेळाव्यात घेतला नाही. याऐवजी, केवळ सर्वसाधारण विषयांवर चर्चा करून हा मेळावा संपन्न झाल्याचे बोलले जात आहे.

प्राचार्यांविरुद्ध पालकांचा असंतोष..
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्यांच्या शिक्षक स्टाफचे लक्ष वारंवार या गंभीर घटनांकडे वेधूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे पालकांचे म्हणणे आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये सुरक्षा रक्षकांचा गराडा वाढवला असला तरी, जनजागृती आणि संयुक्त बैठक घेण्यास नमूद प्राचार्य उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळे, “आपला विद्यार्थी आपली जबाबदारी” या उक्तीप्रमाणे आता पालकांनाच खबरदारी घ्यावी लागणार आहे, असे मत व्यक्त होत आहे. “शिक्षक आणि त्यांची सर्व यंत्रणा पगारी असल्याने ते त्या चौकटीच्या बाहेर विचार करणारे नाहीत,” असेही काही पालकांचे मत आहे.

रामभरोसे प्रशासन?
कॉलेज कॅम्पस आणि परिसरात होणाऱ्या मजनूगिरी आणि फिरस्ती गुंडांपासून मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी आता पूर्णपणे पालकांची झाली आहे, असे पालकांनी स्पष्ट केले आहे.

प्राचार्य आणि महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, तसेच रयत संस्थेच्या समितीवरील पदाधिकारी आणि स्थानिक राजकारणी यांच्या भरवशावर राहणे यापुढे रामभरोसे ठरेल! अशा संतप्त भावना पालकांनी व्यक्त केल्या आहेत.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading